-ऑक्सिजन टीम
तुमचा आवडता, लाडका, जीवाभावाचा दोस्त असलेला पाळीव कुत्रा, त्याला घेवून ऑफिसला जाता आलं तर?
ऑफिसात पेट्स? कुत्रा??
जरा अशक्यच वाटतं आहे ना?
पण लवकरच ते शक्य होवू घातलं आहे, ते ही जगाच्या महासत्तेच्या राजधानीत. वॉशिंग्टन डीसीमध्ये येत्या मे महिन्यात अनेक कार्यालय ते फेडरल एजन्सी ते सरकारी संस्था आपल्या कर्मचार्यांना आपापले पाळीव श्वान कार्यालयात दिवसभर घेवून येण्याची परवानगी देत आहेत. मे आणि सप्टेंबर या दोन महिन्यात हे उपक्रम होत असून कार्यालयात पेट्स या कल्पनेचं जोरदार स्वागत होत आहेत. कर्मचार्यांमध्ये परस्पर स्नेहभाव, टीम स्पिरीट यातून वाढेल असा या कार्यक्रमामागचा उद्देश तर आहेच. पण लोकही आपल्या पेट्सना ऑफिसात घेवून जायला मिळणार म्हणून त्यांच्यासाठी कपडे ते अॅक्सेसरीज यांचं शॉपिंगही दणक्यात करू लागलेत.
आता अमेरिकेत एखादा ट्रेण्ड आला तर तो जगभरात पसरायला किती वेळ लागतो म्हणा?
म्हणून तर येत्या 23 जून 2017 रोजी जगभर ‘ब्रिंग युवर डॉग टू वर्क डे’ म्हणजेच तुमच्या श्वानाला कार्यालयात घेवून या असा जागतिक दिनच साजरा होणार आहे.
आहे की नाही थक्क करणारी आणि विचित्र वाटणारी माहिती?
पण हे खरं आहे.
अमेरिकेत विशेषतर् पाळीव प्राण्याचं, त्यातही श्वानांचं प्रेम प्रचंड आहे. लोक आपापल्या श्वानांचे जीवापाड लाड करतात, त्यांच्यासाठीची खरेदी, त्यांचं बेबीसिटिंग लहान लेकरांसारखं होतं. त्यातून आपल्या श्वानाला एखाद्या दिवशी तरी कार्यालयात आणता आलं, सार्यांना दाखवता आलं, त्याचं कौतूक करता आलं तर हवंच आहे.
म्हणून ही आयडिया.
आणि आता तर त्यावर संशोधन सुरु आहे, लेख प्रसिद्ध होत आहेत की श्वानांना कार्यालयात आणण्याची परवागनी दिली तर काय काय फायदे आहेत.
म्हणून तर येत्या जून मध्ये साजर्या होण्यार्या या नव्या दिवसाचे चर्चे आत्तापासूनच आहेत.