सो..लेट इट बी!
थोडं अस्ताव्यस्त, थोडं अजागळ, इट्स ओके!
प्रेझेंटेबल असणं, टापटीप दिसणं, नीटनेटकं राहणं इत्यादि इत्यादि गोेष्टी फार महत्त्वाच्या असतात असं तरुण मुलांना सारखं सांगितलं जातं!
तसा प्रयत्न अनेकजण करतातही!
पण सध्या अनेकजणांना हे असं इतकं बांधलेलं जगणंच मान्य नाही.
एखादा अजागळसा ढगळा शर्ट, नाहीतर बनियन, एखादी थ्रीफोर्थ, केस अस्ताव्यस्त असा सगळा तामझाम घेऊन बरेच जण हॉटेलातही जातात आणि फिरायलाही!
त्यांच्या खोलीतही पसाराच असतो आणि लाइफस्टाइलमधेही!
त्यांचं म्हणणं की, एवढी पळापळ कसली?
कशाला पाहिजे सगळं टापटीप नी कशाला शेकडो कपड्यांची गर्दी?
कशाला या भानगडी?
एक कळकट जीन्स, महिनाभर नाही धुतली तरी चालेल इतकी वापरायची. कळकट सॅक, मळकट शर्ट घालून फिरलं तरी काही बिघडत नाही.
जे आहे ते आहे, लेट इट बी. असू द्या.
जरा मनमोकळं, ऐसपैस जगण्याची परवानगी तर द्या स्वत:ला!
वेअर व्हाइट
आहे का पांढरे कपडे घालण्याची हिंमत?
खरंतर सध्या न्यूआन कलर्सची फॅशन इन आहे. जो तो एकदम चमकिले, जोशिले कपडे वापरायचा प्रयत्न करतो..
कॉलेज कॅम्पसमधे तर हा सिझन म्हणजे फुल कलरफुल मामला!
मात्र सध्या एकदम लेटेस्ट कलर खूळ आहे.
त्याचं नाव आहे, वेअर व्हाइट.
खरंतर हे एक चॅलेंजच आहे.
आता पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यात कसलं आलंय चॅलेंज असं वाटू शकतं. पण ते आहे खरं..
म्हणजे काय तर पांढऱ्या रंगाचे कपडे घाला, डिसेण्ट दिसा हा एक मुद्दा आहेच; पण त्यासोबत एक महत्त्वाचा मुद्दा की, तुमचं व्यक्तिमत्त्वच त्या पांढऱ्या कपड्यातून इतकं मॅग्नेटिक दिसलं पाहिजे की तुम्ही वेगळे दिसाल!
त्याचंच नाव वेअर व्हाइट!
पण वाटलं आणि घातले पांढरे कपडे इतकं ते सोपं नाही.
त्यासाठी केसांचा पोत उत्तम हवा, चेहऱ्याचं कॉम्प्लेक्शन, त्वचेचा पोत हे सारं उत्तम जपता आलं पाहिजे. ते तसं असेल तरच पांढरे कपडे घालताना कॉन्फिडण्ट वाटतं असं हा नवा ट्रेण्ड म्हणतो.
त्यामुळे सोशल साइट्सवर याला त्याला आव्हान देत ‘वेअर व्हाइट’ म्हणूनही टॅग करणं सुरू होतं.
पांढरा रंग वेगळ्या अर्थानं फॅशनेबल होतोय हे नक्की!