-डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
विनय. बोलू आपण, पण मी अलीकडे एक पुस्तक वाचलं ते तूही आधी वाचायला हवंस असं मला वाटतं.इकीगाई.जपानी संकल्पनेवरचं हे पुस्तक आहे. जीवनाचं मर्म सांगणारं. लेखकानं असं सुचवलेलं आहे की माणसाच्या कर्माचे, भागध्येयाचे चार भाग असतात. हृदय किंव मन, दुसर्यांकडून अपेक्षा, प्रोफेशन किंवा कौशल्य आणि व्होकेशन म्हणजे तो पैसा कशातून मिळवतो. जीवनात ज्या काही विपरितता येतात त्या या चार गोष्टी चार दिशांना जातात म्हणून येतात असं हे पुस्तक म्हणतं.हे चारही भाग ज्यावेळी एकत्र काम करतील तेव्हा जे समाधान आणि आनंद मिळेल ते म्हणजे इकीगाई. या इकीगाईचा शोध न घेतल्याचे परिणाम भोगत असल्याचे अनेकजण आवतीभोवती दिसतात.तो शोध मीही योग्य वेळी घ्यायला हवा होता, असं मलाही वाटलं. मी कॉमर्स केलं एक वर्ष मग आर्ट्सला आलो. मी इंग्लिश लिटरेचरमध्ये एम.ए. केलं; पण राज्यशास्त्रात जास्त रस असल्याने पीएच.डी. राज्यशास्त्रात केलं. म्हणजे ही नागमोडी वाटचाल जी झाली ती हे पुस्तक वेळीच वाचलं असतं तर टळली असती.म्हणून म्हणतो हे पुस्तक जमलं तर वाच!दुसरं म्हणजे माणसांचे नातेसंबंध, मैत्री किंवा पारस्पारिकता, हे एक रसायन आहे. वेळ द्यावा लागतो त्याला. मेहनत घ्यावी लागते. निर्धार असावा लागतो. मैत्री करायची, नातं निभवायचं तर एकतर्फी निर्धार किंवा प्रय} करावे लागतात. गेले उडत अशी भावना नाही चालत. मैत्री, नात्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा.त्या फुलपाखरी दिवसांत हे लक्षात नाही येत; पण एक नक्की की नात्याचं बहरणं किंवा कोमेजणं हे तुझ्यावरही अवलंबून आहे. ते जमलं नाही तर त्याचं खापर इतरांवर फोडून चालणार नाही. आणि अजून एक म्हणजे कौशल्य आणि क्षमतांना काढायची धार. शिकायला वय नसतं हे मान्य आहे. मात्र जीवनाच्या पंचविशीच्या टप्प्यार्पयत आपली कौशल्य, क्षमता शार्प करता येतात. त्यांना धार जास्त चांगली काढता येते. तसे तर काय लोक आयुष्यभर शिकतात, पण ताण-तणावापासून मुक्त असताना वयाच्या या टप्प्यात ते काम अधिक चांगलं होतं. आपल्या क्षमतांना चांगली बैठक मिळते.ज्याला इंग्रजीत ‘बिल्ड अपॉन’ म्हणतात, तसा करिअरचा भक्कम पाया घालणं, त्यासाठी कौशल्य आत्मसात करणं हे याच वयात अधिक चांगलं होतं.तर ते कर. त्यासाठी हे मोक्याचं वय आहे त्याचा पुरेपूर वापर कर!( उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी)