- विनायक पाचलग
आजच्या घडीला अख्खा पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्त आहे. त्यांच्या मदतीला सर्वच जण धावून येत आहेत. त्यामुळे याक्षणी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये एनएसएस, एनसीसी व इतर क्लबज् आपापली मदत तयार करत आहेत. काही लोक तर थेट फिल्डवर जाऊन स्वच्छता ते मदत वाटप अशा अनेक जबाबदार्या अंगावर घेत आहेत. जसं हे कॉलेजमध्ये चालू आहे तसेच ते बर्याचशा कंपन्यांमध्येही सुरू आहे. लोक आपापल्या परीने काही ना काही करत आहेत. या सगळ्या अॅक्टिव्हिटीला कॉलेजमध्ये ‘एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीज म्हटले जाते. अन्य उपक्रम. आता काय महत्त्व आहे या एक्स्ट्रा उपक्रमांचे? त्यामुळे लोकांना मदत वगैरे होते हे खरंय; पण ही अशी मदत, त्यासाठी दिलेला वेळ, समर्पण आणि सच्च्या भावनेनं केलेलं काम, त्यातून शिकलेली कौशल्यं हे सारं भविष्यात जॉब मिळवायलासुद्धा महत्त्वाचे ठरतात. फक्त डिझास्टर मॅनेजमेंटच नव्हे तर वेगवेगळे कार्यक्रम, फेस्टिव्हल्स, आयआयटी टेकफेस्टसारख्या भव्यदिव्य स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टी म्हणजे रूढार्थाने एक्स्ट्रा करिक्युलरच. खरं जग यात शिकायला मिळतं. आपण जे अभ्यासक्रमात शिकतो त्यापलीकडे जाऊन कसं आणि माणसांना कसं हँडल करायचं ते हे उपक्रम शिकवतात. उदाहरण द्यायचं झालं तर एखादी स्पर्धा आयोजित करायला 10-15 मुलांची तरी टीम लागते. या सगळ्या टीममध्ये समन्वय असेल तर आणि तरच ती स्पर्धा यशस्वी होऊ शकते. यात मग कोणी एक लीडर असतो तर बाकी सगळे को-ऑर्डीनेटर. यातला जो लीडर असतो त्याला जे शिकायला मिळत या उपक्र मातून तेच सगळे स्किल्स नोकरीमध्ये मॅनेजरला लागतात. म्हणजे उपक्रमातील लीडर हा भविष्यातील उत्तम मॅनेजर बनतो. तर त्याच्या बाकी सगळ्या को-ऑर्डीनेटर ना टीमवर्कम्हणजे काय ते समजतं. त्यामुळे कार्पोरेट जगात जेव्हा टीमवर्कसाठी वेगवेगळी सेशन्स घेतली जातात तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव आधीच मिळालेला असतो. आजकालच्या जगात सॉफ्ट स्किल्सला प्रचंड महत्त्व आहे हे सगळेच सांगतात. पण ते शिकायचे कोणतेही फॉर्मल माध्यम नाही. ना त्याचे क्लास लावता येतात, ना त्याच कोणतं पाठय़पुस्तक आहे. हे सगळे सॉफ्ट स्किल्स शिकायला एकमेव मार्ग आहे तो म्हणजे ‘स्वानुभव’! स्वतर्च्या अनुभवानेच टीमवर्क, लीडरशिप, फायनान्स मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंट अशा सर्व गोष्टी शिकता येतात. आणि ही संधी असे कार्यक्र म व उपक्र म आपल्याला देतात. मुळात म्हणजे या सर्व उपक्र मातून नवी माणसे जोडली जातात, असलेल्या परिवाराशी नाती घट्ट होतात. महत्त्वाचे म्हणजे तुमचा रिझ्युम बिल्ड होतो. आजकाल तुम्हाला पडणारे मार्क हे फक्त एण्ट्री गेट असतात. मुलाखतीत निवडीचा तो निकष नसतो. अशावेळी जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाखतीला जाता तेव्हा तुम्ही कोणकोणत्या उपक्रमात सहभागी होतात, त्यातून काय शिकलात यावरच बरेचदा आपली निवड होणार का नाही हे ठरतं. त्यामुळे उत्तम जॉब मिळवायचा असेल तर त्याचं एक सीक्रेट हे जास्तीत जास्त इतर उपक्रमांत सहभागी होणं, त्यात दिलेलं काम मनापासून करणं हे आहे. यातून होणारा फायदा हा चटकन दिसणारा नसला तरी नोकरीत नक्की दिसेल याची खात्री बाळगा.आणि जे ऑलरेडी नोकरी करत आहेत त्यांनीसुद्धा हे उपक्रम चालूच ठेवले पाहिजेत, आधी नसतील केले तर आत्ता करायला हवेत त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे तुमच्या कंपनीचा सीएसआर विभाग किंवा कल्चर क्लब. सीएसआरमधून दिली जाणारी मदत असो वा कल्चर क्लबमधून करायचं असलेले गणपतीचे नियोजन. तुम्ही तिथे हवेतच. कारण या एक्स्ट्रा नाही तर मस्ट अॅक्टिव्हिटी आहेत.