- अंजली भागवत
अंजली. सावध हो! आता तुझ्या हातातला वेळ हीच तुझी ताकद आहे. आता तू वेळ वाया घालवतेस, तसं करू नकोस. हा वेळ सत्कारणी लावला तर उद्या तुलाच वेळ फुकट गेल्याचं दुर्ख होणार नाही. या वयात आपल्यासमोर खूप काही प्रलोभनं असतात. त्याकडे आपण जातो. ते करतोही. पण मग नंतर वाटतं की, का केलं आपण ते? त्या गोष्टींचा काही उपयोग नव्हता. उगाचच या गोष्टी केल्या. जर ही गोष्ट सोडून दुसरी गोष्ट केली असती तर त्याचा फायदा झाला असता. आणि अजून एक.करिअर तर करायचंच आहे; पण जरा मैत्रिणींबरोबर मजा कर. पुढे गेल्यावर वाटेल की, आपण तेव्हा हे सारं का नाही केलं? नंतर आपण ती मजा काही करू शकत नाही. त्यामुळे तेही कर.आनंदी हो. आपण कायम आनंदी राहायचं आहे, हे मोठं झाल्यावरही लक्षात ठेव. आणि अजून एक, मला तुझा म्हणजे या वीस वर्षाच्या अंजलीचा खूप अभिमान आहे. शूटिंगचं वातावरण प्रोफेशनल नाही. कुणाचा पाठिंबा नाही. मध्यमवर्गीय कुटुंब. तरी तू एक स्वप्न पाहिलंस, त्या स्वप्नांसाठी खूप झटतेस. शंभर टक्के प्रयत्न केले. त्यावेळी जसं करिअरवर खूप प्रेम केलं, तसं कायम कर. करिअरशी कायम प्रामाणिक राहा.आनंदी राहा. आणि कष्टही करत राहा.
(आंतरराष्ट्रीय महिला नेमबाज )