- निकिता महाजन
थंडी आली की स्वेटर बाहेर निघतात. स्कार्फ, बिनबाह्यांचे स्वेटर, कानटोप्या असं सगळं आपण घालतो; पण ते घालताना सहसा आळशी विचार काय असतो की, आतून कसेही शर्ट घातले तरी काय फरक पडतो? कुणाला कळतंय.नव्या ‘लेअरिंग’ स्टाइलमध्ये मात्र या आळशी सुस्त विचारांनाच कालबाह्य ठरविण्यात आलं आहे. आणि एरव्ही जी काय स्टायलिश असण्याची आणि फॅशनेबल दिसण्याची हौस करून घ्यायची ती थंडीत लेअरिंग नामक कलेचा हात धरून करून घ्यायची. अनुष्का शर्माने केलेलं परफेक्ट लेअरिंग सध्या हिट आहे . तिला कॉपी करायचं म्हणून नाही, तर थंडीत लेअरिंग मस्त करता येतेच. खरंय हे, लेअरिंग इज अॅन आर्ट असंच म्हणतात. तसा लेअरिंग म्हणजे एकावर एक कपडे घालणं हा पश्चिमी प्रकार, कारण त्यांच्याकडे थंडी जास्त असते. आपल्याकडे सर्रास लेअरिंग करत एकावर एक कपडे चढवले तर घामानं आणि उकाडय़ानं जीव जायचा.त्यात अजून एक गोष्ट असते की, अनेकांना वाटतं आपण गुटगुटीत, वजनदार. आपल्याला लेअरिंग काही चांगलं दिसणार नाही. प्रत्यक्षात हादेखील गैरसमजच. कारण स्टायलिश लेअरिंग केलं तर ते सगळ्यांनाच चांगलं दिसतं.सगळ्यात मोठा फायदा तरुण मुलांना. लेअरिंग ही कलाच जेंडरलेस आहे. म्हणजे एरव्ही सगळ्या फॅशन तरुण मुलींच्या वाटय़ाला येतात. लेअरिंग मात्र तरुण मुलांनीही करावं आणि मस्त स्टायलिश दिसावं असं सहज सोपं आहे.त्यामुळे थंडीत फुकटात स्टायलिश दिसण्याची संधी काही सोडू नका. फुकटात यासाठी की सगळे कपडे आपल्याकडे घरात असतातच, दुकान पहायची गरज नाही. बिंधास्त वापरा. आणि थंडीत हॉट दिसा, विथ कूल स्टाइल!लेअरिंग कसं करायचं यासाठी या काही टिप्स. आधी म्हटलं तसं, या सहज करता येणार्या स्टाइल टिप्स मुलगे-मुली दोघांसाठीही आहेत. एकदम कडक!!
1. लेअरिंग करताना जमल्यास रंगसंगती लक्षात घ्यावी म्हणजे आतून फिक्कट रंगाचे कपडे असतील तर बाहेरून डार्क किंवा त्याउलट हे सूत्र लक्षात ठेवायचं. मग सगळं छान दिसतं, फक्त एकाच कलरचं लेअरिंग कॅरी करायला कॉन्फिडन्स लागतो, तो असेल तर ते ही ट्राय करून पाहावं.2. आतून एक लांब बाह्यांचा टी-शर्ट आणि त्यावर लांब बाह्यांचं शर्ट स्टाइल स्वेटर हा सोपा आणि हिट मामला आहे. स्वेटरची बाही वर आणि शर्टाची बाही मनगटार्पयत असं कॉम्बिनेशन उत्तम.3. स्वेटर आणि कॉलरचा फॉर्मल शर्ट हे कॉम्बिनेशन तर फॉर्मल म्हणूनही खपू शकतं.4. ओव्हरसाइज स्वेटर, ढगळे स्वेटर, घरातल्यांचे स्वेटरही बिंधास्त लेअरिंग म्हणून वापरता येतात.5. कुठलंही जॅकेट उत्तमच, पण यंग आणि स्टायलिश दिसायचं तर डेनिम जॅकेट घालावं, बाहीचं, बिनबाहीचं दोन्ही चालतं.6. आतून शर्ट किंवा टी-शर्ट त्यावर लॉँग ओव्हरकोट, लॉँग स्वेटर घालायचं, या स्वेटरची बटणं लावायची नाहीत.7. खूपच थंडी पडेल तेव्हा आतून टी-शर्ट, त्यावर स्वेटर, त्यावर ओपन जॅकेट हे प्रकरण भारी दिसतं.8. शर्ट त्यावर बिनबाह्याचं जॅकेट त्यावर लांब स्वेटर किंवा जॅकेट हा लेअरिंगचा प्रकारही हॉट आहे.9. या सगळ्यात स्कार्फ, मफलर हे नेटवर पाहून स्टायलिश गुंफले तरी भारीच काम.10. तरुण मुलांना फ्लोरल शर्ट ट्राय करून पहायचे तर हा सोपा पर्याय, आतून शर्ट असल्यानं कॉन्फिडन्स वाढेर्पयत फुलाफुलांचे शर्ट असे लेअरिंगच्या निमित्तानं घालून घ्यावेत.