- प्रसाद मुळे
भारतीय आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांची विभागणी तीन स्तरात केली जाते. पिरॅमिड सारखी रचना म्हणू ही.
पहिला स्तर टॉप मॅनेजमेंट, दुसरा स्तर- मिड लेव्हल मॅनेजमेंट, आणि तिसरा सगळा खालचा भाग म्हणजे टेक्निकल स्टाफ.
‘टॉप मॅनेजमेंट’ या स्तरातले उच्चपदस्थ लोकसंख्येने कमी; पण अतिशय महत्त्वाचे. देश-परदेशात वास्तव्य करून तिथल्या उद्योगांच्या आयटीविषयक गरजा समजून घेऊन ते भारतात व्यवसाय आणतात. आयटीतली बदलती दिशा आणि क्लायण्ट्सच्या बदलणाऱ्या अपेक्षा ते जाणून असतात. त्यांच्या निर्णयक्षमतेवर आयटी कंपन्यांचे यशापयश बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं. ‘मिड लेव्हल मॅनेजमेंट’ या स्तरातले लोक म्हणजे या थ्री लेअर्ड सॅण्डविचमधले लोक. आलेलं काम, प्रकल्परूपात उपलब्ध मनुष्यबळाकडून मागणीबरहुकूम आणि शक्य तितक्या कमी खर्चात करून घेणं ही यांची मुख्य जबाबदारी. वेगवेगळ्या प्रकारच्या कामांच्या गरजा, तंत्रज्ञानातल्या खाचाखोचा, मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करण्याची क्षमता यामुळे हे लोक आजवर प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात बिनीचे शिलेदार ठरत. ‘टेक्निकल स्टाफ’ हा या पिरॅमिडचा सगळ्यात खालचा स्तर, ज्यात प्रोग्रॅमर्स, डिझायनर्स, टेस्टर्स, टीम लीड्स अशा तंत्रज्ञांचा समावेश आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानात पारंगत असलेले हे आयटी कामगार मिड लेव्हल मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनानुसार काम करतात. अभिप्रेत असलेली कामं/प्रकल्प पूर्ण करतात.
या पिरॅमिडच्या आकारानुरूप कर्मचाऱ्यांचं संख्याबळ खालून वर कमी होत जाणारं आहे. अर्थात प्रगतीचा मार्ग हा खालच्या स्तरातून वर असा अरुंद होत जाणारा आहे, परिणामी एका स्तरातून दुसऱ्या स्तरात कमी लोक पोचतात. ढोबळमानाने पाहिल्यास, मागच्या २०-३० वर्षात नावारूपास आलेल्या या उद्योगातली पहिली पिढी आता ‘टॉप मॅनेजमेंट’ या स्तरापर्यंत पोचलेली. दुसरी पिढी ‘मिड लेव्हल मॅनेजमेंट’ या स्तरात नांदतेय.
आयटी उद्योगात मागच्या पंधरा वर्षात झालेल्या तुफान वाढीने कर्मचारी संख्या कैकपटीने वाढली आहे आणि हा प्रगतीचा मार्ग अधिकच अरुंद झालेला आहे. भारतातल्या टेक जगतात पाश्चिमात्य जगाच्या अपरोक्ष, तुम्ही अनुभवानुसार आयटी तंत्रज्ञानांमध्ये किती पारंगत झाले आहात यापेक्षा किती लोक तुमच्या हाताखाली आहेत यावर तुमची प्रगतीची झेप मोजली जाते. अमक्या वर्षात किमान तमक्या पदावर पोचणं म्हणजे यश या मानसिकेतून या आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावर प्रगतीसाठीची रॅट रेस सुरू आहे.
वेगवेगळ्या कारणामुळे आयटी कंपन्यांना या मागचे २५-३० वर्षं रूळलेला हा धोपटमार्ग सोडून नवा मार्ग चोखाळायची गरज निर्माण झाली आहे. ‘टेक्निकल स्टाफ’ हा बव्हंशी टेक सॅव्ही, तिशीच्या आतला बाहेरचा असल्याने बदलाला पूरक दृष्टिकोन ठेवून आहे. ‘मिड लेव्हल मॅनेजमेंट’ मात्र पिरॅमिडच्या वरच्या टोकाकडे जाण्याची आस असलेला आणि प्रोग्रामिंग वगैरे तांत्रिक कामांशी फारकत घेऊन काही काळ उलटलेला वर्ग आहे. आयटीमध्ये प्रकल्प व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीतील अॅ्र’ी टी३ँङ्मङ्मि’ङ्मॅ८ या पद्धतीच्या वाढत्या वापरामुळे प्रकल्प यशस्वी होण्यासाठी गरजेची असलेली कामं जसं वर्क डिस्ट्रिब्यूशन, टास्क ट्रॅकिंग, स्टेट्स अपडेट्स इत्यादी आता अत्यंत सुलभ झालेली आहेत. तसेच वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी, क्लाउड तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे पूर्ण प्रकल्प भारतीय कंपन्यांना देऊन काम करवून घेण्याऐवजी त्यांचे तंत्रज्ञ आपल्या टीममध्ये कंत्राटी रूपावर सामावून घेणं परकीय कंपन्यांना अधिक सोयीचं झालं आहे. या अशा कारणांनी ‘मिड लेव्हल मॅनेजमेंट’ जी कामं करतात ती कामं अतिशय वेगाने कालबाह्य होत आहेत.
तुलनेनं सिनिअर झालेली आणि जास्त पगार घेणारी ही मंडळी यामुळेच कंपन्यांसाठी खर्चिक ठरायला लागलीत. भारतीय आयटी कंपन्यांच्या व्यापाराचा मोठा हिस्सा हा परकीय कंपन्यांना स्वस्त मनुष्यबळ पुरवणं हा आहे. हे मनुष्यबळ ‘आॅफ शोअर’ म्हणजे इथंच भारतात राहून इंटरनेटच्या माध्यमातून तिथले संगणक इथून हाताळून करते. व्हिडीओ आॅडिओ कॉन्फरन्सनिंगद्वारे रोजच्या मीटिंग्समध्ये सहभाग घेऊन तिथल्या टीमचा व्हर्च्युअल हिस्साच झाले आहेत. त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी इथे वेगळा मॅनेजर असण्याची गरज कमी झालेली आहे. त्यामुळे क्लायण्ट्सनापण त्यांच्या टीममध्ये फक्त डेव्हलपर किंवा टेस्टर्स असं टेक्निकल काम करणारे लोकच हवेत आणि ही सिनिअर मंडळी नकोय. या बदलांमुळे ‘मिड लेव्हल मॅनेजमेंट’ हे पैसे न कमावणारं मनुष्यबळ बनतंय आणि त्यांचा पुनर्वापर इतर संधींसाठी कसा करावा हा प्रश्न सध्या आयटी कंपन्यांपुढे आ वासून उभा आहे.
आयटी इंडस्ट्रीत ऑटोमेशननं आणलेल्या बदलांची नोंद घेणं इथं गरजेचं आहे. औद्योगिक क्र ांतीपासून दौडू लागलेल्या ऑटोमेशनच्या वारूने आयटीतही आपली घोडदौड कायम ठेवलेली आहे. आता मागच्या काही वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये झालेल्या प्रगतीने हा वारू ‘आॅन स्टिरॉइड्स’ धावू लागलेला आहे. आयटीमधली अॅप्लिकेशन मॅनेजमेण्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट नावानं ओळखली जाणारी ‘सपोर्ट क्षेत्रे’ आॅटोमेशनने प्रभावित होतील. त्या क्षेत्रातलं काम कमी कमी होत जाईल. उदाहरणार्थ डाटाबेस मेण्टेनन्स, बॅकअप घेणं वगैरे कामांसाठी आज असणाऱ्या मोठ्या टीम्स वेगाने लहान होत आहेत. माणसं करत होती तीच कामं करणारे रोबॉट्स किंवा प्रोग्रॅम्स त्यांच्या जागा घेत आहेत ही आजची रिअॅलिटी आहे. कोड लिहू शकणारे रोबोट्स येत्या काही वर्षात शिरकाव करतील. आॅटोमेशन करताना लागणारी माणसाची गरजही कमी कमी होत आहे. बदलत्या काळाबरोबर शिकत नवनवी स्किल्स आत्मसात करणं नव्या काळाची मोठी गरज आहे.
बदलाला तयार नसणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे.
(लेखक अमेरिकेतील नोवाय या शहरात आयटी क्षेत्रात प्रिन्सिपल कन्सलटण्ट आहेत.)