- आॅक्सिजन टीम
नव्या वाहन कायद्यानुसार आता रस्त्यावरच्या चुकीला माफी नाही तर कठोर शिक्षा आणि दंड होऊ शकतो, हे माहिती आहे का तुम्हाला?
काही नाही होत रे, तोड सिग्नल, पळव गाडी, निघ बिन्धास्त.. डबल काय, ट्रिपल सीट जातो आम्ही, कोण काय करतंय आपल्याला? नसेल नंबर प्लेट गाडीला, तर काय मोठा जुलूम आहे काय? चालव झिगझॅग, लाव रेस, चालव बुंगाट, कोणी काही म्हटलं तर पाहून घेऊ.. वाजव हॉर्न, वाजव की जोरात.. स्टाइल मारायची तर बाइक पळवावीच लागते.. स्पीडची किक असतेय येड्या, तुला काय कळायचं ते, तू चालव ट्वेण्टीच्या स्पीडने.. तो काय बावळट आहे, त्याची गाडी म्हणजे मुंगी.. पोरांनीच काय म्हणून गाडी दामटवायची? मुली काय कमी वाटलो काय? आपण पण हाणू ना गाडी शंभरच्या स्पीडने. कोणी कितीही कोकलो मागून, नाहीच द्यायची साइड.. घेतला गाडी चालवताना फोन, बोललं मोबाइलवर तर एवढं काय आकाश कोसळतंय? आपली काही टू व्हीलर नाही, फोर व्हीलर आहे. लावायची ढाक्चिक् ढाक्चिक् गाडी आणि पळवायची बुंगाट, पाटीशार्टी सगळं गाडीतच, स्टाइलमें! *** हे ‘असं’ सारं बोलता तुम्ही? आणि वागताही? बिंधास्त आहात एकदम, फुल धूम स्टाइल चालवता गाडी? आणि त्याचा अभिमान वाटतो तुम्हाला? ** असं असेल तर वेळीच सावध व्हा. कारण कायदा बदलला आहे, आणि आपल्या बेदरकार ड्रायव्हिंगची चांगली सणसणीत शिक्षा यापुढे होऊ शकते! *** केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार देशात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात. त्यामध्ये दीड लाख लोकांचे प्राण जातात. लोकसभेनं नुकत्याच मंजूर केलेल्या विधेयकानुसार सरकार देशात रस्ते अपघातात होणारे मृत्यू टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे. नव्या नियमांच्या मदतीने हे मृत्यू ५० टक्के कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि त्यासाठी कायद्यात जरूर त्या सुधारणा करत कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. आपल्याला नसली तरी आपल्या आणि इतरांच्या जिवाची काळजी सरकारला आहे. आणि रस्त्यावर अपघाताला सामोरं जावं लागू नये म्हणून आता प्रयत्नही सुरू झालेत. तेव्हा आपलं ड्रायव्हिंग नियम पाळत वेळीच सुधारलेलं बरं. नाहीतर यापुढे रस्त्यावर वाहन उतरवणं सोपं उरणार नाही! ते कसं?