- मन की बात
आपलंच आपल्याला काही कळत नाही,
काही म्हणता काही टोटल लागत नाही,
कुठला ताळा कशाशी जमत नाही,
आणि स्वत:संदर्भातले सगळे हिशेब जमवले तरी
हातचा कुठं गेला हे काही कळत नाही.
***
कशानं होतं हे असं?
कुठला पाढा कुठं चुकतो,
कुठला गुणाकार कुठं संपतो,
कशाचा वर्ग? कशाची बेरीज?
काही म्हणता काही कळत नाही
आणि आपलाच भागाकार होतोय
हेच लक्षात येत नाही.
***
नुस्ता सगळा भागाकार?
कितीही द्या भाग,
बाकी सतत उरतेच
आणि मोठय़ा संख्येनं छोटय़ा संख्येला भाग जात नाही असा नियम असतानाही
आपला भागाकार तो जुमानत नाही,
सगळे आपले नियम, सगळी आपलीच गणितं
तरी गणितं सुटत नाहीत.
हे असं का होतं?
आपल्या लक्षात येत नाही.
***
कशासाठी हा बेकंब बे चा आपला रेटा,
कशासाठी सगळ्या उत्तरांच्या खेटय़ा
काही गणितं समजा सुटलीच नाही,
पण ती सोडवण्याची आपली रीत चुकलीच नाही तर.?
सुटतीलही गणितं, जमतीलही मेळ,
होईलही ताळा आणि कळेलही खेळ
***
पण हे सारं कसं व्हावं?
जगण्याच्या गणिताला थोडं मोकळं सोडावं,
जाऊ द्यावं जरा अंकांना त्यांच्या मनासारखं,
कधी नियमांची रीत, कधी आपली रीत
सोडवावीत कोडी टेन्शन न घेता मस्त,
गणित सुटल्यापेक्षा सोडवण्याची मजा असते.
बाकी शून्य येण्यापेक्षा,
ती आली कशी हे शोधण्यात गंमत असते.
त्या गमतीची ही टोटल,
जरा करून घेऊ,
आपलंच गणित आपण जरा समजून घेऊ.
( एका थाई मुक्तछंदाचा संपादित अनुवाद)