- डॉ. यशपाल गोगटे हार्मोन्सची कुलूप-किल्ली कसं काम करते हे आपण मागच्या लेखात पाहिलं. योग्य कुलूपाला योग्य किल्ली लागली तर आरोग्याचे दरवाजे उघडतात. वाढ उत्तम होते. पण किल्ली लागली नाही किंवा कुलूपच बदललं, की शरीर आपल्याला सांगायला लागतं.त्याकडे आपलं लक्ष मात्र हवं. तरुण वयात पाऊलं चुकतात तशा अनेकदा या किल्ल्याही चुकूच शकतात. त्यात आपल्याकडे एक असा समज आहे की सामान्यत: हार्मोन्सशी संबंधित आजार हे केवळ हार्मोन्स तयार होण्याच्या कमी-जास्त प्रमाणावरच अवलंबून असतात. पण तसं नसतं. कारण कुलपाप्रमाणे असणारे रिसेप्टर हे जर गंजले तर हॉर्मोन्सची चावी बरोबर असूनही कुलूप उघडत नाही. म्हणजे हार्मोन्सचे बरेचसे आजार हे रिसेप्टरच्या क्षमतेवरही अवलंबून असतात. उदाहरणादाखल सगळ्यात सामान्य असलेला मधुमेह. यातला टाइप टू प्रकार डायबेटीस रिसेप्टरच्या बिघाडामुळेच उद्भवतो. त्याला इन्सुलिन रिसेप्टर रेसिस्टन्स असं म्हणतात. आता हे रिसेप्टर कधी बिघडलं, कसं बिघडलं हे शोधून त्यावर औषध द्यावं लागतं.त्यातही हार्मोन्सचं एक गणित असतं.हार्मोन्सचं प्रमाण व रिसेप्टरची संख्या यांचं प्रमाण बºयाचवेळा व्यस्त असतं. सविस्तर सांगायचं झाल्यास रक्तात हार्मोन्सचं प्रमाण वाढलं तर रिसेप्टरची संख्या कमी होतं. त्याउलट हार्मोन्सचं प्रमाण कमी झालं तर रिसेप्टरची संख्या वाढते. अशारितीने या दोघांचा समतोल राखला जातो व शरीर नैसर्गिकरीतीनं निरोगी राहतं.भ्रमाचा भोपळामात्र हे संतुलन बिघडलं की घोळ व्हायला लागतो. हार्मोन्सच्या आजाराच्या सुरुवातीच्या काळात हे गणितच चुकलेलं असतं. हार्मोन्स नसल्यामुळे रिसेप्टरची संख्या वाढलेली असते. हार्मोनच्या औषधाचा डोस कमी प्रमाणात पुरेसा होतो. या उलट हार्मोनचं औषध चालू केल्यावर, नैसर्गिक नियमाप्रमाणे हळूहळू रिसेप्टरची संख्या रोडावते. हार्मोनच्या औषधाचा डोस वाढवावा लागतो. हे न समजल्यामुळे हार्मोन्सच्या आजारात नेहमी औषधाचा डोस वाढतच जातो हा भ्रम पसरला आहे. तो एक गैरसमजच आहे.हार्मोन्सच्या व रिसेप्टरच्या व्यस्त प्रमाणामुळेच हार्मोन्सचे आजार बहुतांश प्रमाणात दीर्घ मुदतीचे असतात. अनेकदा हे आजार औषधांनी केवळ नियंत्रणात ठेवता येतात; परंतु पूर्णत: बरे होत नाहीत.आधुनिक मेडिकल सायन्समध्येही हार्मोन्स-रिसेप्टरचा समतोल राखण्यासाठी संशोधन सुरू आहे. अजून काही वर्षात सफल संशोधनांमुळे आपल्याला बहुतेक करून या हार्मोन्सच्या आजारांवर पूर्णत: मात करता येईल. मात्र तोपर्यंत तरी आपण आपल्या हार्मोनल आजारांविषयी बोललं पाहिजे. त्याचा आपल्या वाढीवर परिणाम होत असेल तर वैद्यकीय मदतही घेतली पाहिजे.कोण काय काम करतं?कुठलं हार्मोन, कुठल्या ग्रंथीसह कायम काम करतं?ते समजून घेतलं तर वाढत्या वयात आपल्याला होणाºया त्रासांचाही अंदाज येऊ शकेल.१) ग्रोथ हार्मोन : पिट्युटरी ग्रंथी हे हार्मोन तयार करते, हाडांची टोक रिसेप्टर म्हणून काम करतात आणि त्यानं उंची वाढते.२) थायरॉइड : थायरॉइड ही ग्रंथीच हे हार्मोन तयार करते, हृदय, स्रायू हे तिचे रिसेप्टर, ती चयापचयाचं काम करते.३) इन्सुलिन : स्वादुपिंड हे हार्मोन तयार करतं. लिव्हर आणि स्रायू हे त्यांचे रिसेप्टर. ते चयापचयाचं काम करतात.४) एॅड्रिनॅलीन : एॅड्रिनल ग्रंथी हा हार्मोन तयार करते. हृदय, स्रायू हे तिचे रिसेप्टर. उत्तेजित करण्याचं काम हे हार्मोन करते. dryashpal@findrightdoctor.com
बॅलन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 5:12 PM