- निकिता महाजन
लहान मुलं पाहून पाहून शिकतात, हे वाक्य तर आपण ऐकलेलं असतंच; पण तरुण मुलं?- ते तर कुणाचंच ऐकत नाहीत! असं जोरदार वाक्य तुमच्या मनात आलं असेल तर थांबा, कारण वाक्यात ठसका असला तरी आपल्या मतांवर माध्यमांचा, आता तर सोशल मीडियाचा, व्हॉट्सअॅप स्कूलचा आणि जाहिरातींचाही प्रचंड प्रभाव असतो. आपण सतत जे स्क्रीन पाहतो, म्हणजे जी दृश्यं सतत आपल्या डोळ्यांसमोर असतात, मेंदूवर आदळतात त्यांचा आपल्यावर काय परिणाम होतो याचा सामाजिक अभ्यास आता जगभर सुरू आहे. मात्र त्यातला एक अत्यंत छोटासा पण टोकदार भाग म्हणजे फॅशन. अनेक गोष्टी आपण फॅशन म्हणून स्वीकारतो, त्या करतो, त्याच आपल्याला करायच्या आहेत म्हणून घरच्यांशी भांडतो, त्याला आधुनिक म्हणतो आणि तीच आपली आवड असंही आपणच ठरवून टाकतो.मात्र ते सारं खरंच आहे, असं नाही. कारण त्या सार्या फॅशन आपल्याही नकळत आपल्यावर सिनेमा, जाहिराती, बाजारपेठ यांनी लादलेल्या असतात. आणि त्या आपण आपली आवड म्हणून करत बसतो. खरं नाही वाटत ना, एक लिटमस टेस्ट म्हणून फक्त या 7 गोष्टी तपासून पाहा. त्या आपण करतो, फॅशनेबल म्हणून वावरतो पण त्या आपल्या फायद्याच्या आहेत का, हे कधीही तपासून पाहत नाहीत. उलट त्या हानिकारकच आहेत, हे कुणीही अगदी कॉमन सेन्स म्हणून सांगेल; पण आपण मात्र त्या स्वीकारताना या सार्यांचा विचारच केलेला नाही.चेक करून पाहा. या 6 गोष्टीच कशाला आपण रोजच्या जगण्यात ताळा करून पाहिला तरी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण आवश्यक म्हणून करतो, पण त्या अनावश्यकपणे आपल्याही नकळत आपल्यावर लादल्या गेलेल्या आहेत, त्या आपणही स्वीकारल्या आहेत. पण त्या फायद्याच्या नाहीत.ही घ्या लिस्ट.
1. मोठ्ठे कानातले
अलीकडेच दीपिका पदुकोणच्या लग्नाचे, स्वागत समारंभाचे फोटो आपण पाहिले. त्यात तिनं कानात घातलेले झुमकेही पाहिले. हे भलेमोठे. वजनदार. अनेक सिरीअल्स, सिनेमातही असेच कानातले दिसतात. आता तरी ट्रेनमध्ये आणि रस्त्यावरच्या ठेल्यांवरही असे कानातले सहज उपलब्ध दिसतात. स्वस्तही असतात. फॅशन म्हणून अनेकजणी असे कानातले घालतात. पण त्यानं कान दुखणं, कानाखालचा मानेचा भाग दुखणं, कानाची छिद्र मोठी होणं असे अनेक त्रास होतात; पण फॅशन म्हणून मोठ्ठी कानातली घातली जातात.
2.स्किनी जिन्स
एकतर बारीक होण्याची होड, त्यात स्किनी जिन्स घालण्याची हौस. या अंगावर शिवल्यासारख्या जिन्स घालायला हव्यात हे आपल्याला जाहिरातींनी सांगितलं. आपणही आपल्याकडच्या उष्ण वातावरणात, जिन्स मॉडर्न आहे आणि आपणही मॉडर्न आहोत म्हणत घालतो. परिणाम असा की स्किन रॅश, फंगल इन्फेक्शन, घामाचा त्रास आणि पुरळ, चट्टे असे अनेक प्रकार आढळतात. हे आपण का करतो असं मात्र कुणी कुणाला विचारत नाही.
3.कॉर्सेटफिट दिसा, पोट दिसणार नाही असे आतून घालायचे कपडे म्हणजे हे कॉर्सेट. ते आता टीव्हीवर तातडीनं फोन करा, वस्तू मागवा अशा टेलिमार्केटिंग शोमध्येही मिळतात. अनेकजणी ते मागवतात. मात्र त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, आपल्या बॉडी इमेजवर काय परिणाम होतो हे मात्र समजून घेत नाहीत.
4. सिंथेटिक फॅब्रिकचकचकीत, अंगाला चिकटणारं सिंथेटिक फॅब्रिक चांगलं दिसतं म्हणून घातलं जातं. पण त्यानं त्वचेला काय अपाय होतो, ते टोचतं का रुततं का, पायांना काचतं का, याचा काहीही विचार केला जात नाही. त्यामुळे रोडसाइड फॅशनेबल सिंथेटिक कपडे घालताना जरा विचार करा. चमकतं ते चांगलंच नसतं.
5. हाय हिल्सआता हाय हिल्स घालू नये हे तरुण मुलींना पटलंय कारण त्यानं टाचा दुखतात, कंबर दुखते. भयंकर वेदना होतात. पाय घसरून पडले तर पडलेच. मग काही विचारायलाच नको. त्यामुळे हाय हिल्स घालणं ना फॅशनेबल आहे ना मॉडर्न हे लक्षात ठेवलेलं बरं.
6. पिअरसिंग आणि टॅटूपिअरसिंग आणि टॅटू करण्याची फॅशन आहे. विराट कोहली ते हार्दिक पांडय़ा ते तमाम सेलिब्रिटी आताशा टॅटू करतात. मात्र आपणही ते करणार असू तर त्यातली स्वच्छता, सुरक्षितता याचं भान ठेवा. ते बिघडलं तर टॅटू करण्यातून आपण नस्ती आफत ओढावून घेऊ शकतो.