मेघना ढोके / कलीम अजीम
सुदानमध्ये सत्तापालट झाले आणि त्याचा चेहरा ठरली अल सलाह ही 22 वर्षीय तरुणी. आज जगभरातल्या मीडियात तिच्या मुलाखती छापून येतात. व्हिडीओ व्हायरल होतात.कारच्या छतावर उभं राहून सरकारचा विरोध करत ती कविता गात होती. ‘बंदुकीच्या गोळीनं भीती वाटत नाही, तर गप्प असलेल्या लोकांची जास्त भीती वाटते.’असं ती म्हणाली, तेव्हा बाकीचे तरुण क्रांती झालीच पाहिजे म्हणून तिला साथ देत होते. आता तिला एक प्रश्न हमखास विचारला जातो, ‘तू जगभरात फेमस झालीस, तुला कसं वाटतंय?’ यावर तिचं ठरलेलं उत्तर, ‘प्रसिद्धीसाठी मी सरकारविरोधात उतरले नव्हते. गेली 30 वर्षे आम्ही सुदानी सैन्य शासनकाळात नरकयातना भोगत आहोत, त्यांच्या मुक्तीचा मी आवाज झाले, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.’ती चेहरा असली तरी सार्या सुदानमध्ये तरुणांनी मोठं बंड केलं. त्याचं निमित्त ठरलं महागाई.सुदानचा मुख्य आहार पाव आणि बीन्स (कडधान्य) आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून देशात पावाचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्याच्या आवाक्याबाहेर दरवाढ झाल्यानं लोकांची उपासमार सुरू झाली. पाव-रोटीचे वाढते भाव, वाढती बेरोजगारी आणि सरकारच्या अमानवीय वर्तनाविरोधात सुदानी नागरिकांनी पुन्हा एकदा विद्रोह केला.
डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाने एप्रिल येता अधिक उग्र स्वरूप धारण केलं. 6 एप्रिलला सुदानची राजधानी खातरुम शहरात हजारो आंदोलक जमा झाले. शहराचं सिटी सेंटर क्र ांतिकारी घोषणांनी दुमदुमत होतं. आंदोलनात युवकांसह ज्येष्ठ नागरिकही ‘सैन्य शासन नको’ असा संदेश लिहिलेले फलक हातात घेऊन घोषणा देत होते. दुसरीकडे सैन्य सरकारविरोधातील विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील आणि शिक्षकांनीदेखील आपला सहभाग नोंदवला.11 एप्रिलला आंदोलकांकडून खार्तुम शहरातील सिटी सेंटरसारखे कितीतरी चौक आणि मध्यवर्ती भागातील महत्त्वाचे रस्ते रोखून धरण्यात आले. शहरात एकच हाहाकार उडाला. सर्व मूलभूत सुविधा पुरविणारी प्रतिष्ठानं बंद करण्यात आली. मोठय़ा संख्येनं जमाव रस्त्यावर येत सैन्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. चौकाचौकांत युवकांनी सरकारविरोधात क्र ांतिकारी गीते गाऊन विरोध सुरू केला.डोक्यावर पदर, कानात लटकणार्या मोठय़ा रिंग्ज आणि अंगात पांढर्या रंगाचं उपरणं (बुरखा) असलेली ही मुलगी सुदान क्रांतीची प्रतीक झाली. तिनं आपला हा फोटो ‘माझा आवाज दडपला जाऊ शकत नाही’ ((My voice cannot be suppressed) अशा स्लोगनसह ट्विटरवर पोस्ट केला. सोशल मीडियातून तिच्या फोटोवर लाखो लोकांनी प्रतिक्रि या नोंदवल्या. अनेक ट्विटर यूझर्सनी तिचा तो रिव्होल्युशनरी व्हिडीओ रिट्विट करत अल सलाहला जगभरात पोहोचवलं.सुदानच्या या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. सुदानवासीयांनी अखेर सैन्य शासकांना गुडघे टेकण्यास भाग पाडलं असलं तरी भविष्यात धोक्याची घंटा कायम असणार आहे. कारण वाटाघाटीनुसार प्रथम सैन्य शासक सत्तेवर राहणार असून, नंतरच्या टर्ममध्ये लोकशाही समर्थकांना सत्तेचा लाभ मिळणार आहे.