‘फ्रेंड्स’ मालिका आठवते? सहा मित्रंची कहाणी? एक अख्खी पिढी ती मालिका पाहून ‘मैत्री’ काय असते हे शिकली. पण त्या मालिकेत आणखी एक खास गोष्ट होती, ती म्हणजे त्या सहा जिवाभावांच्या मित्रंच्या ग्रुपमध्ये असणारे मोनिका आणि रॉस हे दोघे बहीण-भाऊ!
इतकं भन्नाट होतं ते प्रकरण. कल्पना करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमची बहीण किंवा तुमचा भाऊ आहे. केवळ बहीण-भाऊच नाही, तर ते एकदम सच्चे दोस्त आहेत, ज्यांच्याशी तुम्ही सगळे डर्टी सिक्रेट्स शेअर करू शकता.
एकवेळ मुंबई-दिल्लीसारख्या मेट्रो सिटीमध्ये हे शक्य होईलही; पण तथाकथित ‘मिडल क्लास’ समाजात आणि ग्रामीण भागात जिथे दोन भाऊ बेस्ट फ्रेंड असणं अवघड आहे तिथे बहीण-भावाची गोष्ट दूरच राहिली!!
मग तिथलं जग कसं असतं हे समजून घ्यायचं म्हणून खेडय़ापाडय़ांतून औरंगाबादमधे शिकायला आलेल्या काही तरुण मुलामुलींशी गप्पा मारल्या. एक अड्डाच जमवला कट्टय़ावर गप्पांचा!
त्या मित्रमैत्रिणींशी बोलल्यावर लक्षात आलं की, खेडय़ापाडय़ात नातेसंबंधांना बदलाचं वारं अजून शिवलेलंच नाही. उलट जो काही जुना ओलावा होता, त्यालाही नव्या परिस्थितीनं कोरडे तडे पाडायला सुरुवात केली आहे.
आता साधं बहीण-भावाच्या नात्याचंच उदाहरण पाहा ना.
ज्यांच्याशी बोललो त्यातल्या अनेक मुलींनी सांगितलं की भावामुळे आम्हाला शिक्षण सोडावं लागलं. भावामुळे घराबाहेर पडणं बंद झालं. पाठीराखा भाऊच आमचा पहारेकरी झाला.
हे सगळं ऐकून धस्स होतं, जरा अवघडही वाटतं, पण ते खरंय!
मराठवाडय़ामधील एका खेडय़ातील गोष्ट. चौकोनी कुटुंब. भाऊ सरकारी नोकरीत. बहिणीने बीएडची सीईटी पास केली. मुलीची हुशारी पाहून तिला शिकू देण्याची आईवडिलांची इच्छा. पण भावाने याला नकार दिला. ‘तुला शिकून काय करायचे? तसंही लग्न झाल्यावर सासरीच जाणार.’ हे बोलताना बहिणीच्या डोळ्यातील पाणी आणि स्वप्न दोन्ही त्याला दिसलं नाही. जास्त शिकलेल्या मुलीला नवरा मिळणं अवघड होऊन बसतं. त्यात शिकलेल्या मुली दीडशहाण्या असतात, बाहेर नाही ते उद्योग करेल, आपल्या तोंडाला काळं फासेल असं त्याचं मत. आईबाबांनीही ते ऐकलं आणि मग तिचं लवकरात लवकर लग्न लावून दिलं, तेही तिच्यापेक्षा कमी शिकलेल्या मुलासोबत!
गप्पांच्या ओघात कितीतरी मुलींनी सांगितलं की, आईवडिलांपेक्षा जास्त रिस्ट्रीक्शन भावांचंच असतं. एवढा मेकअप करून बाहेर जायची काय गरज, नवे कपडे का घातले, तुला मोबाइल कशाला पाहिजे, जे पाहिजे ते घरीच मिळते ना इथपासून ते मोबाइलच्या कॉण्टॅक्ट्सर्पयत सगळ्यावर भावांची नजर असते. एका बहिणीने सांगितलेली कैफियत ऐकून हसावं की रडावं हाच प्रश्न होता. असेच होते. ती म्हणाली, ‘माझा भाऊ दर महिन्याला माङया मोबाइलचं सीम कार्ड बदलतो. कुठल्याच मुलांना माझा नंबर मिळू नये आणि जुना नंबर मी कुणाला दिला असलाच तरी तो लागणार नाही किंवा त्याच्या फोनवर लागेल!’
मोबाइलवर अनेक भाऊ नजर ठेवून असतात. कुणाशी जास्त बोलताना लक्षात आलं तर घरात रामायण अटळ, असं मुली सांगतात!
काही मुलींची तर तक्रार होती की घरचेसुद्धा मुलांनाच सपोर्ट करतात, त्यांच्या चुकांवर पांघरूण घालतात. अगदी घरी आणलेल्या खाऊमध्ये भावांनाच मोठा वाटा मिळतो. असे नाही की मुलींचे लाड नाही होत. परंतु एका मर्यादेत राहून वागण्याची त्यांच्यावर सक्ती असते. ज्या गोष्टी करायची मुलांना परवानगी असते, त्याच मुलीनं केल्या तर तिच्या विरोधात सारं घर एक होऊन उभं राहतं.
पण मग प्रश्न पडतो की, म्हणजे आपले भाऊच आता मुलींना व्हिलन वाटायला लागलेत का?
तर तसंही नाही. ग्रामीण भागात काही भाऊ असं टिपीकल वागता वागता बहिणींसाठी मोठं धाडसही करायला तयार होतात.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उज्ज्वला औरंगाबादला आली. तिचा भाऊ राम. त्याचा भक्कम पाठिंबा तिला मिळाला. तिच्या गावातून उच्च शिक्षणासाठी बाहेर पडलेली ती पहिली आणि एकमेव मुलगी. ती सांगते की, ‘माझा भाऊ आहे म्हणून मी आज शिकू शकते. स्वत:च्या पायावर उभा राहू शकते. त्याच्यापेक्षा जास्त मी शिकावे अशी त्याची इच्छा आहे. कॉल सेंटरमध्ये काम करून त्यानं माझं शिक्षण चालू ठेवलं.’
तिच्या वर्गातील मुलींचे तर लग्न होऊन मुलाबाळांसह त्या संसारात रमून गेल्या. अनेक जणींची पुढे शिकण्याची ओढ होती पण तसे नाही होऊ शकले. तिच्यासारखा भाऊ प्रत्येकीला असायला हवा असं तिला मनापासून वाटतं.
पण असे काही अपवाद वगळले तर भाऊबहीण जरा एकमेकांवर रुसलेले, चिडलेलेच दिसले. ते कशामुळे?
दरी कशामुळे?
मुलींना लहानपणापासूनच कळत-नकळत ‘भाऊ आहे ना तो तुझा’ हे वाक्य आजही खेडेगावात ऐकावंच लागतं. भावाला घरात वडिलांच्या खालोखाल मान मिळतो.
पण तरीही आता गोष्टी बदलताहेत. अनेक घरात मुलींना मुलांसारखंच उत्तम शिक्षण मिळतंय. मुली मुलांच्या तोडीस तोड बोलू लागल्या आहेत. पण ग्रामीण भागात आजही जातीपातीचे काच तेज. मुलांना इतर मुलं कशी वागतात हे दिसतं. त्यामुळे आपल्या बहिणीच्या वाटय़ाला हे सारं नको म्हणून ते बहिणींना जपण्याच्या नादात त्यांना रोकटोक करतात. त्यातून मग नात्यात तणाव येतो. मुलींना ही रोकटोक नको वाटते.
त्यातून भांडणं होतात. तेढ नसते. विखार नसतो. पण चिडचिड असतेच. त्यातून कधी गोष्टी सावरतात. कधी विकोपाला जातात.
पण एक नक्की, सतत भांडणारे, खोडय़ा काढणारे, चिडवणारे आणि अगदी ‘टॉम अँड जेरी’सारखे वागणारे आणि कधीकधी मारामारीवरही उतरणारे हे बहीण-भाऊ ‘सीझफायर’ करतील आणि एकमेकांसोबत आनंदानं जगत, एकमेकांचा आधार बनतील अशी आशा अजूनही मुलामुलींना वाटतेय. हेच खरं या नात्याचं बळ आहे.
- मयूर गोवेकर
मयूर लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत वार्ताहर आहे.