- आवेझ काझी
डिजिटल जगात महिला सेफ आहेत का?हा प्रश्न आज सगळ्यात महत्त्वाचा आहे. अनेक महिलांना डिजिटल स्पेसमध्ये विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे.सायबर बुलिंग, मॅसेंजर मॅसेज बॉम्बिंग, सायबर डिफेमेशन, प्रोफाइल मार्फिग याबाबी रोज घडत आहेत. सोशल मीडियावर होणारी आभासी मैत्री ही आपल्या दैनंदिन जीवनातील मित्र-मैत्रिणींपुरती सीमित न राहता अनोळखी लोकांशी होत असल्याने याचा गैरवापरही होत आहे. काही समाजकंटक स्वत:च्या स्वार्थासाठी चुकीचा वापर करतानाही दिसतात. यामध्ये महिला अनेकदा सॉफ्ट टार्गेट ठरतात. विशेषत: तरुण मुली.महिला/तरुणींना अधिकतम टार्गेट करण्याचा प्रकार सायबर क्राइमच्या आकडय़ांनी उघडकीस आणला आहे.
सोशल मीडियावर फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर कुठल्याही तरुणीचा फोटो व प्रोफाइल सहजासहजी मिळवून त्याच्यावर मार्फिग करून बदनामी करेन अशी धमकी देणो, त्याच्या मोबदल्यात एखादी अवाजवी मागणी करणो, सतत मेसेजरवर एखाद्या महिलेला संदेश पाठवणो व त्यातून शारीरिक संबंधांची मागणी, पैशाची मागणी करणो असे गुन्हे सर्रास घडताना दिसत आहेत.सोशल साइटवरून मुलींचे फोटो मिळवून त्यात बदल करून अपलोड करणो, महिलांना अश्लील चित्रे, संदेश पाठविणो असे गुन्हे घडलेले आपण वृत्तपत्रंतून वाचतोच; मात्र याचे परिणाम समाजासाठी किती घातक ठरतील याचा विचारही आपण करत नाही. एखाद्याशी असलेले वैर काढण्यासाठी, मुलीने दिलेल्या नकारासाठी, एकतर्फी प्रेम, नाहक छळाची वृत्ती अशा कारणातून बहुधा असे गुन्हे घडतात.म्हणूनच डिजिटल स्पेसमध्ये वावरताना विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. विशेषत: तरुणींनी अधिक दक्षता घेणो गरजेचे आहे. एखादी व्यक्ती आपल्याशी काय बोलत आहे, तिचा आपल्याशी बोलण्यामागे काय हेतू आहे, ती व्यक्ती परिचित आहे का या बाबी पडताळणो महत्त्वाचे आहे.तसेच अनोळखी व्यक्ती आपल्याशी काय शेअर करतात हे पाहणंही गरजेचं आहे.न कळत्या वयामध्ये नको त्या पद्धतीने पोर्न आपल्यार्पयत येतं आहे का? आपण कुणाला पाठवतो आहे का? कुणी पाठवलं तर काय याचा विचार करायला हवा.कुणी अतिसलगी करत असेल, कुणी अतीच संपर्क करत असेल, काहीबाही पाठवत असेल किंवा तुमच्या मित्रंपैकी कुणी चुकीची मागणी करत असेल तर वेळीच सावध व्हा.कुणी सतत त्रस देत असेल तर दुर्लक्ष करू नका, किंवा घाबरू नका. मदत मागा. दडपण टाळा, आणि ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका. कायदे मदतीला आहेत. मात्र आपली सजगता, सायबर साक्षरता आणि सावधानताच आपल्याला वाचवू शकेल.त्यामुळे सायबर बुलिंगच्या वाटेनं न जाता एक सशक्त माध्यम म्हणून इंटरनेट वापरणं योग्य.
(लेखक पोलीस उपनिरीक्षक आणि सायबर गुन्ह्यांचे अभ्यासक आहेत.)