- ऋतुराज वृक्षराज देशमुखआंधृड माझं गाव. ३००० लोकवस्तीचं खेडं. शेती मुख्य व्यवसाय. गावच्या बालवाडीत गेलो मग तिथून माझ्या गावापेक्षा मोठ्या गावी डोणगाव जानेफळ गावच्या कॉन्व्हेंटमध्ये व नंतर तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमात माझं शिक्षण झालं. सत्यजित शाळेत सीबीएसई पॅटर्नला थोडा स्थिरावून मी दहावी उत्तीर्ण झालो.दहावीनंतर पुढे काय प्रश्न होताच. पुढं इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. गाव, घर, आईबाबांना सोडून गावापासून शंभर किमी दूर अकोला येथे निघालो. तिथं माझं सामान लावून आईबाबा गावाकडे परत निघाले. आईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले. आई पदरानी अश्रू पुसत होती. पहिली ताटातूट झाली. माझी पहिली रात्र सुरू झाली. घराकडील आठवणींनी..दोन वर्षे सरली. बारावीची परीक्षा झाली. टेक्निकल बोर्डाची परीक्षा, जेईईच्या दोन परीक्षा, सीईटी, एईईटी व एनडीए परीक्षेनिमित्त नागपूरपर्यंत प्रवास झाला. निकाल आले, इंजिनिअरिंग, मेडिकल व एनडीएमध्ये पास झालो. मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचं निश्चित केलं. मुंबईत व्हीजेआयआटीला प्रवेश घेतला.मुंबईत आल्यानंतर माझा पाऊलवाटेवरचा प्रवास संपल्यासारखं वाटायला लागलं. घर दिसत होतं. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठं असणार माझ्या अंगणातलं निंबाचं झाड, माझ्याच बरोबर वाढलेलं. त्यालाच दादांनी पंचमीला खास बांधून दिलेला झोका, पारिजातकाच्या फुलांचा सुगंध, गणपती, नवरात्रीत फुलं वेचणारी लहान मुलं, अशोकाचं झाड, वडाचं झाड, अंधाऱ्या सकाळी कोकिळेचा कुहू कुहू आवाज, माझी सत्यजित शाळा, स्कूल बसचा प्रवास, जीव लावणाºया नायडू मॅम, माळीसर, अकोल्याचे आकाशसर, खोलीमालक धनोकार काका-काकू सगळे आठवत राहिले.रात्रीला ९ - ९.३० वाजता सामसूम होणारं माझं गावं, रविदादाच्या दुकानासमोरील माणसाच्या रंगलेल्या गप्पा. प्रसन्न सकाळ. इथं मुंबईला कोकीळ नाही. पेरते व्हा म्हणणारे पक्षी नाही की सोनेरी किरणाचा कवडसाही नाही.मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये आम्ही चार मित्र राहतो. चार भागातून चार गावातून आलेलो, एकमेकांचे स्वभाव, राहणीमान काहीच माहीत नव्हते. पण या मित्रांनी जीव लावला, आमचं एक घर झालं सगळ्यांचं मिळून.माझ्या पाऊल वाटेचा प्रवास मेट्रो शहराच्या महामार्गावर आला आहे. माझा ध्येयपूर्तीचा प्रवास एरोनॉटिकलमध्ये रिसर्च करण्याचा आहे. आईबाबा आयएएस होण्याचे स्वप्न पाहतात. पण मला वाटतं एरोनॉटिकलमध्ये संशोधनाची संधी मिळाली तर हा प्रवास कधीच संपणार नाही. सध्या मुंबईत एक थांबा आहे चार वर्षांचा इतकंच.मुंबईतील गगनचुंबी इमारती, लोकलच्या ट्रेन, अजून न पाहिलेला समुद्र, मित्र, इथली धावपळ, संस्कृती, कॉलेजचं जग, कॅन्टीन, मी राहत असलेली सोसायटी हे सारं माझं वाटतंय आता...मुंबईला मी आपला वाटेल अशी आशा आहेच..(आंधृड, ता. मेहकर, जि. बुलढाणा)
आंधृड ते मुंबई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 8:00 PM