- शैलेश जाधव (निर्माण 6)
नवोदयला हॉस्टेलमध्ये राहून शिकताना कंपाउण्डबाहेर मुक्त बागडणार्या प्रत्येकाविषयी मला असूया वाटायची. त्या सर्वाप्रमाणे मला या कंपाउण्डच्या चार भिंतींपलीकडे जाऊन मुक्तपणे का नाही वावरता येत, एवढा एकच प्रश्न मला नवोदयच्या सुरुवातीच्या दिवसांत पडायचा. सुट्टीत जेव्हाही मी घरी जात असे तेव्हा गावातील माझे मित्न मला शेतात बोरं खाताना, ऊस खाताना, धरणावर मस्त पोहताना, नदीवर मस्त फिरताना दिसायचे. प्रत्येक सुट्टी संपल्यावर परत नवोदयला जाताना मी घरच्यांजवळ रडायचो; ‘मला पाठवू नका’, असं म्हणायचो आणि तरीही ते मला तिथे पाठवायचे.मी औरंगाबाद जिल्ह्यातील भटाणा गावचा, जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यांनतर मी नवोदयमधून बाहेर पडलो आणि गावातील मित्नांसोबत कॉलेजला जाऊ लागलो तेव्हा मला माझ्या नवोदयच्या आणि त्यांच्या गावाकडच्या शाळेतील शिक्षणातील तफावत जाणवू लागली. माझ्याबरोबर शिकत असताना माझ्या एवढीच किंवा माझ्यापेक्षा अधिक हुशार असणारी मुलं मी नवोदयमधून परत येईर्पयत शालेय शिक्षणात माझ्यापेक्षा खूप मागे पडली होती. अभ्यासक्रमातील एखाद्या विषयाची माझी समज आणि त्यांची समज यात खूप मोठा फरक पडला होता. मी फार हुशार वैगेरे होतो असं नक्कीच नव्हतं कारण नवोदयला मी एक सर्वसाधारण विद्यार्थी होतो. मग मधल्या सहा वर्षात असं काय घडलं होतं ज्यामुळे हा फरक पडला, हा प्रश्न मला पडायचा.
माझी समज जशी जशी वाढत गेली तस तसं ग्रामीण भागातील शिक्षण आणि शहरी भागातील शिक्षण यातील गुणात्मक तफावत जाणवू लागली. ग्रामीण भागातील माझ्या मित्नांना नवोदयला सीबीएससी बोर्डातून शिकलेल्या माझ्याशी किंवा तशाच शाळेतून शिकणार्या शहरातील उच्च मध्यमवर्गातील व श्रीमंत घरच्या मुलांशी स्पर्धा करायची होती. शिक्षणाच्या गुणवत्तेतील हा फरक ही स्पर्धा एकांगी बनवत होता. शिक्षणाच्या गुणवत्तेतील हा फरक माझ्या मनाला टोचणी लावत होता. आणि समाजातील असे अनेक फरक, विषमता गरीब-श्रीमंत, स्री-पुरु ष, जात-धर्म, श्रमजीवी-बुद्धिजीवी, इ. मनाला टोचत राहायचे. आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना माझ्या मनात रुजत होती. या भावनेतून मी ‘मला काय करता येईल?’ या शोधात होतो. इंजिनिअरिंग असंच संपलं. कॅम्प्समध्ये झालेल्या मुलाखतीतून नोकरीदेखील मिळाली. नोकरी करतानादेखील मनातली टोचणी कमी होत नव्हती आणि काय करता येईल याचा माझा शोध सुरूच होता.तेव्हा मी एका प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करत होतो. मी हा जॉब का करतोय हे मला स्पष्ट नव्हतं. म्हणजे पगार मिळतोय म्हणून करत होतो; पण त्याशिवाय इतर काही कारण नव्हतं. आयुष्यभर हेच करायचं आहे का? (‘जल्माला आलं हेलं, अन् वझं वाहू वाहू मेलं’ असं गावाकडे म्हणतात!) या प्रश्नाचं उत्तर मात्न ठळकपणे ‘नाही’ असंच होतं. तोर्पयत आलेल्या अनुभवांतून, वाचनातून काहीतरी वेगळं करावं ज्यातून आनंद आणि समाधान मिळेल असं वाटत होतं. मी शाळेत आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये असताना बरीच पुस्तकं वाचायचो. त्या सोबतच लोकमतची ‘मैत्न’ ही पुरवणी आणि त्यातील ‘जिंदगी वसूल’ हे सदरदेखील न चुकता वाचायचो. त्यातील गोष्टी वाचून मीदेखील इतरांच्या उपयोगी पडावं, इतरांसाठी काहीतरी करावं असं वाटत राहायचं. आनंदी आणि अर्थपूर्ण (अर्थपूर्ण हा शब्द तेव्हा मनात नसायचा) आयुष्य आणि आपल्याकडे असलेले पैसे याचा थेट संबंध नाहीये, असं माझं मत तोर्पयत झालं होतं (आताही आहे !). पण जगायला पैसे लागतात हेदेखील माहिती होतं. याच गोंधळात कधी वाटायचं आनंदवन किंवा हेमलकसा येथे जाऊन त्यांच्या कामाला जोडून घ्यावं (कारण तेव्हा तेवढंच माहिती होतं), तर कधी वाटायचं हा जॉब करत करत शक्य तेवढी मदत इतरांना करत राहावी.
याच वेळी निर्माण प्रक्रि येची माहिती मिळाली. निर्माण शिबिरातून गेलेले तरुण आणि ते करत असलेल्या कामाबद्दल वाचायला मिळालं. आपण हेच शोधत होतो असं वाटलं आणि निर्माणसाठी अर्ज केला. निर्माण शिबिरांतून अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली किंवा त्या उत्तरांच्या दिशेने प्रवास सुरू झाला. या शिक्षणप्रक्रि येने अनेक नवीन प्रश्न समोर उभे केले. कधीही न विचार केलेल्या गोष्टीबद्दल विचार करू लागलो. मला जशा प्रकारचं काम करायचं होतं तशा कामाच्या अनेक संधी समोर दिसू लागल्या. जगण्यासाठी पैसे कमावणे आणि सोबतच अर्थपूर्ण आणि आनंदी आयुष्य जगणे याचा ताळमेळ शक्य आहे ही जाणीव झाली. असे काम करणारे अनेक मित्नमैत्रिणी मिळाले. त्यांच्याशी बर्याच विषयांवर चर्चा करता आली. असं काही करायचं असेल तर हीच सर्वात योग्य वेळ आहे असं वाटलं आणि जर असं काही केलं नाही तर ही गोष्ट आयुष्यभर आपल्याला छळत राहील हेदेखील लक्षात आलं. तरीदेखील हा निर्णय सोपा नव्हता पुढे कसं होणार, आपल्याला हे काम जमेल का, कमी खर्चात राहता येईल का, असे अनेक प्रश्न होतेच; पण म्हटलं करून तर बघूया.तीन वर्षापूर्वी कंपनीमधील जॉब सोडून सामाजिक क्षेत्नात काम करायचा निर्णय घेतला. या निर्णयाने घरी बॉम्बस्फोट होणार हे मी गृहीत धरलं होतं. तसं पाहता विरोध करणं हा त्यांचा अधिकारच होता. खूप कष्टाने त्यांनी आम्हा भावंडांना शिकवलंय. पण आमच्या घरचे बॉम्बप्रूफ असल्याची जाणीव हा निर्णय घरी सांगितल्यानंतर झाली. माझा हा बॉम्ब घरी फुसक्या फटाक्यासारखा वाजला. या निर्णयाला जरासा विरोध करून घरच्यांनी परवानगी दिली. घरच्यांना पटवण्यापेक्षा मला स्वतर् निर्णय घेतानाच जास्त कष्ट पडले होते.कंपनीमधील जॉब सोडून मी कुमार निर्माण या उपक्रमात काम करायला सुरु वात केली. ‘कुमार निर्माण’ हा ‘एमकेसीएल नॉलेज फाउण्डेशन’, पुणे व ‘निर्माण’ - सर्च, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अभय बंग व विवेक सावंत व यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा ‘विद्यार्थी केंद्रित’ उपक्रम आहे. शालेय वयोगटातील मुला-मुलींमधील सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करणे व त्यांच्यामध्ये वैश्विक मानवी मूल्यांची रुजवणूक करणे हे याचे प्राथमिक उद्दिष्ट.कुमार निर्माणमध्ये काम करताना शिक्षण म्हणजे नेमकं काय? शिक्षणाचा हेतू काय असावा? त्यासाठीचे वेगवेगळे पर्याय कुठले अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता आला. शिक्षणाचे अनेक प्रयोग जवळून बघता आले. मुलांमध्ये चांगली मूल्य रुजावी यासाठी प्रयत्न करणार्या अनेक लोकांशी जोडून घेता आलं. मुलांसोबतच माझीही मूल्यं ‘कुमार निर्माण’मध्ये पुन्हा नव्याने घडली !‘कुमार निर्माण’सोबत साधारण तीन वर्ष काम केल्यानंतर आम्ही हा उपक्रम काही अपरिहार्य कारणांनी स्थगित करायचं ठरवलं आहे. त्यानंतर शालेय वयोगटातील मुलांसोबतच काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे. सध्या ‘शांतिलाल मुथा फाउण्डेशन’ या संस्थेसोबत काम करायला नुकतीच सुरुवात केली आहे.‘शांतिलाल मुथा फाउण्डेशन’ ही शैक्षणिक क्षेत्नात भरीव काम करणारी संस्था आहे. या संस्थेचे अनेक कार्यक्र म सध्या भारतभरात चालू आहेत. या कामाला नुकतीच सुरुवात केल्याने अनेक नवीन गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. सध्या या कामातील बारकावे शिकून घेणं आणि स्वतर्ला याकामासाठी योग्य बनविणे यावर जास्त काम करत आहे. त्यासोबतच संस्थेतील इतर काही कामातदेखील मदत करत आहेत.करून तर बघू म्हणत जरा दचकत; पण ठामपणे आणि विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा हा अर्थपूर्ण प्रवास आनंदात सुरू आहे.