बुलढाणा जिल्ह्यातलं मेहकर तालुक्यातलं, हिरवळीनं सजलेलं माझं गाव.. देऊळगाव माळी.
दहावी पास झालो आणि घराबाहेर पडलो. २००८ ची गोष्ट.
लातूर जिल्ह्यात अहमदपूर येथे अकरावीसाठी प्रवेश मिळाला.
अहमदपूर. गाव तसं जास्त मोठंही नाही आणि जास्त छोटंही नाही. मात्र गावात शैक्षणिक वातावरण. कॉलेज होतं. त्यामुळे रूम, मेस आणि दुकानं तशी बरीच. घरभाडं परवडणारं असल्यामुळे खिसाही जास्त रडत नसे.
या गावात मला दोन वर्षांत अनेक अनुभव आले. जिवाला जीव देणारे मित्र मिळाले. उत्तम शिकवणारे शिक्षक भेटले. आपण काही करू शकतो हा आत्मविश्वास मिळाला. आणि वय वर्षे ५ ते १८ वर्षांपर्यंतचे विविध विद्यार्थीही पाहता आले.
मात्र तसे नमुनेही बरेच भेटले. भाडं दोन रूमचं घेत, पण राहावं एकाच खोलीत लागे. घराचं बांधकाम सुरू आहे असं सांगून तसं राहायला भाग पाडणारा घरमालक आम्ही इथेच अनुभवला. उन्हाळ्यात सुट्या नसल्यानं पहिल्यांदा पाणीप्रश्न जवळून पाहिला. २१ दिवसांनी पाणी यायचं. तोपर्यंत आम्हाला पाणी जपून वापरायला लागायचं. आम्ही १०-१० दिवसांनी अंघोळ करायचो. घरमालकीण बार्इंनी संडासला लावलेलं कुलूप पण आम्ही इथेच बघितलं. पाण्याच्या टँकरचा उत्तम व्यवसायसुद्धा असतो हे मला इथंच कळलं.
त्याच काळात प्रत्येक महिना-दोन महिन्यांनी बदललेल्या मेस अजून आठवतात. प्रत्येक मेसला मिळणारी सोडायुक्त चपाती आणि त्यामुळे होणारे पोटाचे आजारही मी तिथे पचवले. (जे कधीच पचायचे नाही.)
माझ्या काखेत गाठ वाढली होती. त्यात पू झाला होता. तेव्हा माझा पार्टनर मला सोडून दुसऱ्याच्या रूमवर झोपायला गेला. आणि नेमकं वाढदिवसाच्या दिवशी आॅपरेशन झालं, तर दवाखान्यात माझा बर्थडे साजरे करणारे मित्रही इथंच भेटले. माझी दुसरी आईच म्हणजे माझ्या मित्राची मामी. जिला आम्ही ताई म्हणतो. तिनं प्रत्येक आजारात मला घरचं जेवण दिलं. माया लावली. अहमदपूरने मला दिलेलं सर्वात सुंदर गिफ्ट आहे.
अहमदपूरहून मी थेट दाखल झालो स्वप्नांच्या आणि शिक्षणाच्या पंढरीत म्हणजे पुण्यात!
पुणे तिथे काय उणे. पुणेरी पाट्या, खमंग मिसळ आणि खास कितीतरी वैशिष्ट्य असलेलं हे शहर. पुण्यात मी कृषी महाविद्यालयात पदवीला प्रवेश घेतला.
इथे सुरुवातीला झालेलं थोडंसं रॅगिंग, कॉलेजबाहेर मिळणारी मिसळ, भेळ आणि भुर्जीच्या गाड्या, शिवाजीनगर आणि राहुल थिएटर हे आमचे सुरुवातीचे सोबती.
इथेसुद्धा अनेक बरे-वाईट, मठ्ठ, लठ्ठ, अवली मित्र भेटले. ती दोस्ती मोलाची. आता सारे पांगले. मी सध्या दिल्लीला पुढील शिक्षणासाठी आलो आहे. इथेही तशाच गमतीजमती!
या शैक्षणिक वाटचालीत गेल्या नऊ वर्षांत मी वेगवेगळी शहरं जवळून पाहिली. प्रत्येकाची एक शैली आहे. खूप भरभरून जगलो. पण एक कळलं की आपला महाराष्ट्र, आपला देश खूप सुंदर आणि वैविध्यपूर्ण आहे. ते आपण जपायला हवं. त्या साऱ्या रंगांची रंगपंचमी ही आपली पुंजी आहे.
- स्वप्नीलकुमार सूर्यकांत वऱ्हाडे
मु. पो. देऊळगाव-माळी
ता. मेहकर, जि. बुलढाणा
छोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी; पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं. आपल्या स्वप्नांचा हात धरून, संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना? कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..? - ते अनुभव शेअर करण्याचा हा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास? आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही? काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण? या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय? तर मग ही एक संधी ! लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.
१. लिहून पाठवणार असाल, तर पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा.
सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरही जरूर लिहा..
पत्ता- शेवटच्या पानावर, तळाशी.
२. इ-मेल- oxygen@lokmat.com