कशाकशाचं आणि कधी फॅड येईल हे काही सांगता येत नाही. त्यातही आपण सोशल मीडियाच्या काळात जगतोय.
जगात कुठं पिकलं पान पडलं आणि ते लोकांनी उचलून कवटाळलं तरी आपल्याला ते घरबसल्या कळतं!
त्यालाच व्हायरल होणं म्हणतात आणि हे व्हायरल होणं साथीच्या आजारापेक्षा अर्थात व्हायरल इन्फेक्शनपेक्षाही जास्त धोकादायक आहे.
या उन्हाळ्यात अमेरिकेतल्या तरुण मुलांमधे असंच एक फॅड आलं. आणि त्याचा एक हॅशटॅग बनला. एकाएकी तो हॅशटॅगही इतका ट्रेडिंग करायला लागला की दक्षिण अफ्रिकेपासून ते ऑस्ट्रेलिया आणि भारत-पाकिस्तानसारख्या देशातही त्याची लागण झाली.
त्या ट्रेण्डचं नाव आहे, #sunburnart.
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल साइट्सवर दणादण पिक्चर आणि व्हिडीओ सेव्ह होऊ लागले. जो तो आपबिती रंगवून सांगू लागला.
हे प्रकरण इतकं गाजलं की, शेवटी वैद्यकीय तज्ज्ञांना या सा:याचा अभ्यास करून तरुण मुलांना कळकळून आवाहन करावं लागलं की, हे उपद्व्याप थांबवा नाहीतर तुम्हाला त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो.
मात्र फॅशनची लागण, व्हायरल साथ आणि डोक्यात फॅड असल्यावर तरुण मुलं कुणाचं काही ऐकतात का?
मग ही मुलं तरी कशी ऐकतील?
त्यामुळे अगदी त्वचेचा कॅन्सर होईल असा धोक्याचा इशारा मिळूनही सध्या ज्या ट्रेण्डने जगभरातल्या तरुण मुलांच्या डोक्यात उच्छाद मांडला आहे त्याचं नाव आहे ‘सनबर्न टॅटू’ किंवा ‘सनबर्न आर्ट’!
आहे काय हे सनबर्न प्रकरण?
आपल्याला तसं उन्हाचं काही कौतुक नाही. आपल्याकडे कायमच कडक ऊन. त्यामुळे सनबाथ घेणं नी टॅन होणं असली फॅडं निदान आपल्याला तरी महत्त्वाची वाटलेली नाहीत.
पण ज्या देशात कायमचाच गारठा त्यांना दोन-तीन महिने असलेल्या उन्हाळ्याचे फार कौतुक. त्यामुळे तसंही सनबाथ घेतानाचे फोटो शेअर करणं, समर एन्जॉय करणं, समुद्रकिनारी पुस्तकं वाचत असल्याचे फोटो टाकणं हे सारं सोशल मीडियात फिरत असतंच. त्याची क्रेझही असते आणि आपण किती हॅपनिंग आहोत हे जगाला दाखवण्याचा अट्टहासही असतो.
इथवर सारं ठीक होतं; पण यंदाच्या उन्हाळ्यात एक नवीन फॅड आलं. तेही टॅटूचा हात धरूनच! तशीही टॅटूची क्रेझ जगभर आहेच. एकदा तरी स्वत:वर इंक चालवून घ्यायची यातला थरार जो ते करून पाहतो त्यालाच कळतो हे खरंच आहे. मात्र यंदा या टॅटूनं एक वेगळीच मुसंडी मारली आणि नवीन ट्रेण्ड जन्माला आलं.
त्याचं नाव सनबर्न टॅटू.
त्यालाच काहीजण सनबर्न आर्ट म्हणतात.
काहीजण स्टेन्सिल्ड बर्न्स म्हणतात.
पण मूळ मुद्दा हा शरीरावर काही ना काही डिझाइन करून घेणं तेही टिपीकल टॅटू करून नव्हे, तर उन्हातान्हात तासन्तास बसून! आपलं शरीर भाजून काढणारी ही नवीनच कला अनेक तरुण-तरुणींना चॅलेंजिंग वाटत आहे.
सनबर्न करतात कसं?
स्टेन्सिल हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. पूर्वी सायक्लोस्टाईल प्रिण्ट करायचे किंवा पाटय़ा रंगवायचे ते या स्टेन्सिलने! अजूनही पत्रिका छापताना काहीजण या स्टेन्सिलचा वापर करतात.
या स्टेन्सिलने डिझाइन करून घेत ती कुणं चिकटवली आणि त्यावर शाई फिरवून ते काढून घेतलं की उमटलं ते डिझाइन तिथं, असं आपल्याला समजायलं सोपं असं हे प्रकरण.
आता तोच प्रकार अनेकजण स्वत:च्या अंगावर करू लागलेत.
आताशा हे स्टेन्सिल ‘फन टॅटू’च्या नावाखाली अनेक देशांत ऑनलाइनही मिळतं.
त्यामुळे ते घ्यायचं, त्यावर हवी ती नक्षी कोरायची आणि शरीरावर हव्या त्या ठिकाणी ठेवून उन्हात जाऊन बसायचं?
किती वेळ बसायचं?
तर उन्हाचा तडाखा असेल तसं.
काहीजण आठ तास, तर काहीजण सोळासोळा तास उन्हात फक्त बसून राहतात.
बरं हा टॅटू कुठं करतात?
तर कुठंही. हातावर, पायावर, कपाळावर, नाकावर, मानेवर, छातीवर, पायांवर कुठंही करतात. त्यासाठी
उन्हात रापतात. काहींना त्रसही होतो. पण केवळ आपल्या शरीरावर हा सनबर्न टॅटू असावा म्हणून ते हा सारा त्रस सहन करतात.
कशासाठी हा आटापिटा?
टॅटू काढायचं वेड हा झाला एक भाग.
मात्र आपण काढला, विषय संपला असं थोडंच आहे.
त्याहून मोठी क्रेझ आहे ती आपला हा पराक्रम व्हायरल करण्याची. मग त्यासाठीच अनेकजण स्वत:ची सनबर्न होण्याची प्रोसेस रेकॉर्ड करतात. आपले हात शूट करतात. किती वेळ लागला, काय अनुभव होता हे रेकॉर्ड करतात. फोटो काढतात.
आणि मग ते सोशल साइट्सवर टाकतात. त्यांना मिळणा:या कमेण्ट्स, लाइक्स ही टॅटूबरोबरची महत्त्वाची कमाई!
टॅटूपेक्षा खरंतर या सोशल कौतुकासाठी अनेकजण हा अट्टहास करकरून आपली त्वचा जाळून घेत आहेत!
आणि आपल्याकडे?
नवं जगच असं आहे की एखादी साथ आली तर ती फक्त एका देशापुरती मर्यादित राहूच शकत नाही. ती व्हायरल होतेच. मग आपल्याकडेही हा ट्रेण्ड येणार होताच.
मेट्रो सिटीतल्या तरुण वर्गात, जे एरवी एसीच्या बाहेरचं जग पाहत नाहीत, ज्यांना सूर्यप्रकाशच माहिती नाहीत तेही केवळ या ट्रेण्डसाठी स्वत:ला सूर्यप्रकाशाचे चटके देत सुटले आहेत!
म्हणूनच तिकडून इकडे आलेली ही साथ आता तोच हॅशटॅग घेऊन आपल्याही तरुणांना हाका मारते आहे.
निदान हे फॅड आहे आणि त्यापायी आपली त्वचा जाळू नये, त्यापेक्षा सकाळचं कोवळं ऊन खाऊन यावं इतपत शहाणपण तरी आधीच आपल्यापाशी असावं!
नाहीतर आधुनिक होण्याच्या नावाखाली जळकी स्कीन डिझायनर टॅटू म्हणून मिरवण्याची वेळ आपल्यावरही येण्याची शक्यता आहे!
हीना टॅटू
एरवी आपण मेहंदी सणावारालाच लावतो. पण हीना टॅटू नावाचे एक फॅड आता आपल्याकडेही चर्चेत आहे. पण हे टॅटू म्हणजेच शरीरावर कुठंही मेहंदीनं डिझाइन करताना त्यात फक्त मेहंदीच आहे याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. त्यात केमिकल्स असतात. काळ्या मेहंदीत तर हेअर डायही असतो किंवा कलरिंग केमिकल्सही. त्यामुळे हीना टॅटू करतानाही सावध राहा, कारण त्यातूनही त्वचेला इरिटेशन येऊन काही त्वचाविकार येऊ शकतात.
- चिन्मय लेले