- रवींंद्र सदाशिव लंगोटेकोपरगाव. अहमदनगर जिल्ह्यातील साखरसम्राटांचं गाव. तर मी तिथला. कोपरगावातील एसएसजीएम या महाविद्यालयात अकरावीला विज्ञान शाखेत मी प्रवेश घेतला; पण गणित आणि इंग्रजीच्या भीतीने एका महिन्यातच शाखा बदलून कला शाखा निवडली. शिक्षक होण्याचं स्वप्न पाहू लागलो. कला शाखा म्हटली की त्यावेळी फक्त डीएड करायचं एवढंच डोक्यात यायचं. त्यावेळी डीएडची अवस्था चांगली होती. मागासवर्गीय कोट्यातून डीएडला प्रवेश मिळेल असं निश्चित वाटत असतानाच त्यावर्षी केवळ एका गुणाने मला प्रवेश मिळाला नाही. शिक्षक होण्याचं स्वप्न धुळीस मिळतं की काय असं वाटायला लागलं. बीएला प्रवेश घेतला. पण वर्गात लक्ष लागेना. बरोबरचे मित्र डीएड करत होते. अस्वस्थ वाटत होतं. कॉलेज सोडून काम करायचा विचार करायचा ठरवलं.त्यावेळी संगणक शिक्षणाचे विशेष आकर्षण. नवीनच एमएससीआयटी हा शासनाचा कोर्स सुरू झाला होता. त्या कोर्सला प्रवेश घेतला. मग एका सायबर कॅफेत कामाला लागलो. संगणकाचं बरंचसं ज्ञान मिळालं. सायबर कॅफेत काम करत असताना नोकरीची आशा कुठे दिसत नसल्याने स्वत:चा सायबर कॅफे सुरू करण्याचा निर्णय मी घेतला. कोपरगाव जवळ संगमनेर तालुक्यात अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर सायबर कॅफे सुरू केला. घरच्यांचा पाठिंबा होता. सायबर कॅफेचा व्यवसाय तेजीत सुरू होता. रात्री ९-१० वाजेपर्यंत इंजिनिअर विद्यार्थी इंटरनेट वापरत असल्याने इकडे-तिकडे फिरायला वेळच मिळत नसे. माझ्या सायबर कॅफेत वेगवेगळ्या राज्यांची, गावांची मुले-मुली येत असत. बºयाच विद्यार्थ्यांशी माझी मैत्रीही झाली होती. गावापासून दुसºया तालुक्यात व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे अडचणी खूप येत होत्या. त्यात गावाकडील मित्र व नातेवाईक यांची ओढ नेहमी लागून राहायची. अशा परिस्थितीत व्यवसायावर लक्ष केंद्रित करणं अवघड होत होते. अडीच वर्षांनी सायबर कॅफे बंद करून मी गावी आलो. पुढं काय, हा प्रश्न होताच. पुन्हा गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि औरंगाबादला गेलो. मोठं शहर. वडिलांची मावशी रांजणगाव एमआयडीसीमध्ये राहात असल्याने मला त्या ठिकाणी निवारा मिळाला व कामही. मी एका वायर इन्सुलेशन कंपनीत काम करू लागलो. काम तसे हेल्पर म्हणूनच होते. तिथे काम करता करता इतर मित्रांच्या ओळखीने एका नामांकित कंपनीत तात्पुरत्या स्वरूपात कामाला लागलो. कामाचे तास फार. दमून जायचो.याच काळात मी पुन्हा कॉम्प्युटर शिकायचं ठरवलं. कोर्स करायचं ठरवलं. मग पुण्याला जायचं. पुण्यात राहण्याचा प्रश्न येईल यासाठी दौंड शहरात माझे चुलते राहतात, तिथं राहायचं ठरवलं. रेल्वे पकडायची व पुण्याला यायचे हा नित्यनेम सुरू झाला. पुण्यात मी जे शिक्षण घेत होतो ते शिक्षण कॉम्प्युटर इंजिनिअर घेत असत. सर्व शिक्षण इंग्रजीत होते. त्यात मी कला शाखेचा विद्यार्थी म्हणजे इंग्रजी तोडकीमोडकी. पण मला प्रात्यिक्षक ज्ञान असल्याने माझा तिथे निभाव लागला. पुण्यात मी रमू लागलो होतो. तिकडे महाविद्यालयातील सोबतचे मित्र शिक्षक झालेले होते. मी अजूनही बेकारच होतो. पण कॉम्प्युटर उत्तम येत होतं.आता पुढे काय? हा प्रश्न तसाच मागेमागे येत होता. त्यात कोपरगावला एका आदिवासी आश्रमशाळेत अनुसूचित जमातीचे शिक्षक पाहिजेत अशी जाहिरात निघाली. तिथं मला नोकरी मिळाली. पुढे माझे बीए मी पूर्ण केले. त्याचबरोबर डीएडची पदवीही घेतली. आणि आता एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रमशाळा, टाकळी, ता. कोपरगाव जि. अहमदनगर इथं शिक्षक म्हणून काम करतो आहे.(कोपरगाव, जि. अहमदनगर)