- अमृत बंग
दिवाळी, तरुण मुलं, सेलिब्रेशन, पार्टी, सोशल ड्रिंक्स याची चर्चा एकीकडे आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायम राहावी म्हणून तरुणांसह स्थानिकांचं आंदोलन दुसरीकडे. निव्वळ वैयक्तिक मतांच्या पलीकडे जाऊन सुशिक्षित वाचकाला विशेषत: तरुणांना दारूप्रश्नाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा म्हणून हा लेख.
अ) दारूविषयीचे वैज्ञानिक तथ्य-
१. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजेस’ हा जगातील सर्वात मोठा पब्लिक हेल्थ अभ्यास सांगतो की मृत्यू व रोग निर्माण करणाऱ्या सर्वात प्रमुख ७ कारणांमध्ये दारू व तंबाखूचा समावेश होतो. जगभरात दरवर्षी दारूमुळे ३३ लाख लोक मृत्यूमुखी पडतात.
२. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतातील मद्यपी हे सर्वात जास्त समस्याप्रधान आहेत.
३. ‘लॅन्सेट’ हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठित जर्नल असं म्हणतं की भारतातील २० टक्केपेक्षाही जास्त रुग्णभरती व दवाखान्यात भरती होणाऱ्या ६० टक्के आपात्कालीन दुर्घटना दारूमुळे होतात.
४. ‘लॅन्सेट’मधील अहवाल हेदेखील सांगतो की दारूचे दुष्परिणाम हे गरीब व उपेक्षित घटकांवर जास्त होतात. अर्थात दारू ही आर्थिक विषमता वाढवण्याचे काम करते. दारूचे वाईट परिणाम हे पिणाऱ्यापुरते मर्यादित न राहाता स्रियांवरील अत्याचार, गरिबी वाढणे, वाहतूक दुर्घटना व उत्पादकतेचे नुकसान अशा स्वरुपात व्यापक समाजावरदेखील होतात.
त्यामुळे दारू व तंबाखू हे निव्वळ ‘प्लेझर गुड्स’ नाहीत तर ‘आधुनिक कॉलरा व प्लेग’ आहेत हे वैज्ञानिक सत्य आपण समजून घेतलं पाहिजे.
ब) दारू कंपन्यांचे प्रचारतंत्र :
हे सत्य आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून दारू कंपन्या जिवापाड प्रयत्न करतात. दारूचे दुष्परिणाम ही जणू व्यक्तिगत जबाबदारी आहे असं भासवून त्या स्वतः नामनिराळ्या राहातात व अनेक चुकीच्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात प्रचार करतात.
१. दारू पिणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे व एक समकालीन सामाजिक रीत आहे हा गैरसमज पद्धतशीरपणे पसरवला जातो. खरं तर, जगभरात अर्ध्याहून अधिक प्रौढ हे मद्यपान करत नाहीत. त्यामुळे दारू पिणे ही सामान्य गोष्ट आहे हा प्रचार खोटा आहे.
२. दारू कंपन्या असादेखील प्रचार करतात की बहुतांश लोक हे जबाबदारीने मद्यपान करतात व खूप कमी लोक मद्यसेवन ‘हॅंडल’ न झाल्याने दुष्परिणामांना सामोरे जातात. काही मोजक्या लोकांसाठी त्यांच्या ‘दारू पिण्याच्या स्वातंत्र्यावर(?)’ गदा येऊ देणं हे चुकीचं आहे. मात्र ‘लॅन्सेट’मधील अहवाल मात्र हे सांगतो की भारतातील अर्ध्याहून अधिक मद्यपी हे ‘घातक / हझार्डस ड्रिंकिंग’ या गटात मोडतात. त्यामुळे ही फक्त काही निवडक ‘कमकुवत’ लोकांची समस्या आहे, हा प्रचार खोटा आहे.तरुणांनी तर याला मुळीच बळी पडू नये.
३.‘ड्रग अँड अल्कोहोल रिव्ह्यू’ या दारू आणि तंबाखू विषयाला समर्पित जर्नलमधील १० देशांत झालेला एक अभ्यास सांगतो की अर्ध्याहून अधिक दारू ही ‘Harmful Drinking Occasions’ म्हणजे ‘धोकादायक पिण्याचे प्रसंग’ (उदा. ३१ डिसेंबरला खूप पिऊन झिंगणे वा टल्ली होणे) यात प्यायली जाते व अशा प्रसंगांना प्यायल्या जाणाऱ्या अवैध / घरगुती दारूचे प्रमाण हे वैध दारूच्या तुलनेत सांख्यिकीदृष्ट्या लक्षणीयरीत्या कमी आहे.
क) दारूबंदी प्रभावी आहे का?
१. अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू या प्रतिष्ठित जर्नलमध्ये हारवर्ड, पेन्सिल्वेनिया विद्यापीठ व जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी भारतातील विविध राज्यांतील दारूबंदीचा अभ्यास प्रकाशित केला आहे. या अभ्यासातून असं दिसतं की दारूबंदीमुळे मद्यसेवन हे ४० टक्के कमी झाले व स्रियांवरील अत्याचार ५०टक्के कमी झाले.
२. आज महाराष्ट्रात (लोकसंख्या १२ कोटी) वर्षाला अंदाजे ५० हजार कोटी रुपयांची वैध दारू खपते. हेच प्रमाण गडचिरोलीला लावल्यास १२ लाख लोकसंख्येमागे दारूबंदी नसताना ५०० कोटी रुपयांची मद्यविक्री व्हायला हवी होती; परंतु २०२० मध्ये गडचिरोलीच्या जिल्हावार शास्रीय सर्व्हेमध्ये असे आढळले की जिल्ह्यात वर्षाला ६४ कोटी रुपयांची दारू खपते. म्हणजे दारूबंदीमुळे ५०० कोटींऐवजी केवळ ६४ कोटींची दारू खपते. दारूबंदीमुळे दारूचा खप ८७% कमी झाला. अशा स्थितीत गडचिरोलीची दारूबंदी अयशस्वी आहे असे कसे म्हणता येईल?
विकासाचा मुक्तिपथ हा मुक्त दारू नसून दारूमुक्ती हा आहे.
(लेखक गडचिरोलीस्थित निर्माण प्रकल्पाचे संचालक आहेत.)
amrutabang@gmail.com