- प्राची पाठक
‘पापा कहते हैं बडा नाम करेगा
बेटा हमारा ऐसा काम करेगा...’
हे गाणं तसं जुन्या जमानातल्या सिनेमातलं. पण अजूनही तसं पॉप्युलर आहे. कॉलेज गॅदरिंगमध्ये, ग्रुप्समध्ये हे गाणं अजून अपील होतंच. चटकन रिलेट करता येतं या गाण्याशी आणि असं म्हणावंसंही वाटतं की माझी ‘मंजिल’ नक्की काय, खरंच माहीत नाही. जसं आयुष्य समोर येईल तसं जगू हा अप्रोच. आजूबाजूचे सगळे ‘ध्येय-ध्येय’चे ढोल बडवत असतात. सांगत असतात, तरुणांनो ध्येय ठरवा. गोल सेट करा.
धावा, धावा, धावा.
अरे, पण ध्येय कसं ठरवा, कसं ठरवतात हे सांगाल की नाही? कोणतं ध्येय मला सोयीचं आहे? सोयीचं नसेल, तर ध्येय ठेवूच नाही की काय? कोणतं ध्येय मला झेपेल, झेपणार नाही, काहीच माहीत नाही. मग आपलं ध्येय काय? आपल्या जगण्याचं लक्ष्य काय? ‘गोल’ काय तुझं वगैरे कुणी विचारलं की दांडी उडतेच. त्यात आपल्याला नेमकं काय हवं हे कळत नाही हे वेगळंच.
‘मोठं झाल्यावर तुला काय व्हायचं आहे?
- हा प्रश्न शाळेत असल्यापासून अंगावर आदळतो. शाळा सुटली की अनेकांना थोडी स्पष्टता येतेदेखील. आवडी-निवडी कळतात. कधी पालक, शिक्षक, कधी मित्रमैत्रिणी काही सुचवतात. काही पटतं, काही पटत नाही. कुठे अमुकच करिअर कर हा घरच्यांचा रेटा सहन होत नाही तेव्हा ‘घर छोड के जा रहा हूं’ ड्रामा होतो. कधी आपणही स्वत:ला विचारतो, ‘साला, आपलं ध्येय आहे काय? करायचंय काय आपल्याला लाइफमध्ये?’
मग वाटतं, काहीही करू, काहीही होऊ पण ‘बडा नाम’ करू.
आपल्याला वाटतं, काय भारीतलं उत्तर शोधलं आपण.
पण म्हणजे काय?
ध्येय ठरवायच्या नादात आपण एखादं स्वप्नदेखील ठोकून देतो. ‘माझं स्वप्न आहे देश सुधारायचा, समाजसेवा करायची’ सांगतो कुणी बिंधास्त.
पण हे त्या बडा नाम करेगा सारखेच झाले. बडा नाम कशात करणार? कधी करणार? का करणार? कसं करणार? काय झालं म्हणजे बडा नाम होणार? कसलीच उत्तरं माहीत नाही. कोणतेच टप्पे नाहीत. कुठं जायचं, दिशा नाही. कसं जायचं, माहीत नाही. फक्त ‘खूप मोठा हो’ असा डोस पिऊन टाकायचा. मोठं व्हायची वाट बघत बसायचं. देश सुधारणे वगैरे स्वप्नं डोळ्यात धरून ठेवायची.
देश सुधारणार म्हणजे काय करणार भाऊ/ताई? का करणार? तुम्ही ज्याला सुधारणा म्हणतात, ती खरंच सुधारणा आहे का? तुम्ही कोण राजे महाराजे लागून गेले की तुमच्या एका आज्ञेत देश सुधारणार आहे? चटकन झाडू मारावा आणि फटकन सुधारणा झाली, असं होणार आहे? किती काळात देश सुधारणार? हे स्वप्न तुमच्या रोजच्या जगण्यातील उटारेटे निस्तरू शकतं का? कसं? जे ध्येय थेट आपल्या हातात नाही, ते किती साध्य होऊ शकतं याला मर्यादा असतात. हे निबंध स्पर्धेतलं स्वप्न असू शकतं. पण आपल्या आयुष्याचं ध्येय म्हणून निवडताना त्यात बारकावे भरणं आवश्यक असतं.
‘मी चांगला/चांगली वागेन, चांगला माणूस होईन’ असंही एक स्वप्न. स्वत:ला एक नोट सांगायला हरकत नसते. पण हे आयुष्याचं ध्येय कसं करणार? चांगला माणूस होणार म्हणजे नक्की काय होणार? तुमची चांगल्याची व्याख्या आणि इतरांची व्याख्या एक असू शकेल का? कोणकोणते अॅक्शन प्लॅन राबवून तुम्ही चांगलं होणार? कधी होणार? चांगला वागेन म्हणजे कसा वागेन? काय करेन? - हे सगळे प्रश्न निर्माण होतात.
‘माझं मोठं घर असेल’ असंही एक स्वप्न असायला हरकत नाही. स्वप्नांवर कोणी टॅक्स लावत नाही. स्वप्नं पूर्ण करायला ठोस अशी डेडलाइन नसते. केलं काय, नाही केलं काय! सगळं मनातच.
पण मग ठरवणार कसं की आपलं ध्येय काय? आपली दिशा नेमकी कोणती?
कशी ठरवणार ही दिशा? नेमकं काय काय केलं म्हणजे ध्येय निवडायचा आणि गाठायचा रस्ता दिसू शकतो? त्यावर टिकून कसं राहणार? मनाला अशा कोणत्या सूचना देणार ज्यानं ते इकडे तिकडे भरकटणार नाही? काय करायचं याची क्लारिटी कशी मिळवणार, मनाला आवर घालत त्याची उभारीदेखील कशी टिकवणार, हे सर्व पुढील सेल्फीमध्ये वाचूच.
तोवर तुम्ही आठवडाभर एक छोटुसं काम करा.
आपलं स्वप्न आणि आपलं ध्येय यावर थोडा विचार करून ठेवा.
बघा, जमतंय का, स्वत:मध्ये डोकवायला?
आपली ताकद किती?
आपण बोलतो किती?
आपल्याला वाटतं अमुक म्हणजे आपलं ध्येय. हे ध्येयदेखील मनातच राहू शकतं. पण ते प्रॅक्टिकल असायला लागतं. स्वत:शी जोडलेलं असावं लागतं. आपल्याला पेलणारं असावं लागतं. आपली कुवत नीट ओळखून मग उडी मारायचं भान त्यासाठी आवश्यक असतं. आपली झेप, आवाका टेकडी चढण्यापुरताच असेल आणि आपण पहिलंच लक्ष्य थेट एव्हरेस्ट चढायचं हे असेल तर ते जमेलच असं नाही.
अपवादात्मक कोणाचं होईलदेखील.
पण सगळेच अपवाद नसतात. एकदा फसलो, म्हणजे परत उभारी घेता येण्याची क्षमता आपल्यात आहे की नाही, हेही माहीत नसतं. मोठी स्वप्नं बघा, असं सतत सांगितलं जातं. पण ती पूर्ण करायचा प्लॅन हवा. पेलवेल तेच वजन सुरुवातीला उचलायला जावं. कोणाला काय पेलता येईल, हे आपण जज करून ठरवू नाही. पडत, धडपडत आपली कुवत जोखावी लागते. कुवतीवर काम करावं लागतं. ती वाढवावी लागते. अपडेट आणि अपग्रेड करावी लागते. त्याला मेहनत जोडावी लागते. आपली दिशा सातत्यानं चेक करावी लागते. तिथे गाडी अडखळू शकते. पुन्हा ती स्टार्ट करणं आलं. कधी सुरुवातीला सुसाट आणि नंतर खड्ड्यात असंही होऊ शकतं.
होऊ काहीही शकतं..
काय करायचं हे मात्र आपण ठरवू शकतो. ते ठरवणं शिकायला हवं.
prachi333@hotmail.com
( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)