- गजानन दिवाण
परिस्थितीमुळे म्हणा वा अन्य कुठल्या कारणामुळे जीवनात एखादी गोष्ट करायची राहून गेली तर?
राहून गेलं म्हणून खंत करीत आयुष्याचं वाटोळं करायचं की संधी मिळेल त्यावेळी ती गोष्ट पूर्ण करायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही मिळत, हे मात्र खरं!
वय झाले म्हणून संधी हुकली असं रडत बसण्यात काय अर्थ ? वय कुठलंही असो. आवश्यकता असते ती इच्छा-आंकाक्षा पूर्ण करणाºया जिद्दीची. या जिद्दीतून आकाराला आलेलं अनेकांचं आयुष्य प्रेरणा देत असतं. सारं काही संपलं असं वाटत असतानाच जगण्याचा एक किरण बनते ही उमेद. तरूण म्हणजे कोण? अमका-तमका वयोगट ?
नुस्तं शारीरिक वय तरुण असून भागत नाही तर त्या वयात असावी अशी महत्त्वकांक्षा आणि कष्ट करण्याची तयार ज्याची दुर्दम्य असतेतो खरा तरुण. नेपाळमधील ६८ वर्षांच्या तरूणाची अशीच एक कहाणी सर्वांना प्रेरणादायी ठरावी.
दुर्गा कामी. नेपाळची राजधानी काठमांडूपासून २५० किलोमीटरवर वसलेले सिंगचा हे त्यांचे छोटंसं गाव. सहा मुलं आणि आठ नातू असा त्यांचा परिवार. सध्या ते एका खोलीच्या घरात एकटेच राहतात. प्रचंड गरिबीमुळे लहान असताना शाळेचं तोंड पाहता आलं नाही. अचानक पत्नीचा मृत्यू झाला. एकटेपणा खायला उठू लागला. काय करणार? लहान असताना जे करता नाही आलं ते करण्याचे ठरवलं. गावातल्याच कहाराय या प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. सात ते आठ वर्षे वय असलेल्या मुलांच्या वर्गात ते जाऊ लागले. आठवड्याचे सहाही दिवस शाळेत. वर्गातील कुठलीही गोष्ट चुकवायची नाही. अगदी गृहपाठापासून ते खेळाच्या वर्गापर्यंत. आता प्राथमिक शाळेतून ते कला भैरव या माध्यमिक शाळेत जात असून दहावीचे धडे गिरवत आहेत. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कुठलंही स्वप्न अधुरं राहत नाही. कामी यांना आता अखेरच्या श्वासापर्यंत शिकायचं आहे. शिकण्यासाठी वयाचा अडथळा कधीच नसतो, हे त्यांना आपल्या कृतीतून दाखवून द्यायचं आहे.
त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची दखल रॉयटर्सने अलिकडेच घेतली. ‘रॉयटर्स’ला दिलेल्या मुलाखतीत कामी म्हणतात, ‘माझ्यासारखा पांढºया शुभ्र दाढीचा म्हातारा शाळेत शिकताना पाहून कोणाला प्रेरणा मिळत असेल तर आणखी काय हवं?’