- सतीश डोंगरे
अनिस बेग जन्मत:च दोन्ही डोळ्यांत दृष्टी नव्हती. त्यात परिस्थितीनं छळलं म्हणून तिच्यावर मात करण्यासाठी त्यानं जिवाचं रान केलं. शिक्षणासाठी नाशिक-जालना अशा फेऱ्या मारल्या. रेल्वेत कटलरीचं सामान विकलं. त्यातून आलेल्या पैशात घर सावरलं. आणि क्रिकेट? ते तर अजिबात सोडलं नाही. म्हणून तर अंधांसाठीच्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघात तो महाराष्ट्रातला एकमेव खेळाडू होता. तो म्हणतोच ना.. परिस्थिती कशीही असो, आपण हटायचं नाही! कोण तो?
घरात अठराविसे दारिद्र्य. जन्माला येतानाच दोन्ही डोळ्यांत दृष्टी नव्हती. घरात सर्वात मोठा मुलगा, त्यामुळे घरच्यांच्या अपेक्षाही होत्याच. आणि वाढत्या वयासोबत घराप्रतीच्या कर्तव्याची सतत जाणीवही करून दिली जायची. पण या साऱ्यातही सोबत होती त्याची जिद्द आणि धमक. त्यानं परिस्थितीशी दोन हात करायचे ठरवले आणि तो आहे त्या वास्तवाला भिडलाच. आणि भिडला तो असा की नुकत्याच झालेल्या अंधांच्या क्रिकेट वर्ल्डकपच्या विश्वविजेत्या भारतीय संघात त्यानं मोलाची कामगिरी केली! नाशिकच्या नाशिकरोड परिसरातल्या पवारवाडीत राहणाऱ्या क्रिकेटपटू अनिस बेग याची ही गोष्ट. एखाद्या सिनेमाची गोष्ट चकित करत पुढं सरकते ना तशीच एक हिरॉईक कथा. आईवडील, लहान भाऊ, बायको आणि सहा महिन्यांची लेक असा परिवार असलेल्या अनिसला भेटायचं म्हणून त्याचं घर गाठलं. वर्ल्डकप जिंकून तो नाशकात आला आणि त्याच्या भेटीला जायचं ठरवलं. गप्पा रंगल्या. आणि मग अनिसकडूनच ऐकली त्याच्या घडण्याची एक जिद्दीची गोष्ट. अनिलचे वडील वयोवृद्ध. घरची सर्व जबाबदारी आईवरच. बारदान शिवून मिळणाऱ्या पैशांमध्ये तिनं घर, लेकरंबाळं सांभाळली. धाकटा भाऊ वाहनचालक. त्याचीही कमाई जेमतेमच. या साऱ्यांसोबत अनिसनेही रेल्वेत कटलरीचं सामान विकून घरात हातभार लावण्याचा प्रयत्न केला. अनिस सांगतो, आमचा परिवार बुलडाणा जिल्ह्यातील देवळघाटचा. पोट भरण्यासाठी ते गाव सोडून नाशिकला आले. अनिस जन्मत: अंध असल्यानं त्याचं नाशिकला शिक्षण होईल आणि आपला उदरनिर्वाह होईल या उमेदीनं आईवडील नाशकात आले. १९९८ मध्ये अनिसला नाशिकमधील शासकीय अंधशाळेत प्रवेश दिला. त्यावेळेस वडील ट्रकचालक म्हणून काम करत होते. त्यांचं शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच. पण मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं, अनिसनंही शिकावं अशी त्यांची इच्छा होती. त्या इच्छेपोटी त्यांनी गाव सोडलं. अनिसला शाळेत घातलं. मात्र अनिसचं लक्ष शिक्षणापेक्षा क्रिकेटकडेच जास्त. वयाच्या आठव्या वर्षीच अनिसला क्रिकेटचं वेड लागलं. रेडिओवर क्रिकेटची कॉमेण्ट्री तो ऐकायचा. शाळेत मोठ्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायचा. रोजचा हाच कार्यक्रम. पण पुढे त्याला पुढील शिक्षणासाठी जालना येथील शासकीय अंधशाळेत प्रवेश घ्यावा लागला. मात्र तो दहावीत नापास झाला. अशातही त्यानं जिद्द सोडली नाही. शिक्षण घ्यायचं हा त्याचा ध्यास होता. मात्र घरची परिस्थिती तेव्हा अनुकूल नव्हती. शाळा सोडून काहीतरी व्यवसाय करणं भाग होतं. घरच्यांचीही तशी इच्छा आणि गरज होती. मात्र अनिसच्या डोक्यात काही वेगळंच सुरू होतं. त्यानं थेट मुंबई गाठली. शिक्षण आणि व्यवसाय हे दोन्ही जमवू असं ठरवून टाकलं. गॅस वर्कशॉप हा ट्रेण्ड घेऊन त्यानं मुंबईत आयटीआयला प्रवेश घेतला. त्याचबरोबर रेल्वेत कटलरीचा व्यवसायही सुरू केला. क्रिकेट होतंच सोबत. जसं जमेल तसं तो अंध विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेट खेळायचा. तो उत्तम क्रिकेट खेळायचा म्हणून दोस्तही त्याला प्रोत्साहन द्यायचे. शंभर टक्के अंध असतानाही त्याची खेळावरील पकड जबरदस्त होती. त्याच्या खेळाच्या जोरावर त्याला २००५-०६ मध्ये मुंबई जिल्हा क्रिकेट संघात स्थान मिळालं. अनिस त्यांच्याकडून खेळू लागला. मात्र घरची परिस्थिती छळत होतीच. कितीही प्रेम असलं तरी क्रिकेटमधून पैसे मिळत नव्हते. व्यवसाय करणं भागच होतं. कटलरी विक्रीतून दिवसाला जवळपास दोन-तीनशे रुपयांची कमाई होत असल्यानं घरात पैसे देणं जमत होतं. घर चालत होतं. मात्र अनिसला वाटायचं की आपलं क्रिकेट सुटू नये. वेळात वेळ काढून तो क्रिकेट खेळायचाच. मुंबई लोकल टीममध्ये त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी असल्यानं पुढे २०१४ मध्ये त्याला थेट महाराष्ट्र संघात स्थान मिळालं. याच टप्प्यावर आईवडील, भाऊ, बायको म्हणाले की, घर आम्ही सांभाळतो, तू खेळ क्रिकेट! महाराष्ट्र संघातर्फे त्याला इंदूरला खेळण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. मुंबई संघातर्फे खेळताना अनिसच्या संघानं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. संघाच्या या कामगिरीत अनिसचं योगदान मोलाचं होतं. त्यावेळी त्यानं अजमेर, जयपूर, हैदराबाद, पुणे, गुजरात या संघांविरोधात सर्वोत्तम कामगिरी केली. संघात तो ‘आॅलराउंडर’ म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे अनिसच्या कामगिरीच्या जोरावर त्याला थेट भारतीय संघात स्थान मिळालं. ३० खेळाडूंच्या संघात अनिसचाही सहभाग होता. आता अनिसला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे वेध लागले होते. तत्पूर्वी त्याला अंतिम भारतीय संघात स्थान मिळवायचं होतं. प्रॅक्टिस मॅचदरम्यान अनिस उत्तम खेळला. निवड समितीला त्याचा विचार करावाच लागला. अनिसला अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळालंच. टी-ट्वेण्टी विश्वकप जवळ येत होता. अंतिम ११ खेळाडूंमध्ये आपलाही समावेश व्हावा म्हणून अनिसनं जीवतोड मेहनत केली. २१ डिसेंबर २०१६ रोजी अंतिम भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली. अनिसचं नाव अंतिम ११ खेळाडूंमध्ये होतं. महाराष्ट्रातून भारतीय संघात पोहचलेला तो एकमेव खेळाडू ठरला. ५ जानेवारीपासून इंदूर येथे सराव सुरू झाला. बेंगळुरू येथील पेट्रिक राजकुमार हे अनिसचे प्रशिक्षक. २५ जानेवारीला अनिसचे सराव सामने संपले. त्यानंतर पाचच दिवसांनी ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत अंधांची विश्वचषक स्पर्धा घोषित करण्यात आली. पहिलाच सामना दिल्ली येथे बांग्लादेशविरुद्ध रंगला. सामन्यात अनिसने अष्टपैैलू कामगिरी केली. अनिसबरोबर संपूर्ण संघ फॉर्मात असल्याने एकापाठोपाठ एक असे एकूण ११ सामने जिंकत या टीमनं स्पर्धेत आव्हान कायम ठेवलं. वेस्ट इंडिजबरोबर झालेल्या सामन्यात तर अनिसला संघाचं कर्णधारपद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. त्यावेळी त्याने संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. या सामन्यात चमकदार कामगिरी करताना अनिसने केवळ १४ चेंडूत २६ रन्सची धुवाधार फलंदाजी केली होती. मग आली फायनल. भारताला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अंतिम सामन्यात नमवायचं होतं. बेंगळुरू येथे रंगणाऱ्या या सामन्यात सर्वच संघ जोशात होता. परंतु या अटीतटीच्या सामन्यात अनिसची तब्येत मात्र अचानक बिघडली. अंगात ताप फणफणला. प्रशिक्षकांनी अनिसला विचारलं की, ‘तुला खूप ताप आहे, तू खेळू शकशील का?’ अनिसने प्रशिक्षकांच्या या प्रश्नावर न बोलता केवळ होकारार्थी मान हलविली. मैदानात उतरण्याची आणि खेळण्याची जिद्द तो अशी फायनलला येऊन हरणार नव्हताच. अनिस मैदानात उतरलाही आणि उत्तम खेळलाही. भारतीय संघानं हा सामना नऊ गडी राखून १८.२ ओव्हर्समध्येच जिंकला. तब्येतीचा फारसा विचार न करता मैदानात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे अनिसने सर्वांचीच मनं जिंकली. अनिस म्हणतो, ‘काय सांगू? आपण वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघात आहोत या भावनेचा आनंद व्यक्त करता येत नाही. आणि ज्या परिस्थितीशी झगडून इथवर पोहचलो ते दिवसही आठवल्यावाचून राहत नाही. पण ही केवळ सुरुवात आहे. आता अजून चांगलं काम करीन, अजून चांगली कामगिरी करत राहीन देशासाठी!’ अनिसला भेटून आलो त्याच्या वस्तीत. तिथून निघताना वाटलं, खेळातले आयकॉन शोधतो आपण.. पण अनिससारखे तरुण हे खऱ्या जिद्दीचे आयकॉन. त्यांचं वर्तमान त्यांच्या स्वप्नांचा बळी घेत नाही कारण ते आपल्या स्वप्नांचा हात सोडत नाहीत, मेहनतीला कमी पडत नाहीत.. म्हणून ते जिंकतात.. जिंकत राहतीलही!
(सतीश लोकमतच्या नाशिक आवृत्तीत वार्ताहर आहे.)