सोशल मीडियावर आहात?खूप वेळ तिथं असता?मग हे ५ आजारतुम्हाला आहेत का,हे तपासा.कारण सोशल मीडियाचाअतिवापर करणा-या ५ पैकी ४ जणांनाहे आजार घेरत आहेत.
आपण किती आनंदात आहोत, आपण कसे मजेत आहोत, आपण कसे भारी भारी ठिकाणी सतत प्रवास करत असतो, आपण किती सुगरण आहोत, आपण किती हटके आहोत, आपण किती जगाची काळजी वाहतो, आपण किती सजग नागरिक आहोत आणि असं बरंच काही इतरांना ‘दाखवून’ स्वत:चा इगो चुचकारत सोशल मीडियावर अनेकजण वावरतात; पण सतत असं हॅपनिंग लाइफ इतरांना दाखवण्याचाही ताण येतो आणि बाकीच्या उरलेल्यांना भलताच स्ट्रेस येतो तो याचा की, आपल्याकडे असलं काही नाही. आपलं आयुष्य फारच कोमट आहे.हा ताण दिसत नाही, पण तो असतो. आपल्याही नकळत आपल्या मनावर स्वार होतो. कधी मनाला सुख वाटतं तर कधी फार दु:खही होतं ते इथंच. आपल्या फोटोला अपेक्षित लाईक्स मिळाले नाही इथपासून आपण लिहितो ते कुणीच वाचत नाही इथपर्यंत, ते आपल्याला कुणी भाव देत नाही, तमका कधीच लाइक करत नाही. ढमका कायम टोमणेच मारतो इत्यादी गोष्टींचा कळत नकळत सोशल मीडिया यू्जरच्या मनावर येतोच. आणि ताण असला की त्याचे दुष्परिणाम मागोमागा आलेच. समाज माध्यमांच्या अतिरेकी वापराचे, त्यातून येणाºया ताणाचे दुष्परिणाम आता दिसायला लागले आहेत.रॉयल सोसायटी फॉर पब्लिक हेल्थने जो अभ्यास केला त्यात त्यांनी यूजर्सवर होणारे ५ ठळक दुष्परिणाम नोंदवले आहेत-१) नैराश्य आणि अस्वस्थता२) झोपेची समस्या३) शरीराविषयीच्या अनुचित संकल्पना अर्थात बॉडी इमेज४) सायबर बुलिंग किंवा अभासी जगातला छळ५) फोमो म्हणजेच फिअर आॅफ मिसिंग आउटया पाच गोष्टी आपल्याही नकळत आपल्याला कशा त्रास देत आहेत हे जरा तपशिलात बघू..नैराश्याच्या आॅनलाइन गर्तेतली हतबलताप्रत्येक सहा व्यक्तींपैकी एक व्यक्तीला नैराश्य आणि अस्वस्थता यांनी ग्रासलेलं आहे. या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की सोशल मीडिया वापरणाºया ५ पैकी ४ जणांना कधी ना कधी नैराश्य आणि अस्वस्थतेला सामोरं जावं लागलेलं आहे. जर सोशल मीडिया हे माणसांना एकमेकांशी जोडून संवाद साधण्याचं, मनोरंजनाचं, मनातल्या गोष्टी व्यक्त करण्याचं आणि अभिव्यक्तीचं माध्यम आहे तर मग हा ताण आणि हे नैराश्य का? आणि कुठून निर्माण होतं? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. १६ ते २४ वयोगटाला तरुण-तरु णींमध्ये अति काळजी, लहानसहान प्रसंगात पॅनिक होण्याची सवय, जरासाही ताण सहन न होणं अशा अनेक गोष्टी या सर्वेक्षणात ठळकपणे समोर आल्या आहेत. याखेरीज मानसशास्त्रीय भाषेत जनरलाईज्ड एन्झायटी डिसआॅर्डर, पॅनिक डिसआॅर्डर, सोशल एन्झायटी डिसआॅर्डर आणि ओसीडी (आॅब्सेसिव्ह कम्पिल्सव्ह डिसआॅर्डर) यांचंही प्रमाण समाज माध्यमांचा सातत्याने वापर करणाºयांमध्ये किंवा सोशल मीडियाचं व्यसन लागलेल्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतं. सर्वेक्षणकर्ते सांगतात, ज्या व्यक्ती दोन तासांपेक्षा जास्त काळ फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर असतात त्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे.सगळ्यात मोठा धोका म्हणजे सोशल मीडियाचं व्यसन असलेल्यांच्या मनात सतत स्पर्धा आणि तुलना चालू असते. कोण कुठे काय करतंय, कसले फोटो टाकतंय, कुठे फिरायला गेलंय, आनंदी आहे की दु:खी यावरून आपण स्वत: आनंदी आहोत की नाही हे अनेक लोक त्यांच्याही नकळत ठरवू लागले आहेत. त्यातून मग सतत इतरांशी स्पर्धा आणि तुलना. त्यामुळे मनावर विचित्र ताण साठायला सुरु वात होते. आपण काहीच मज्जा करत नाही किंवा माझ्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा कमी आनंद आहे इथपासून ते मिळणाºया प्रत्येक लाइक आणि कमेण्ट्पर्यंत. प्रत्येक गोष्ट इतरांवर अवलंबून ठेवणं सुरु होतं. खरं तर स्पर्धा आणि तुलना हा माणसाचा मूलभूत स्वभाव आहे. उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसे? इथपासून अनेक गोष्टींच्या बाबत माणसं त्यांच्याही नकळत स्पर्धा आणि तुलना करत असतात; पण सोशल मीडियाचा वेग, इतरांच्या आयुष्यात काय चालू आहे याच्या सतत मिळणाºया नोंदी या सगळ्यामुळे हा ताण झपाट्यानं वाढत जातो. तुलना करण्याची सवयही तीव्र होत जाते. अनेक तरुण नैराश्यात ढकलले जातात. त्यातूनच मग फेसबुक डिप्रेशन हा मानसिक आजार जन्माला आला आहे. सोशल होताना, एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी धडपडताना मन प्रसन्न राहण्यासाठी जे जे म्हणून आपण करणं अपेक्षित असतं, तेच करणं अनेकजण विसरून जातात. त्यांचा सर्वाधिक वेळ सोशल मीडियातच जातो. मन-मेंदू आणि चित्त सतत मोबाइलच्या स्क्रीनमध्ये अडकून पडल्यानं घरातले, आई-बाबा काही सांगत असले तरी ते अनेक मुलांच्या मेंदूपर्यंत पोहचत नाही. तेच पालकही सोशल मीडियात हरवलेले असतील तर त्यांना मुलांचे प्रश्न ऐकू येतात, पण समजत नाहीत.दुसरीकडे इतरांचे प्रणय आॅनलाइन जगतात बघता बघता अनेकजण स्वत:च्या आयुष्यातली प्रणयाची ऊब विसरू लागले आहेत. एकमेकांवर प्रेम नसतं असं नाहीये, पण स्पर्शाची गंमत विरत जाते. ते प्रेमही आॅनलाइन, जगजाहीर व्यक्त होऊ लागतं. माणसं एकटी होतात आणि काहीशी एकाकीही! निराशेने ग्रासली जातात. ही निराशा घालवायला मग पुन्हा सोशल मीडियाच्याच छायेत जातात. तिथं आनंद मिळत नाही. नैराश्याचे फास मात्र आवळले जातात. आणि हे सारं आपल्याबाबतीतही होतंय हे अनेकजण मान्यही करत नाहीत.झोप? ती अनेकांना येतच नाही!झोप आणि मानसिक आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. मनावर ताण असेल, नैराश्यानं ग्रासलेलं असेल तर अनेकांच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो. हे एक विचित्र चक्र आहे. झोप नीट झाली नाही की थकायला होतं, थकल्यामुळे रोजच्या कामात अडथळे येतात. काहीही करू नये असं वाटतं, अंग दुखतं, हे असं सातत्याने होत राहिलं तर त्यातून स्व-प्रतिमा डळमळीत व्हायला लागते. आपण एखादी गोष्ट चांगली करू शकतो किंवा नाही याबद्दल मनात संभ्रम निर्माण होतात, त्यातून काळजी आणि ताण वाढतो. तो वाढला की पुन्हा त्याचा झोपेवर विपरीत परिणाम होतो. झोप लागते; पण झोप झाल्यासारखंच वाटत नाही, फ्रेश वाटत नाही, झोपावंसं वाटतं, झोपच येत नाही, दचकून जाग येते असं सांगणारी कितीतरी माणसं आपल्या अवतीभोवती असतात. त्यातले अनेकजण ताणाशी झगडत असतात. आणि हा अभ्यास म्हणतो की मनावरचा हा ताण आता सोशल मीडियाच्या व्यसनातून आलेला असतो.रोजच्या जगण्यातल्या निरनिराळ्या गोष्टी सुरळीत पार पाडण्यासाठी झोपेची नितांत आवश्यकता असते. तरुणांना तर फारच आवश्यक. मेंदू आणि शरीर सगळंच विकसित होत असतं. प्रौढांपेक्षा १-२ तास जास्त झोप मिळणं त्यांच्यासाठी आवश्यक असतं. पण होतं उलटंच. जेवढी झोप मिळायला हवी तेवढी तर मिळत नाहीच, उलट अनेकांना रात्री लवकर झोपणं कमीपणाचं वाटतं. आपण रात्री आॅनलाइन असतो हे दाखवण्याचा आटापिटा करणाºयांमध्ये तरु णाईची संख्या प्रचंड. रात्री जागरण करणं अनेकांना फॅशनेबल वाटतं. यातूनच मग लहान वयात मानसिक ताण, मधुमेह, रक्तदाब, अतिजाडेपणा, हृदयरोग यांसारख्या समस्या निर्माण होतात.झोपताना डोक्यावर पांघरुण घेऊन मोबाइल, टॅब यावर काहीबाही बघणारे, चॅट करणारे, वाद घालणारे अनेकजण. पुन्हा सकाळी उठल्याबरोबर आधी मोबाइल चालू करून सोशल मीडियावर जाणारे तर बहुसंख्य. हे करत असताना आपण आपल्या मेंदूला किती थकवतो हेच कुणाच्या लक्षात येत नाही. झोप फक्त बाह्य शरीराला आवश्यक असते असं नाही, ती मेंदूला, मनाला, डोळ्यांनाही गरजेची असते. शरीराची ही गरज आपण पूर्ण करत नाही. शरीर अस्वस्थ होतं. पाठोपाठ येतात निरनिराळे आजार. ५ पैकी १ तरी. तरुण/तरु णी रात्री झोपेतून उठून मोबाइल चेक करतो/ करते. अशा पद्धतीने रात्री झोपेतसुद्धा फेसबुकवर कुणी काय टाकलंय, व्हॉट्सअॅपवर काय मेसेज आलेत आणि इन्स्टाग्रामवर किती जणांना फोटो आवडले हे बघण्यासाठी उठणं ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा अर्थ डोक्यातून सोशल मीडिया जातच नाही. जागे असा किंवा झोपलेले, आपण सतत सोशल मीडियाचाच विचार करत असतो. सतत त्या आभासी जगाच्या धुंदीत आपल्याला रहायचं असतं. याला व्यसन नाही तर दुसरं काय म्हणणार? आणि हे व्यसन झोप उडवतंच.बॉडी इमेज? मैं एैसा क्यूं हू..?किशारवयीन आणि विशीतल्या तरु ण-तरु णींसाठी सध्या सगळ्यात काळजीचा आणि चर्चेचा विषय आहे तो म्हणजे बॉडी इमेज. सोशल मीडियावर मी दिसते कशी? मला लोक काय म्हणतात? माझा चेहरा, बांधा, शरीराची वळणं या सगळ्याबाबत न्यूनगंड नाहीतर प्रचंड गोंधळ तरु ण- तरु णींमध्ये बघायला मिळतो. जवळपास १० पैकी ९ मुली स्वत:च्या शरीराबद्दल नाखूश असतात. शरीराची मापं, आकार, ठेवण, रंग या सगळ्या गोष्टींविषयी ही नाराजी दिसते. आणि अनेकदा स्वत:चा राग येण्याइतपत, तिरस्कार करण्याइतपत ही नाराजी दिसते.फेसबुकवर दररोज प्रत्येक तासाला जवळपास १० दशलक्ष फोटो अपलोड होतात. त्यामुळे मी कशी दिसते आणि इतर कसे दिसतात अशी तुलना तरुण मुलं, विशेषत: मुली सतत करत असतात. जे तरु ण सोशल मीडियावर अजिबातच नाहीत किंवा फार कमी काळासाठी असतात त्यांच्यात स्वत:च्या शरीराचा स्वीकार अधिक सशक्त पद्धतीने होतो. त्याउलट सतत सेल्फी काढून त्या सोशल मीडियावर अपलोड करणा-या तरुण-तरुणींमध्ये शरीराचा स्वीकार नसतो. त्यांची स्व-प्रतिमाही अनेकदा भंगलेली असते. सर्वेक्षणानुसार मुलींना त्यांच्या त्वचेचा रंग, नाक-डोळे, केस या गोष्टी बदलून मिळाल्या तर हव्या असतात. त्या