‘कोणी नोकरी देता का नोकरी... चार वर्षं, लाखो रु पये खर्चून, पालकांच्या आग्रहाखातर, मामा-काकांची उदाहरणं बघून, कुठल्याशा नातेवाइकांचे सल्ले घेऊन, मित्रांचं ऐकून, क्वचित प्रसंगी स्वखुशीने आणि बहुतेकदा दुसरं काहीच माहीत नसल्यानं इंजिनिअर झालेल्या तरुणाला कुणी नोकरी देता का नोकरी?- असं आजचं चित्र आहे.इंजिनिअर झालेला हा तरुण आईवडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली, शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाखाली दबून गेलाय. मनासारखं काम, पगार हे सर्व मिळण्याची अपेक्षा सोडून कसलीही का असेना पण त्याला नोकरी हवी आहे.हे वर्णन अतिरंजित वाटेल, पण ते आजचं वास्तव आहे.‘आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ म्हणजेच ‘एआयसीटीई’ (अकउळए) या भारतातील तांत्रिक शिक्षणविषयक सर्व बाबींचे नियोजन, नियमन आणि नियंत्रण करणाºया संस्थेमार्फत प्रसिद्ध झालेली ही गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहा.हे आकडेच वास्तव सांगतात. आणि ते वास्तव फार वाईट आहे.
२०१२ ते २०१६ या चार वर्षांत देशातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण उत्तीर्ण झालेल्या आणि नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी टक्केवारी जेमतेम ४० टक्के इतकी आहे. देशभराचा विचार केला असता सरत्या शैक्षणिक वर्षात २९,९८,२३८ एवढ्या प्रचंड संख्येने इंजिनिअरिंगच्या जागा उपलब्ध होत्या. यापैकी १५,०६,९७७ इतक्याच जागा भरल्या गेल्या. म्हणजेच पदविका, पदवी आणि पदव्युत्तर मिळून जवळपास निम्म्या जागा या रिकाम्याच राहिल्या. गेल्या काही वर्षांत रिकाम्या राहणाºया या जागा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. परंतु इंजिनिअर झालेल्यांपैकीही जेमतेम ४० टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळाली हे चित्र जास्त भयावह आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती ही अधिक गंभीर आहे, कारण गेल्या वर्षी उपलब्ध ३,४४,८९८ जागांपैकी केवळ १,६१,९३५ इतक्याच म्हणजे निम्म्याहून कमी इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा भरल्या गेल्या. गेल्या चार वर्षांत दर १०० उत्तीर्णांपैकी केवळ सरासरी २५ जणांनाच नोकरी मिळाली आहे. या सगळ्यात ती नोकरी कोणत्या स्वरूपाची आहे? तिचा घेतलेल्या शिक्षणाशी संबंध कितपत आहे? दर्जा काय? त्यानुसार मिळणारा पगार किती? - हे सारे महत्त्वाचे प्रश्न लक्षात घेतलेले नाहीत. त्यांचा विचार केला असता एकूण विषयाची भीषणता अधिक तीव्र होऊ शकते.आपण इंजिनिअरिंग करत असू किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार असू तर ही माहिती आपल्या हाताशी असलेली बरी!
(या आकडेवारीसह देशातील तसेच राज्यातील उत्तीर्ण आणि नोकरीप्राप्त विद्यार्थ्यांची आकडेवारी तसेच देशातील अभियांत्रिकी शिक्षणाविषयीची इतर सर्व माहिती www.aicte-india.org या वेबसाइटवर पाहता येईल.)