कोरोनामुळे आपण एक नवीन लाइफस्टाईल शिकलो. त्यातल्या सर्व बदललेल्या, बदलत्या आणि बदलत राहणाऱ्या गोष्टींसोबतच आपल्याला आपलं आयुष्यही या वर्षात पुढे न्यायचंच आहे. आपल्या मनातली घुसमटही होती तशीच पुढे जाणार आहे आणि आपली सर्व आव्हानंही! घरी-दारी मनातलं बोलायला कोणीच नाहीये आणि इतके सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आपल्या हातात आहेत, असे विरोधाभासही त्यात असतीलच. जवळपास एक संपूर्ण वर्ष आपण फारसं बाहेर न पडता घालवलं आहे. फोनला, स्क्रिन्सला चिकटून बसलेलो आहोत. कोरोनापूर्व काळात तुमची डिग्री पूर्ण होऊन नोकरी लागायची शक्यता असेल, तर तिचं आजही नेमकं काही ठरलेलं नसू शकतं. त्यात मनात खूप मोठं वगैरे व्हायचे स्वप्नं आहेत, पण हातात काहीच संधी नाहीये. स्वतःच्या मनाशीच फाइट करून थकून जाऊ, अशीही अनेकांची परिस्थिती आहे. हे सगळे प्रश्न यंदा जास्त छळकुटे होणार आहेत. तरुण मुलांना छळणारे असे प्रश्न आणि त्यातून बाहेर पडायचे मार्ग यावर जरा बोलू..
१. फुल टू कन्फ्यूज?
इतरांचे आनंदी स्टेट्स अपडेट्स पाहून आपण जरावेळाने नाराज होणार असू, तर आपला आपल्या मानसिक आरोग्याचा अलार्म चटकन वाजला पाहिजे. आपलं सगळं कचरा आणि बाकीच्यांचं एकदम भारी असं जर डोक्यात येऊन तुम्ही डोक्याचा चिखल केलेले असेल, तर चक्क इतरांचे स्टेट्स-अपडेट्स चेक करणंच बंद करा. संपूर्ण फोकस चालू वर्तमानावर आणा. प्लॅन्स आखा, त्यावर नीट काम करा. कष्ट करा. कामाला लागा. हातावर हात ठेवून बसल्यानं क्रांती होत नसते, त्यापेक्षा लहानसहान कामे करा, पण पुढे चला.
२. फार स्ट्रेस आलाय?
हे अगदीच उघड जगभर दिसून येत आहे. ताण सगळ्यांनाच आला आहे, आपण काही अपवाद नाही. परीक्षा होतील की नाही, कधी होतील, नोकऱ्या मिळतील की नाही, चांगले पैसे मिळतील की नाही, असे अनेक प्रश्न केवळ आपल्याच पुढ्यात नाहीत, तर जगभर आहेत. मिळालेल्या नोकऱ्या टिकतील की नाही, हेही प्रेशरच आहे. मनात खूप ताण असेल, त्याचा परिणाम आपल्या शरीर-मनाच्या आरोग्यावर त्याचा जास्त परिणाम होणार. त्यामुळे जे हातातच नाही त्याचा ताण घेऊ नका, प्राप्त परिस्थितीत काय-काय करता येईल, ते लहानसं असलं, तरी करा. ताण आलाय, म्हणून काहीच न करण्यापेक्षा, तो ताण योग्य ठिकाणी लावून पर्याय शोधणं हाच एकमेव मार्ग आता समोर आहे.
३. बाकी सोडा, फिट आहात का?
उत्तम आहार- शारीरिक हालचाल- गाढ झोप हे सूत्रं कसोशीनं पाळा. कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत हे सूत्र आपल्या कामी येईल. कोरोनामुळे घरी बसून आणि स्क्रिन्सला चिकटून, आपण मुळातच आपल्या शरीर मनाच्या आरोग्याचं खोबरं केलेलंच आहे, असं मानूनच आपला रोजचा दिवस प्लॅन करा. शरीराला भरपूर हालचाल मिळेल, अशी कामं प्लॅन करा. जेवायच्या आणि झोपायच्या वेळांवर नीट लक्ष ठेवा. २०२१ ही एक नवीन डायरी आपल्या हातात आली आहे, असं समजा. बाकी बडबड सोडा, आपण फिट आहोत का विचारा स्वत:ला, नसेल तर लगेच लागा कामाला.