-डॉ. अरुणा ढेरे
अरुणा तू वीस वर्षाची होतीस तेव्हा वेगळी होतीस. आज तुझ्यापेक्षा कितीतरी वेगळी विशीतली ‘तरुण’ मुलं माझ्या आवतीभोवती आहेत.तो काळ संथ होता. वाढीचा अवकाश पुष्कळ मोठा होता. आज आहेत तेवढी वेगवेगळी दालनं खुली नव्हती. आजच्या तरुण मुलांना इतके विविध, आपल्या कक्षेपलीकडे प्रदेश पाहता येतात, इतकी माहिती असते, नवे अनुभव समोर असतात. असं बरंच काही जे तुला माहितीही नव्हतं.वेगळं आहे आजचं जग.मात्र आजही या जगात एक गोष्ट तीच आहे. हे जे वय आहे ते बक्षीस आहे आपल्याला आयुष्यानं दिलेलं. मोठी देण आहे. आणि तिचा उपयोग कसा करून घ्यायचा हा निर्णय प्रत्येकाच्या हातात दिलेला आहे.टाइम हा ‘पास’ करण्यासाठी नसतो. आपलं आयुष्य सुंदर, कसदार आणि समृद्ध करणार्या गोष्टी आपण आपला वेळ वापरून कराव्यात. कला, ज्ञान, तंत्रज्ञान जे शिकू, वाचू, करून पाहू ते कमीच आहे. म्हणतात ना, सितारों के आगे जहॉँ और भी है.-तसंच आहे हे.मग आता मला सांग तू आजच्या काळात जर वीस वर्षाची असती तर काय केलं असतं?आजची मी मला तुझ्यात, वीस वर्षाच्या अरुणात पाहतेय, मी तुझ्या माध्यमातून जगायला लागले तर मी काय केलं असतं?हे ऐन मोक्याचं वय आहे. आनंद, उल्हास, उमेद असते या वयात. कराल त्यासाठी जागा असते आयुष्यात. जगामध्ये वावरण्याचं, उभं राहण्याचं, हवं ते करण्याचं स्वातंत्र्यही देतं ते हेच वय.त्या स्वातंत्र्यासह जबाबदारीची जाणीवही करून दे स्वतर्ला. ती खूप महत्त्वाची आहे. आपल्या म्हणजे आपल्या पिढीच्या खांद्यावर आपण जबाबदारी देतोय हे ‘भान’ सतत जागं असायला हवं मनात.आपली माणसं, परिसर, ज्यांच्या संबंधात आपण मोठे होतो, वाढतो त्या गोष्टी, समाज, त्या सगळ्यांचं आपण देणं लागतो. तेव्हा तुला एकटीलाच मोठं व्हायचं नाहीये, या सगळ्यांना घेऊन मोठं व्हायचं आहे.आणि ही सगळी माणसं, भोवताल, जगण्याचा अवकाश सोबत असणं म्हणजे काही ते तुझ्या स्वातंत्र्यावर आलेलं बंधन नाहीये, तर या सार्या तुलाच समृद्ध करणार्या गोष्टी आहेत. तशी समृद्ध तू हो. जमेल तुला!एक काळ होता जेव्हा वीस वर्षाच्या मुलांच्या पायात घरच्यांच्या, समाजाच्या मोठय़ा बेडय़ा होत्या. आता त्या दोन्हीकडच्या बेडय़ा तुटल्या आहेत. घरचे लोक सदैव पाठिंबा द्यायला तत्पर दिसतात. मग विचार काय करता, झेप घ्या! उद्याचं जग तुमचं आहे.वीस वर्षाची होती अरुणा तेव्हाही सुदैवानं तिच्यावर विश्वास टाकणारी माणसं होती. आजही आहेत.मात्र नव्या जगात नवं अवकाश आहे. ते अवकाश कवेत घेताना तात्पुरतं काय आणि टिकाऊ काय यातला फरक ओळखायला शिक. माध्यम तुमच्यासाठी की तुम्ही माध्यमांसाठी हे विचार स्वतर्ला!आता तंत्रज्ञानामुळे गोष्टी किती सोप्या झाल्या, जी माहिती, ज्या गोष्टी मिळवायला झटावं लागायचं ते सारं सहज पुढय़ात येतं, मग त्यापुढे जात, त्यापलीकडचं जग आणि अनुभव कसे कवेत घेणार, ते कसं जगणार याचा विचार कर.आणि आपलं मोठ्ठं अवकाश कायम ठेवताना आणि विस्तारताना आपल्या माणसांच्या, समाजाच्या विश्वासाचं ‘भान’ ठेव.ते भान कायम जागं असलं पाहिजे.आणि जात राहिलं पाहिजे सतत पुढे. नेमानं!
(ख्यातनाम लेखिका)