-नितांत महाजन
अन्नू राणी.हे नावही गेल्या आठवडय़ात बातम्यांमध्ये झळकलं. मात्र बातमीत गायब व्हावं असं या मुलीचं कर्तृत्व नाही.अन्नू राणीनं नुकत्याच झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत आठवं स्थान मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. तिचं पदक हुकलं मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीर्पयत पोहचलेली ती पहिलीच भालाफेकपटू.आपण सगळेच शाळा-कॉलेजात भालाफेक आणि थाळीफेक-गोळाफेक शिकतो. मात्र या मुलीच्या नशिबात एकेकाळी तेही नव्हतं. मेरठ जवळच्या बहादूरपूर नावच्या छोटय़ाशा गावात शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. गाव आणि कुटुंब दोन्ही कट्टर. मुलींनी चूल सांभाळावी हाच शिरस्ता. मात्र अन्नूचा भाऊ वेगळा होता. ती त्याच्यासोबत क्रिकेट खेळायची. क्रिकेट खेळताना तिच्या भावालाच वाटलं की, हीची अप्पर बॉडी स्ट्रॉँग आहे. हातात प्रचंड ताकद आहे. तिनं अॅथलेटिक्समध्ये काहीतरी करावं.म्हणून त्यानं तिला सुचवलं की तू भालाफेकचा सराव कर आणि या खेळात काहीतरी भारी कर!पण भाला होता कुठं?उसाची शेती, मोकळी वावरं. मग हातात ऊस घेऊन तो फेकायचा सराव तिनं सुरू केला. बरेच दिवस तसा सराव केल्यावर बांबू तासून एक टोकदार भाला तिनं स्वतर्च बनवला. मग त्या बांबूच्या भाल्यावर सराव केला.भावानं मग पैसे जमवले आणि मेरठला तिचं औपचारिक ट्रेनिंग सुरू झालं. आपल्या बहिणीनं या खेळातच प्रगती करावी म्हणून तिच्या भावानं राबराब राबून पैसे कमावले आणि तिच्या प्रशिक्षणाची सोय केली.सुरुवातीला तिच्या वडिलांचा यासार्याला विरोध होता. मुलींनी घराबाहेर पडून असं खेळणंच त्यांना मान्य नव्हतं. मात्र अन्नूची आणि तिच्या भावाची जिद्द पाहून तेही तयार झाले. आणि पुढे अॅथलेटिक्स असोसिएशनने अंजूला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. अन्नू सांगते, ‘खेळ ही आपल्याकडे कुणाला महत्त्वाची गोष्ट वाटतच नाही. त्यात मुलींनी खेळणं म्हणजे काहीतरी भलतंच. योग्य वयात, लहानपणीच खरं तर उत्तम ट्रेनिंग मिळालं तर आपण खेळात खूप प्रगती करू शकू. मात्र मला जे मिळालं त्यातही मी खूश आहे, अजून प्रय} करत राहणारच आहे.’अन्नू भालाफेकीत नॅशनल चॅम्पिअन आहेच मात्र जागतिक स्पर्धेच्या भालाफेक अंतिम फेरीत पहिली भारतीय म्हणून पोहचण्याचा मानाचा शिरपेचही आता तिच्याकडे आहे.या स्पर्धेत ती आठव्या स्थानी राहिली, पदक हुकलं मात्र तिची कामगिरी अशी होती की, त्यामुळं ही मुलगी पुढं जाईल असं अनेकांना वाटत होतं.पदक हुकलं मात्र अन्नू म्हणते तसं, ‘संघर्ष माणसाला खूप काही शिकवतो. पुढे जाण्याची प्रेरणा देतो. टिकवून ठेवतो स्पर्धेत, मीही अजून संघर्ष करतच राहीन.’भालाफेकसारख्या खेळात भारतीय खेळाडू दिसत नसताना अन्नूचं हे यश म्हणून कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.