इंग्रजी गाण्यांचे शौकीन असाल तर तुम्ही तिचं नाव नक्की ऐकलेलं असेल.
अॅडले नाव तिचं.
सध्याची प्रचंड लोकप्रिय अशी ती इंग्लिश सिंगर आहे. गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या 25 नावाच्या तिच्या अल्बमने सगळे रेकॉर्ड तोडले. अमेरिका आणि ब्रिटनसह इंग्रजी कळणा:या तरुण जगात तिच्या अल्बमच्या एक मिलियनहून अधिक कॉप्या विकल्या गेल्या.
27 वर्षाच्या या गायक आणि कवी तरुणीनं तमाम इंग्रजी गाणी ऐकणा:या तरुण जगाला वेड लावलं आहे.
तीन वर्षापूर्वी म्हणजे 2011 मधे तिचा 21 नावाचा एक अल्बम प्रसिद्ध झाला होता. त्या अल्बमने लोकप्रियतेचे तमाम रेकॉर्ड मोडले. अनेक पारितोषिकं जिंकली. तिचा नवीन अल्बम कधी येईल म्हणून लोक आस लावून बसले होते.
आता तो आलाय. सगळा ब्रेकअप गाण्यांचा मूड घेऊन स्वत:लाच शोधल्यासारखी गाणी गात ती पुन्हा परतली आहे.
मात्र एरवी लोक अपयशातून सावरण्याविषयी बोलतात, यानिमित्तानं ती यशातून सावरण्याविषयी बोलते आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे.
ती सांगते, ‘माङया त्या अल्बमला यश मिळालं, लोक वेडे झाले, तेव्हा प्रचंड आनंद झाला होता. मी काही काळ त्या आनंदातच होते. पण त्याची लोकप्रियता थांबेना. काहीतरी भलतंच प्रचंड घडायला लागलं. सुरुवातीला मला त्या सा:याचं फार अप्रूप वाटलं. आपल्या यशाचं अप्रूप वाटलं. आणि मग एका टप्प्यानंतर मात्र मला त्या सा:याची प्रचंड भीती वाटू लागली.
ते सारं यश, त्या सा:या कौतुकाच्या बातम्या, ते अतीच मोठं होणं मला जसजसं घेरायला लागलं तसतशी मला भीतीच वाटू लागली. प्रश्न पडायला लागला की, मी या यशातच अडकले तर? यापुढे मला काही सुचलंच नाही तर? लोकांना आवडेल आणि मलाही आवडेल असं रिअॅलिस्टिक तरीही क्रिएटिव्ह असं मला काही सुचलंच नाही आणि मी या कौतुकातच हरवून गेले तर?
या प्रश्नांनी मला हादरवलं, भीतीच वाटली.
आणि मग स्वत:ला तोडलं त्या यशापासून. आपल्या अल्बमच्या 3क् मिलियनहून अधिक कॉपी विकल्या गेल्या ते ठीक आहे, पण आता गप्प बसायचं असं मी ठरवलं. आणि चार वर्षे गप्पच बसले. मी काही केलं नाही. जरा शांत झाले. सुचू दिलं नवीन काहीतरी स्वत:ला. जरा विचार केला. जगणं समजून तर घेतलंच, पण जेवढं समजलं तेवढं लगेच व्यक्त न करता मुरू दिलं स्वत:त आणि मग आता चार वर्षानी मी नवीन अल्बम घेऊन पुन्हा लोकांसमोर येतेय!’
ती सांगतेय ते खरंय. ती सोशल मीडियावरही फार काही अॅक्टिव्ह नव्हती. ती हसून सांगते, मी जरा जुनाट आहे. मला काही कळत नाही, सोशल मीडियातलं. तिथं काय नी कसं बोलतात हेदेखील मला कळत नाही.’
इतकं सगळ्या धावपळीपासून लांब राहून, खरंच शांत वाटतं की लेफ्टआऊट फील येतो, असं पत्रकारांनी विचारलं तर ती म्हणाली, ‘मुळात आपण आपल्यासोबत असलो तर लेफ्टआऊट फील कसा काय येऊ शकतो? आपण स्वत:ला सोडतो आणि भलतंच काहीतरी करतो तेव्हा असं लेफ्टआऊट वाटू शकतं.’
आणि ते कशातून वाटतं, असं विचारलंच तर त्यावर ती जे उत्तर देते ते फार महत्त्वाचं आहे.
ती म्हणते, ‘पैसा, पैशाची चटक लागली की आपण काहीही करायला तयार होतो. पैसा की आपल्याला जे करायचं ते यातली निवड आपण आपली केली की मग बाकीचे प्रश्नच पडत नाही!’
तिचं हे बोलणं ऐकलं तर ते आजच्या काळात अनेकांना जुनाट वाटूही शकतं. पण तीच तर तिची ताकद आहे आणि म्हणूनच तरुण जगात ती आजच्या घडीला बेशुमार लोकप्रिय आहे.
अॅडले.
तिचं नाव हीच तिची खरी ओळख आहे!
- चिन्मय लेले