- प्रा. विशाल पवारमा. दिग्दर्शक भाऊराव क-हाडे बबनचा तुम्हाला साष्टांग नमस्कार..सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तुमच्याच पिक्चरमधला बबन तुम्हाला कशाला पत्र लिहिलं? पण लिहितोय. बबनच आहे मी असं समजा. तुमच्या पिक्चरमधला नसलो तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील अन् प्रत्येक गावातील बबनच आहेत ना त्यातलाच मी एक. आम्हाला तुम्ही पडद्यावर दाखवलं म्हणून हे पत्र.माझी ओळख सांगता सांगता महत्त्वाचं बोलायचं राहिलंच की. पत्र लिहिण्यास कारण की, मी तुमच्याशी या पत्राद्वारे काही मुद्द्यांवर बोलू इच्छितो. (‘बबन’ पिक्चर महाराष्ट्रात हाउसफुल्ल चालला त्यासाठी अभिनंदन, बरं का!)अगोदरच मी उल्लेख केला की तुम्ही आमच्यासारख्या बबनला पडद्यावर दाखवलंत. अगदी त्याच्याप्रमाणेच आमचीदेखील स्वप्नं आहेत मोठं होण्याची. बक्कळ नसला तरी चालेल; पण ती पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याइतका पैसा कमवायचा आहे. पण सिनेमातल्या अन् नाना-दादासारखे लोक, गावगुंड म्हणा किंवा पुढारी म्हणा, ते काही आम्हाला नाही मोठं होऊ देत. कारण आम्ही मोठे झालेलो त्यांना चालणार नाहीये. त्या सर्वांच्या मनात भीती आहे की, बबनसारखी पोरं मोठे झाले तर यांच्या सत्तेला सुरु ंग लावतील. प्रत्येक गावातील बबन यांच्या भीतीमुळे दडपला जातोय, स्वत:च्या फायद्यासाठी वापरून घेतला जातोय. (निवडणुकीच्या वेळी एका मतामागे हजार रु पये असा रेट आहे काहीतरी, वर भत्ता वेगळाच.) काही ठिकाणी तर तो मारला जातोय (नगर जिल्हा त्यासाठी तर सध्या गाजतोय) प्रत्येक गावागावात हीच परिस्थिती. पण प्रस्थापिताना कळणार कधी हे. बबन आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करून पैसा कमावतोय, फुकटचं कुणाचं खात नाहीये. पण तोच जेव्हा कंपनीत दूध घालायला जातो तेव्हा हे अशी विचारपूस करतात की जशी काय कंपनी यांच्या बापाची आहे? (लिहिताना माझा अनावर झालेला राग आहे, लक्षात घ्या.)बॉलिवूड घ्या किंवा हॉलिवूड घ्या, त्या सिनेमातला हिरो ५०-१०० लोकांना मारतो, तरी हिरोला साधं खरचटतसुद्धा नाही. पण तुम्ही तर कमालच केली. आधी हिरोला माळरानातून पळवला, नंतर चड्डीत मुतुस्तवर मार खायला लावला. विलनला गोळीसुद्धा हिरोईननेच (कोमलने) मारली. हिरो मात्र पळून गेला नंतर. काहीपण दाखवता राव तुम्ही, असं कुठं असतं व्हय सिनेमात? पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर तुम्ही वास्तव मांडलं. बबनचं असंच होत असतंय वास्तवात. परिस्थिती हाताबाहेर असेल तर पळून जाण्यात धन्यता मांडणारा बबन. पुढं तो दुधाच्या किटलीनेच गुंडांना मारतो तेव्हा छाती अभिमानाने भरून आली होती आमची. तेही खरंच. कारण बबन नुसता मार खाणारा बबन नाहीये, वेळप्रसंगी मार देणारासुद्धा तो आहे. आम्हीही तसेच ना. आमचा बबन आहेच लई टेरर. बबन खडा तो साला सरकार से भी बडा !!!शाहरूखसारखे हात पसरवून, सलमानसारखी बॉडी करून, हृतिकसारखा डान्स करून (अजून आहेत बरीच नाव) पोरगी पटवलेली आम्ही पाहिली होती. पण साला, जी पोरगी आवडते (कोमल) आधी तिच्याबद्दलच मित्राकडे विचारपूस करायची की, ती कोमल आली आसन का? आणि जेव्हा ती समोर येऊन धडकते, तेव्हा मात्र तिलाच बोलायचं. आस कुठं असतं व्हय? अशानं पोरगी पटल का राव कुणाला? शहरातील मुली तर केस ठोकतील आमच्यावर. पण कोमल तशी नाही. तिनं बबनवर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम केलं. असंच असतंय ना प्रत्यक्षात. कॉलेजला एक मुलगी आवडत असताना गावाकडंपण एक आवडत असती (पपी). पण जेव्हा दोन्हीपैकी एक निवडायची वेळ येते ना तेव्हा मनाचा कौल जिच्यावर खर प्रेम असतं ना, तिलाच मिळतो अन् प्रेमाची निवडणूकसुद्धा तीच जिंकते.निवडणुकीवरून आठवलं, तुम्ही तर सरपंचीन बाईला डाईरेक शेळ्या घेऊन जाताना दाखवलं राव. आमच्या सरपंचीन बाईला फक्त फ्लेक्सवर अन् सह्या करण्यापुरत दाखवून या लोकशाहीचे तुम्ही तर अगदी वाभाडे काढले हो. मानल पाहिजे राव तुम्हाला. अशी आहेच की परिस्थिती प्रत्येक गावागावात. सत्ता आपल्या ताब्यात राहावी म्हणून ज्यांना सरपंचपदाची जागा आहे, त्यांनाच आपल्या पक्षातर्फे उमेदवारी देऊन निवडून आणायचे (लोकांमधून सरपंच पदाची निवड, हा कायदा आत्ता आलाय; पण आधी मात्र तसंच होतं की.) मी ऐकलंय भारत लवकरच महासत्ता होणार आहे म्हणे.. होईलही; पण सरपंच आपलाच झाला पाहिजेल.या सिनेमात तुम्ही बापाचा रोल केला ना. जमीन विकली दारूपायी आणि काम करायचं म्हटलं की, लोळत असता भरदिवसा कसं काय हिव वाजून येत तुम्हाला? पोराचे कष्ट कसे काय नाही दिसत? असुद्या, बाप तो बाप असतो. तुमचं पोरगं लई गुणी. असा बाप आहेच की प्रत्येक गावागावात अन् खेड्या-खेड्यात. आमच्याकडे बबनच्या अभिनयापेक्षा तुमच्याच अभिनयाची जास्त चर्चा ! तुम्ही पडद्यावर दिसले आणि साधी हालचाल जरी केली तरी प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्ट्या मारल्या ! बरेच ना बाप असे दिसले त्या भूमिकेत आम्हाला..पण खरं सांगतो, ज्या दुधाला बबनने स्वत:च सर्वस्व मानलं, ज्या दुधासाठी रक्ताचं पाणी केलं, त्याचं दुधात बबनचे रक्त वाहताना पाहून आमच्या काळजाचा ठोका चुकला. बबनला मारायला नव्हतं पाहिजे तुम्ही सिनेमात. काय चुकलं होतं त्याचं? कष्ट करून पैसा कमवून मोठं व्हायची स्वप्नं बघितली हे चुकलं की प्रस्थापितांविरुद्ध आवाज उठवला हे चुकलं?जाऊ द्या सिनेमातला बबन मारला खरा; पण प्रत्यक्षात गावाकडला बबन असा मरणार नाही.. ते उभं राहतील.. आता ते कष्ट करून मोठे होतील, त्यांच्या पिल्लूसाठी घर बांधतील, बबनचे बबनराव होतील अन् साहेबचे साहेबराव होतील...संघर्ष तर आहेच, करू की तोपण..पण आता मागे हटणार नाही..आमच्यातल्या बबनला जसा न् तसा सिनेमाच्या पडद्यावर दाखवला म्हणून पत्र लिहिलं तुम्हाला एवढंच..गावागावातले बबन दिसतील ना आता लोकांना नीट यापुढे.. काय?- आपलाच बबन