- प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षा असो, की नोकरी. त्यासंदर्भात वयाची अट शिथील करावी अशी मागणी उमेदवारांकडून नेहमीच होत असते.
सर्वसाधारण गटातील उमेदवारांपेक्षा मागासवर्गीय गटातील उमेदवारांसाठी ही अट शिथील केलेलीही आहे.
आता आदिवासी विभागातील नोकर भरतीसाठीही वयाची अट शिथील केली जाण्याची शक्यता आहे.
असे झाले तर अनेक तरुणांना त्याचा लाभ मिळणार आहे.
शासकीय आर्शमशाळेमध्ये मानधन- रोजंदारीवरील कर्मचार्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यासाठीची मागणी बरीच जुनी आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास विभागातील आगामी नोकरभरतीत वयाची अट शिथिल करण्याबाबत तसेच शैक्षणिक पात्रतेच्या अटीतही शिथिलता देण्याबाबत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा व विभागाच्या प्रधान सचिवांनी मान्यता दिल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र राज्य तासिका- मानधन शिक्षक, स्त्री अधीक्षिका वर्ग चार कर्मचारी संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे.
यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यासह आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांची नुकतीच भेट घेऊन लेखी निवेदन दिले.
विष्णू सावरा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकासमंत्री, प्रधान सचिव व आदिवासी विकास आयुक्त यांच्याशी संघटनेच्या 6 एप्रिल 2017 च्या चर्चेनुसार मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचार्यांची वयाची अट शिथिल करून वयोर्मयादेत न बसणार्या परंतु पूर्वीपासून कार्यरत असलेल्या सर्व वर्ग- 3 व वर्ग- 4 च्या कर्मचार्यांना वयोर्मयादेत सूट देण्यात यावी, अशी मागणी केली होती.
त्यानुसार शासन निर्णय काढण्यात आल्याचे संघटनेचे सचिव एस. पी. गावित यांनी सांगितले.
स्त्री अधिक्षकांना नियमत करणार?
3 एप्रिल 2017 च्या जाहिरातीत स्त्री अधीक्षिका या पदाच्या वयोर्मयादेत न बसणार्या परंतु पूर्वीपासून कार्यरत असलेल्या स्त्री अधीक्षिकांना या जाहिरातीतील वयोर्मयादेत सूट देण्यात येईल, अशी ग्वाही प्रधान सचिवांनी 6 एप्रिल 2017 च्या बैठकीतील चर्चेत दिली असल्याने या पात्र (बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू) असणार्या स्त्री अधीक्षिकांना शासन सेवेत नियमित करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार शासनाने निर्णय काढल्याचे गावित यांनी सांगितले.