प्रवीण दाभोळकर
भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न एकीकडे आणि त्याचवेळी तारुण्याला पोखरणारी व्यसनांची कीड दुसरीकडे ! हा प्रश्न गंभीर आहे. आपल्या देशात नशा करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्यांचं प्रमाण जास्त आहे. ज्या वयात शरीर सुदृढ ठेवायचं त्याच वयात व्यसनाच्या विळख्यात ही मुलं ओढली जात आहेत.
तरुणांमधील वाढत्या व्यसनांचं हे प्रमाण लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभाग आणि नशाबंदी मंडळातर्फे युथ अगेंस्ट लिकर, टोबॅको, ड्रग्ज्सच्या विरोधात (एलटीडी) एक मोहीम उघडण्यात आली आहे. ‘मागणीच बंद केली तर पुरवठाही बंद होईल’ हे ध्यानात ठेवून राज्यातून दरवर्षी ६० हजार विद्यार्थी समाजात व्यसनांसंदर्भात जनजागृती करणार आहेत.
२०११ साली मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू आणि सध्याचे नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष राजन वेळूकर यांनी ‘यूथ अगेंस्ट एलटीडी’ या मोहिमेची घोषणा केली. मुंबईतल्या महाविद्यालयांपासून या मोहिमेचा श्रीगणेशा झाला. चार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविण्यात आले. व्यसनमुक्ती करण्याची शपथ घेण्यात आली. व्यसनांबद्दल द्वेष निर्माण झाला तर मागणीही कमी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्रातील प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्र, कोकण, ठाणे, विदर्भ, मुंबई, मराठवाडा या सात विभागांची निवड करण्यात आली आहे. दहा विद्यापीठांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यातून पंचवीस महाविद्यालये ‘युथ अगेंस्ट एलटीडी’ या प्रकल्पासाठी निवडण्यात येणार आहेत. निवड झालेल्या महाविद्यालयांतून वीस जणांची टीम (सर्व जाती, धर्मातील १० मुले, १० मुली, प्राध्यापक) निवडण्यात येणार आहेत. निवड झालेले विद्यार्थी आणि प्राध्यापकांना रीतसर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पथनाट्य, चित्रपट, चर्चासत्र, मोबाइल मेसेजेसच्या माध्यमातून ही मंडळी समाजापर्यंत पोहोचणार आहेत. स्वत:हून पुढाकार घेणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. या चळवळीतले विद्यार्थी आपले महाविद्यालय, सभोवतालचा परिसर, सामाजिक मंडळांमध्ये जाऊन जनजागृती करतील. या संकल्पनेच्या माध्यमातून व्यसनाविरोधातील फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. चेहरे रंगवून, पोस्टर्सच्या माध्यमातून सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरेंसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
मागणीच नसेल तर पुरवठाही बंद होईल. म्हणून विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती करून व्यसनांच्या मुळावरच घाव घालण्याचा आमचा मानस आहे.
- वर्षा विद्या विलास, सरचिटणीस, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य
व्यसनांचा धोका
वर्षाला ३३ लाख व्यक्ती दारूमुळे मृत्युमुखी पडतात. भारतात प्रत्येक १६ सेकंदांना एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करते, तर दिवसभरात हा आकडा ५,५०० मुलांपर्यंत जातो. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधीन गेलेली आहेत. १९६० मध्ये दारू पिण्याचे वय २८ वर्षे होते, तर सध्या ते वय १८ वर्षांपर्यंत आले आहे.
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)