- साहेबराव नरसाळेअमित काळे हा कोल्हाटी समाजातला मुलगा़ यूपीएससी झालेला या समाजातील कदाचित पहिलाच मुलगा. अमितची अजून एक ओळख म्हणजे लावणीसम्राज्ञी राजश्री काळे-नगरकर यांचा तो मुलगा. केंद्र सरकारने परदेशातील मुला-मुलींना लावणीचे धडे देण्यासाठी ज्यांना पाठवलं आणि राज्य शासनानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केला, त्या राजश्रीतार्इंचा हा मुलगा. त्यानंही एक झळझळीत यश स्वत:च्या कष्टानं खेचून आणलं आहे.राजश्रीतार्इंचे एकेकाळचे दिवस किती संघर्षाचे होते. अमित छोटा होता़ नुकताच रांगायला लागला होता़ संपूर्ण जीवन लोककलेसाठी समर्पित केलेल्या राजश्रीताई एका हाताने पायात चाळ चढवत दुसरीकडे अमितकडे लक्ष. अशी तारेवरची कसरत करत असताना त्या म्हणायच्या, माझा अमित कलेक्टर व्हईल, तव्हाच माझा पांग फिटल़ तेच स्वप्न त्या अमितच्या डोळ्यात पेरत राहिल्या आणि आज अमितने तीच यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होत त्या स्वप्नाच्या दिशेनं एक पाऊल टाकलंय.अमित चार वर्षांचा होता तेव्हा राजश्रीतार्इंनी ठरवलं, की अमितला इंग्लिश शाळेत घालायचं. आतापासूनच त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्नं पेरायची़ चार वर्षांच्या अमितला त्यांनी पुण्यातील कल्याणीनगर येथील एका इंग्रजी शाळेत के.जी़च्या वर्गात नेऊन बसवलं. तिथं त्याच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला.राजश्रीताई तुडुंब गर्दीसमोर घुंगराच्या तालावर लावणी पेश करत असायच्या त्याचवेळी त्यांचे मन अमितभोवती घुटमळत असायचे़ अमित काय करत असेल, रडत तर नसेल ना, त्याने काय खाल्लं असेल, काही दुखत तर नसेल ना, असे असंख्य प्रश्न राजश्रीतार्इंच्या डोक्यात पिंगा घालायचे. मात्र त्यांना अमितचं शिक्षणही महत्त्वाचं वाटत होतं.राजश्रीताई त्याला कधी कधी भेटायला जायच्या़ सुटीत नगरला घेऊन यायच्या़ पण त्यांनी मायेच्या मोहात अडकून अमितला कधी स्वत:मागे फरपटत नेलं नाही़ त्यांचं स्वप्नच होतं की तो क्लास वन अधिकारी झाला पाहिजे़ ज्यांनी कोल्हाटी समाजाकडे बोटं दाखवली, त्यांनीच तोंडात बोटं घालावीत, असं लखलखीत यश आपल्या मुलानं मिळवावं, ही जिद्द राजश्रीतार्इंनी मनाशी धरली.अमितची चौथी ते दहावी मुक्तांगण शाळेत झाली़ तो मुळात हुशार होता़ अभ्यासात हातखंडा, तसा खेळातही तो पटाईत़ फुटबॉल हा त्याच्या आवडीचा खेऴ आपटे कॉलेजमधून त्यानं बारावीची परीक्षा दिली. पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय अमितनं घेतला़ अमित इंजिनिअर झाला़ पण एवढ्यावरच त्याला थांबायचं नव्हतं़ अमितनं दिल्ली गाठली आणि यूपीएससीची तयारी सुरू केली़ क्लासेस जॉइन केले़ स्वत:चं अभ्यासाचं वेळापत्रक ठरवून घेतलं़ अभ्यासात खंड पडला की त्याला आई आठवायची़ पुन्हा तो जोमाने अभ्यास करायचा़ आंतरराष्ट्रीय तमाशा कलावंत अशी ख्याती मिळविलेली आई हीच त्याची प्रेरणा होती़ दोन वेळा मुलाखतीपर्यंत जाऊन अमित माघारी परतला़ तिसऱ्या प्रयत्नात मात्र यश त्याच्या हाताशी आलंच.अमित सांगतो, रोज किमान दहा तास अभ्यास, त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि वर्तमानपत्रांचं वाचन असा माझा दिनक्रम ठरलेला होता़ यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या तरुणांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवण्यात आला होता़ या ग्रुपला आयपीएस महेश भागवत यांच्यासह अनेक दिग्गज अधिकारी मार्गदर्शन करायचे़ मी नगरचा असल्यामुळे मला महेश भागवत जवळचे वाटायचे़ त्यांनीही मला पर्सनली मार्गदर्शन केलं म्हणून मी हे यश मिळवू शकलो़ माझी आई माझी प्रेरणा आहेच. माझ्या अनुभवावरून एवढंच सांगतो की, कष्ट, अभ्यास यांचा हात धरला तर यश मिळू शकतं.
अमित काळे, आई आणि मुलाच्या एका स्वप्नाची गोष्ट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 9:02 AM