- कलीम अजीम
सुदानच्या सत्तापालटाला महिना उलटून गेला; पण अल सलाह या 22 वर्षीय तरुणीची लोकप्रियता काही कमी झालेली नाहीये. आजही ट्विटर आणि ग्लोबल मीडियाच्या टॉप ट्रेण्डमध्ये अल सलाह आणि तिचं आंदोलन अग्रक्रमात आहे. तिनं जगभरातील युवकांना सुदानी आंदोलनात सामावून घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आर्टिकटेक्चर विद्याशाखेची विद्यार्थिनी असलेली अल रोजच जागतिक मीडियाच्या गराडय़ात दिसते.प्रत्येक मीडिया मुलाखतीत तिला एकच प्रश्न विचारला जातोय की, ‘जगभरात प्रसिद्ध झालीस, तुला कसं वाटतंय?’ यावर तिचं ठरलेलं उत्तर, ‘प्रसिद्धीसाठी मी सरकारविरोधात उतरले नव्हते.’ याच उत्तराला जोडून तिनं सांगितलेलं विधान फार महत्त्वाचं आहे. ती म्हणतेय, ‘गेल्या 30 वर्षापासून सैन्य शासनकाळात सुदानी नागरिक नरकयातना भोगत आहेत, त्यांच्या मुक्तीचा मी आवाज झाले, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.’सुदानचा मुख्य आहार ब्रेड आणि बीन्स आहे; पण गेल्या काही महिन्यापासून देशात ब्रेडचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्याच्या आवाक्याबाहेर दरवाढ झाल्यानं लोकांची उपासमार सुरू झाली. ब्रेड-रोटीचे वाढते भाव, वाढती बेरोजगारी आणि सरकारच्या अमानवीय वर्तनाविरोधात सुदानी नागरिकांनी पुन्हा एकदा विद्रोह केला.डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाने एप्रिल येता अधिक उग्र स्वरूप धारण केलं. 6 एप्रिलला सुदानची राजधानी खार्तूम शहरात हजारो आंदोलक जमा झाले. शहराचं सिटी सेंटर क्र ांतिकारी घोषणांनी दुमदुमत होतं. आंदोलनात युवकांसह ज्येष्ठ नागरिकही ‘सैन्य शासन नको’ असा संदेश लिहिलेले फलक हातात घेऊन घोषणा देत होते. दुसरीकडे सैन्य सरकारविरोधातील विद्यार्थी, डॉक्टर, इंजीनिअर, वकील आणि शिक्षकांनीदेखील आपला सहभाग नोंदवला.11 एप्रिलला आंदोलकांकडून खार्तूम शहरातील सिटी सेंटरसारखे कितीतरी चौक आणि मध्यवर्ती भागातील महत्त्वाचे रस्ते रोखून धरण्यात आले. शहरात एकच हाहाकार उडाला. सर्व मूलभूत सुविधा पुरविणारी प्रतिष्ठाने बंद करण्यात आली. मोठय़ा संख्येनं जमाव रस्त्यावर येत सैन्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. चौकाचौकात युवकांनी सरकारविरोधात क्र ांतिकारी गीते गाऊन विरोध सुरू केला.त्याच दिवशी एक सभेत अल सलाह एका कारच्या छतावर उभी राहून सरकारचा विरोध करत कविता गात होती. ‘बंदुकीच्या गोळीनं भीती वाटत नाही, तर गप्प असलेल्या लोकांची जास्त भीती वाटते.’ अशा प्रकारच्या कितीतरी कविता ती गात होती. तिच्या प्रत्येक कवितेला प्रतिसाद म्हणून तिचे सहकारी ‘क्र ांती झालीच पाहिजे’ असा सूर लावत होते.डोक्यावर पदर, कानात लटकणार्या मोठय़ा रिंग्ज आणि अंगात पांढर्या रंगाचं उपरणं (बुरखा) असलेली ही मुलगी सुदान क्रांतीची प्रतीक झाली. तिनं आपला हा फोटो ‘माझा आवाज दडपला जाऊ शकत नाही’ ((My voice cannot be suppressed) अशा स्लोगनसह ट्विटरवर पोस्ट केला. सोशल मीडियातून तिच्या फोटोवर लाखो लोकांनी प्रतिक्रि या नोंदवल्या. अनेक ट्विटर यूझर्सनी तिचा तो रिव्होल्युशनरी व्हिडीओ रिट्विट करत अल सलाहला जगभरात पोहोचवलं.
सुदानच्या या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. दि गार्डियनच्या मते, दोन-तृतीयांश महिला या विद्रोहात सामील झालेल्या होत्या. अल सलाहने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, ‘‘सुरु वातीला केवळ सहा मुली माझ्यासोबत होत्या, त्यांच्यासोबत मी कविता वाचनाचे जाहीर कार्यक्र म शहरात सुरू केलं. हळूहळू मोठा जनसमुदाय आमच्या पाठिशी उभा राहिला.’’ महिलांच्या लक्षणीय संख्येमुळे हे आंदोलन यशस्वी होऊ शकलं असंही ती म्हणते. बहुसंख्येनं जमा झालेल्या सुदानी स्रियांशिवाय आम्ही क्र ांती करू शकलो नसतो, असंही ती म्हणते.अल सलाहची आई एक फॅशन डिझाइनर आहे. वडील कन्स्ट्रक्शन कंपनी चालवितात. घरचं स्वच्छंदी वातावरण मला सामाजिक कार्याकडे घेऊन गेलं, असं तिनं अल झझिराच्या मुलाखतीत सांगितलं. त्या आंदोलनानंतर 12 एप्रिलला सुदानचे सैन्य शासक उमर अल बशीर यांची 30 वर्षाची सत्ता उलथवली गेली. राष्ट्रपती बशीर यांना अटक करण्यात आली.तख्तपालट होताच सैन्यानं सुदानची सत्ता हातात घेतली. सुदानी नागरिकांनी सैन्य शासनांचा विरोध केला आहे. त्यांना लोकशाहीवर आधारित सत्ता आपल्या देशात हवी आहे. अल सलाहसोबत अनेकजण सैन्याशी बोलणी करत आहेत. देशात लोकशाही सरकार स्थापन व्हावे, अशी तिच्यासहित अनेकांची इच्छा आहे.सत्तांतर झालं तरी फारसा फरक सुदानमध्ये पडलेला नाही. कारण सैन्यानं सत्ता ताब्यात घेतली आहे. दोन र्वष सत्ता सैन्याकडे राहील आणि त्यानंतर निवडणुका घेतल्या जातील असं सेनेनं जाहीर केलं आहे. त्यामुळे येत्या काळात सुदानी आंदोलनकर्ते आणि सैन्यात संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.