- मेघा रामजी राऊत
‘मोडेन, पण वाकणार नाही’ हा वडिलांचा गुण आधीच माझ्यात उतरलेला आणि भरीस भर म्हणून अरेला कारे म्हणायची बेदरकार बंडखोर वृत्ती. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव या गावाची मी. बारावीपर्यंतचे दिवस मैत्रिणींसोबत रानावनात हुंदळत कधी संपले कळलंच नाही.
बारावी चांगल्या गुणांनी पास झाले; पण त्या वेळची परिस्थिती बघता मेडिकल/अभियांत्रिकीकडे न जाता कुठं तरी मनाला मुरड घालून वडिलांचा शब्द सर आंखोपर ठेवत डी.एड.चा फॉर्म भरला. नंबर लागला गडचिरोलीच्या शासकीय कॉलेजला. पहिल्यांदा कुटुंबाच्या संरक्षक भिंतीतून बाहेर पडून दोन-अडीच वर्षे बाहेर एकटी राहिले. बंडखोर स्वभावासोबतच सहनशक्ती, तडजोड, समंजसपणा अंगात भिनायला लागला तो याच काळात. या दोनच वर्षात मला माझा बाप खऱ्या अर्थाने उमगायला लागला होता. पास आउट झाले. पण अजूनही आपण शिक्षकीपेशाला योग्य आहोत की नाही याचा निर्णय मात्र होत नव्हता. जागा निघाल्या. २००९ला लातूर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून रुजू झाले.
घरापासून लांब एकट्या मुलीला पाठवताना माझा बाप लहान मुलासारखा रडला. तेव्हा कुठलीतरी अनामिक भीती डोक्यात येऊन गेली, काळजाला असंख्य भेगा पडत होत्या. तीन वर्ष नोकरी करून मग ट्रान्स्फर होईलच या आशेवर घरदार सोडून मी लातूर येथील निलंगा तालुक्यात आले.
लातूरचं खान-पान, राहणीमान, बोलीभाषा, भौगोलिक परिस्थिती सगळंच मला वेगळं. मी बोललेलं मुलांना कळत नव्हतं नि त्यांचं मला कळत नव्हतं. आपण एक शिक्षक म्हणून योग्य आहोत की नाही हेच कळायला मार्ग नव्हता. सहकारी सारखं म्हणायला लागलेत की तुम्ही या क्षेत्रात कशाला आलात? एमपीएससी देऊन कुठल्या तरी चांगल्या पदावर जायला पाहिजेत. मीही मनावर घेतलं नि तयारी सुरू केली. अध्यापनही सुरूच होतं.
माझ्याकडे दुसरीचा वर्ग होता. मी नीट शिकवतेय की नाही हे माझं मलाच कळत नव्हतं. अगदी रुजू झाल्याच्या १०-१५ दिवसांनंतर दुसरीतली चुणचुणीत फातिमा माझ्याजवळ आली नि मला म्हणाली, ‘मॅडम, आप बोहोत अच्छा पढाते हो जी, सच्ची मे. आप बोहोत अच्छे हो’. मी तिला जवळ घेतलं. त्या छोट्याशा मुलींनी माझ्या मेहनतीची मला दिलेली पहिली पावती होती. आपण योग्य ट्रॅकवर आहोत नि आपण एक शिक्षिका म्हणूनही योग्य आहोत याची खात्री मला त्या मुलीने करून दिली. त्यानंतर मला एमपीएससी द्या म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझं एकच प्रतिप्रश्न असायचा की, जिल्हा परिषद शाळेतील शिकणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षक नकोयेत का? त्यांचा तो अधिकार नाहीये का?
२००९ ते २०१७ अशी आठ वर्षे मी एकाच शाळेत घालवले. माझ्यात आणि विद्यार्थ्यांत दोस्ती झाली. माझ्यासारखेच स्वत:चे जिल्हे सोडून आलेले काही शिक्षक. ओळखी झाल्या. त्यातील अमरावतीची पल्लवी, वाशीमचा स्वप्निल नि गोंदियाची मी. एकाच वयाचे आम्ही. विचार जुळले. बघता बघता कधी जिवाभावाचे मित्र बनलो कळलंच नाही. आम्हा तिघांत मी जरा डॅशिंग. अन्याय सहन व्हायचंच नाही. एकटी मुलगी बाहेर राहत असेल तर पुरु षी मानसिकतेचा त्रास हा होतोच.
माझ्या वाट्याला गुडीगुडी आयुष्य कधीच आलं नाही. पण प्रत्येक संघर्ष हा आयुष्य समृद्ध करून जातो फक्त आपले प्रयत्न नि हेतू प्रामाणिक असायला पाहिजे हे मला या प्रवासानं शिकवलंय. एकटी मुलगी इतक्या लांब एकटं नाकावर टिच्चून नोकरी करतेय, आलेल्या प्रसंगांना तोंड देतेय याचं काहींना कौतुक वाटायचं.
एक क्षण असाही आला की मी अंतर्बाह्य कोलमडून पडले. ज्यांच्यासाठी मी स्वत:च्या पायावर उभी झाले होते ते माझे प्राणापेक्षाही प्रिय बाबा नागपुरात आयसीयूमध्ये असल्याचे कळलं. आठ दिवसात मी माझ्या बाबाला जाताना बघितलं. माझं छत्र हरवलं. मी एकटी पडले कायमची. माझ्या लग्नाची नि बदलीची वाट बघत माझे बाबा गेले.
वडील गेल्यामुळे जगायची इच्छाच मेली होती. पण या वेदनेवरही हास्याची झालर ओढत मी पुन्हा नव्याने कामाला लागले. आता जुलै २०१७ मध्येच माझ्या जिल्ह्यात व माझ्याच गावच्या तालुक्यात माझी बदली झाली. स्वगृही गोंदियाला आले. लातूरसारख्या शहरी भागातून एकदम नक्षलग्रस्त प्रभावित भागात शाळेत काम करतेय. ज्या शाळेत आजपर्यंत एकही महिला शिक्षकाची नेमणूक झाली नाही तिथे माझी वर्णी लागलीय.
पण गडचिरोली-लातूर-गोंदिया या प्रवासाने मला एक माणूस म्हणून जगायला शिकवलं. माझा प्रत्येक विद्यार्थी हा जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन चांगला माणूस बनेल यासाठी मी चांगलं शिकवत राहणार, प्रयत्न करत राहणार...