अनिरुद्ध शर्मा फक्त २४ वर्षांचा आहे. तो अमेरिकेतल्या एमआयटीत शिकत होता. त्याआधी म्हणजे अमेरिकेला जाण्याच्या आधीच २0११ मध्ये त्यानं ‘ड्युकेरे’ नावाची कंपनी सुरू केली. ‘ड्युकेरे’चा अर्थ होतो ‘टू लीड’ म्हणजेच नेतृत्व करणं.
- सध्या तो एमआयटीच्या मुंबईस्थित मीडिया लॅबमध्ये काम करतो.
अनिरुद्ध म्हणतो, ‘भन्नाट कल्पना डोक्यात आली की, त्यावर विचार करायला आणि ती प्रत्यक्षात उतरवायला मला आवडतं. विषय तांत्रिक असला तरी त्याची सुरुवात स्वप्न, भास, त्यातली कल्पकता यातूनच होते. मुख्य म्हणजे आता टेक्नॉलॉजी वापरातला तोच तो पणा आणि कीबोर्ड-माउसचे अडथळेही मला नकोसे वाटू लागलेत. त्यापलीकडे अगदी सहज आपल्याला टेक्नॉलॉजी वापरता यायला हवी.’
त्याच्या वयाच्या तरुण मुलांमध्ये असतो तसाच उत्साह त्याच्याशी बोलण्यात जाणवतो. नव्या स्वप्नांचं आणि कल्पनांचं कोरंकरीतपणही त्याच्या शब्दात जाणवतंच. पण तसा अनिरुद्ध कॉलेजात काही पडाखू नव्हता. तो सांगतो आपल्या बॅकबेंचर असण्याची गोष्ट. इंजिनिअरिंगच्या वर्गात तर शिक्षक शिकवायचे ते अनेकदा डोक्यावरूनच जायचं. त्यामुळे मागच्या बेंचवर बसून मोबाइलवर ‘टेड टॉक्स’ पाहणं, ऐकणं हा त्याचा छंद. त्यातही चिनी इनोव्हेटर जेक अँनचा फॅसिनेटिंग व्हिडीओ त्याला पहायला मिळाला. त्याचा मित्र राहुल, त्यालाही त्यानं मागच्या बेंचवर बोलावलं आणि मग दोघांनी मिळून तो व्हिडीओ पाहणं सुरू केलं. त्यातून असेच काही उत्साही मित्र जमले आणि त्यांनी ‘टीम स्पर्श’ नावाची एक टीमच बनवली. त्याकाळात अनिरुद्धचा कॉलेजात जेमतेम २ टक्केही अँटेडंन्स नव्हता. त्याचकाळात एचपी लॅब्जवाल्यांनी त्याला हेरलं आणि तो त्यांच्याबरोबर काम करू लागला. तेव्हा तर तो ग्रॅज्युएटही झालेला नव्हता.
त्याचदरम्यान त्याला व्हायब्रेटरवाल्या बुटाची आयडिया सुचली आणि अनिरुद्धनं हातातली नोकरी सोडून आपली कंपनी स्थापन केली.
त्यानंतर तो पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाला. तिथं त्याला क्रिस्पन भेटला. अनिरुद्ध म्हणतो, ‘मला इनोव्हेशन जमतं पण ते विकायचं कसं, लोकांपर्यंत कसं पोहचवायचं हा माझा प्रांतच नाही. ते काम क्रिस्पनंच केलं. आता आमच्याकडे १0 लोक काम करताहेत आणि लवकरच आम्ही या बुटाचं उत्पादनही सुरू करू.’
सध्या मात्र अनिरुद्ध मुंबईतल्या एमआयटी लॅबमध्ये एक नवीन इनोव्हेशन करण्यात गुंग आहे. कुठल्याही प्रकारच्या काजळीपासून (दिव्याच्या ते गाड्यांच्या) छपाईयोग्य शाई कशी बनवता येईल यावर तो काम करतोय.
मूळचा दिल्लीचा, एका इंग्लिशच्या प्राध्यापकांचा अनिरुद्ध हा मुलगा. त्यांचं मूळ गाव मथुरेजवळचं एक खेडं. मोकळंढाकळं वातावरण, त्याच वातावरणामुळेच असेल कदाचित पण नवीन कल्पना सुचणं आणि स्वीकारणं दोन्ही मला चांगलं जमतं असं अनिरुद्ध सांगतो.
वेअरेबल टेक्नॉलॉजी हे एकमेव त्याचं पॅशन नाही तर तबल्याचीही त्याला आवड आहे.
विशेष म्हणजे, ‘जे काम झालं ते झालं, आता पुढचं’ असं म्हणत अनिरुद्ध ऑलरेडी पुढच्या कामाला लागलाय.
‘लेचल’
हा बूट ‘चालतो’ कसा?
* त्यासाठी तुमच्याकडे एक स्मार्टफोन हवा, ज्याचं ब्लूटूथ अँक्टिव्हेट हवं.
* ‘लेचल’बुटाच्या सोलमधे एक लीलीपॅड ऑरडिनो सर्किट बोर्ड आहे.
* मागे पुढे, डावीकडे-उजवीकडे अशा दिशादिग्दर्शनासाठी चार व्हायब्रेटर्स आहेत.
* बुटात एक कण्ट्रोल बोर्ड आहे, ते बोर्ड फोनमधली जीपीएस सिस्टिम वापरून, गुगल मॅप्सचा वापर करुन स्वत:हून आपला मार्ग निश्चित करेल.
* डाव्या उजव्या बाजूला वळायचे असेल तर तो टर्न येण्यापूर्वी १0 मीटर आधी त्या त्या पायाला जाणवेल इतक्या प्रमाणात बूट व्हायब्रेट होईल.
* याशिवाय तुम्ही किती चाललात, किती कॅलरी जळाल्या, याचा डाटाही हा बुट ठेवेल.
वेअरेबल टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
खरंतर ही संकल्पना अगदी सोपी. वेअरेबल म्हणजे अंगाखांद्यावर घालता येईल, शरीराच्या अगदी जवळ बाळगता येईल अशी गोष्ट. आपण घालतो ते कपडे, दागिने, केसांचे रबर-क्लिप्स हे सारं वेअरेबल गटात मोडतं. टेक्नॉलॉजी आपल्या जगण्याचा जसजसा भाग व्हायला लागली, गॅजेटशिवायचं आयुष्य अवघड होऊ लागलं त्याकाळात ही गॅजेट अंगावर धारणच करता आली, तर किती सोपं होईल अशा भावनेनं संशोधनाला सुरुवात झाली आणि त्यातून अनेकानेक इनोव्हेटिव्ह आयडियांचा जन्म व्हायला लागला. आपलं मनगटी घड्याळ हे खरंतर त्याचं पहिलं दृश्य स्वरूप. आपण ते हातावर बांधून कुठंही जाऊ शकतो. तसंच आता आपली तब्येत, स्टॅमिना, फिटनेस, फोन्स, आपल्याला अत्यावश्यक भौगोलिक दिशादर्शन यासाठी आवश्यक टेक्नॉलॉजीलाही ‘वेअरेबल’ आणि ‘स्मार्ट’ रूप कसं देता येईल यासाठी जगभर अभ्यास सुरू आहे.
हीच ती वेअरेबल टेक्नॉलॉजी.
सध्याचे सुपरहिट वेअरेबल गॅजेटस
जशी या ‘लेचल’ बुटाची सध्या वेअरेबल टेक्नॉलॉजीच्या जगात चर्चा आहे. तसेच आणखीही काही गॅजेट्स आहेत. त्यातलं गुगल ग्लास हे नाव तरी नक्कीच तुमच्या कानावरून गेलं असेल. तर जगात चर्चेत असलेल्या वेअरेबल गॅजेट्सची ही एक झलक.
गुगल ग्लास
गुगल ग्लास हे सध्या जगातलं सगळ्यात हॉट गॅजेट मानलं जातं. अल्ट्रा हाईप्ड ग्लासेस. हा चष्मा काय करू शकत नाही ते विचारा.
तो तुमच्यासाठी मॅप्स दाखवू शकतो. शोधू शकतो. फोटो काढू शकतो. म्हणजे काय तर समोर दृश्य दिसलं आणि आपल्याला वाटलं की याचा फोटो काढावा की हा चष्मा तो फोटो काढून मोकळा. रेकॉर्ड करू शकतो. व्हिडीओ बनवू शकतो. फोन करू शकतो, त्यावर फोन येऊ शकतात. एक चष्मा डोळ्यावर चढवला की, काम फत्ते. बाकी काही टेक्नॉलॉजी बाळगायची गरजच नाही.
इंटरॅक्टिव्ह शर्टस
टीशर्टसारखा टीशर्ट. पण छातीवर, पुढच्या भागात एक इंटरॅक्टिव्ह सेंसर असतो, जो चक्क कम्युनिकेट करू शकतो.
हुडी विथ इअरफोन
थंडीत आपण हुडी घालतोच. त्याच्या कानटोपीच्या दोर्या आपल्या खांद्यावर येतातच. त्या दोर्यांचाच इअरफोनसारखा वापर करायचा. खिशातला फोन त्या दोर्यांशी कनेक्ट केला की वायरची माळ गळ्यात-कानात घालायला नको.
युएसबी नेकलेस
ऐन कामाच्या वेळेस पेनड्राईव्ह सापडत नाही असं होतं ना, त्यासाठीच हे नेकलेस. वर सुंदर पेंडट, उघडलं की पेनड्राईव्ह. मस्त गळ्यात घालून मिरवायचं.
वॉच विथ स्मार्टफोन
घड्याळच, मनगटावरच बांधायचं पण ते काही फक्त वेळ दाखवणार नाही तर ते स्मार्टफोनशी कनेक्ट असेल. ब्लूटूथ वापरून त्यावर फोन, मेसेजेस, ईमेलसुद्धा पाहता येतात. सगळं काम फोनसारखंच.
६) याशिवाय सध्या युएसबी कफलिंक्स, फ्युएल बॅण्ड, आय वॉलेट, पेबेल स्टिल वॉचही खूप चर्चेत आहेत.