- डॉ. यशपाल गोगटे
वजन कमी करणं, ही सध्या बहुसंख्य तरुणांची समस्या असते. गेल्या आठवडय़ात आपण पाहिलंच की, नुस्तं व्यायाम करण्याशी नाही तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींशीही वजनाचा संबंध आहे. नियमित व्यायाम करण्याचे फायदे तर आहेतच. करण्याबद्दलची माहिती आपण मागील काही लेखांमधून जाणून घेतली. तसं अनेकजण उत्साहानं आहाराचे नियम आखतात. व्यायाम जोमानं करतात. वजन कमीही होतं. पण वजन कमी झाल्यावर पुढे काय? ते कमी झालेलं वजन टिकवून कसं ठेवायचं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो सगळेच विचारतात की, वजन नेमकं किती कमी करावं? अनेकजण वजन कमी करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या मनात 10-15-25 किलो असे काहीसे भन्नाट आकडे असतात. इतकं वजन सहजासहजी कमी होत नसतं. त्यामुळे वजन कमी करायला सुरुवात केल्यावर अपेक्षित यश मिळत नाही. आपण इतकं काही करतोय, इतके दिवस करतोय तरी म्हणावं तसं वजन कमी होत नाही असं म्हणत काहीजण निराशेपोटी व्यायाम करणं, आहारावर नियंत्रण ठेवणं सोडून देतात. आणि म्हणतात काहीही करा, वजन कमीच होत नाही. याचं मुख्य कारण हेच की, आपण किती वजन कमी करायचो, याचा वस्तुनिष्ठ विचारच करत नाही. मग नक्की वजन कमी किती करावं? तर त्याचा एक नियम आहे. तुमच्या वजनाच्या पाचटक्के एवढे वजन कमी केलं तरी वजन कमी करण्याचे, चयापचयाचे आजार नियंत्रित राहण्याचे फायदे आपल्याला मिळतात. म्हणजेच 60 किलो वजन असणार्या तरुणीनं तीन किलो वजन कमी केलं तरी तिला त्या वजन कमी करण्याचा फायदा होतो. तेवढं होतंय का कमी, याचा सुरुवातीला विचार करा.वजन कमी केल्यावर ते टिकवून ठेवणंदेखील तेवढंच महत्त्वाचं असतं. झटकन वजन कमी करणं मग ते परत वाढवणं आणि नंतर परत कमी करणं या प्रकाराला ‘यो-यो’ असं म्हटलं ेजातं. ते शरीराला जास्त नुकसान करतं. त्यामुळे थोडंसंच जरी वजन कमी केलं तरीपण ते जास्त काळ तसंच टिकवून ठेवणं महत्त्वाचं. तर ते अधिक फायद्याचं ठरतं.