प्राची पाठक
‘तो बघ किती पुढे गेलाय’. ‘ती बघ कसं मस्त करिअर करतेय’.‘त्याला मिळाली बाबा तिकडे अॅडमिशन, तूच राहून गेलास’. ‘तिने पटकावलाच तो जॉब’. ‘त्यांची लग्नं होऊन जातील, तुम्ही बसा इथेच’.अशा तुलनात्मक गोष्टींची सुरु वात आपल्या घरातल्याच लोकांनी केलेली असते. कधी कळत, कधी नकळत. अगदी शिक्षकसुद्धा सहजच कोणाची कोणाशी तुलना करून जातात. मग आपल्याला वाटायला लागतं, यार, यांचं तर सगळंच झकास आहे. कसं बुवा यांचं कायमच लकी असतं सगळं? आपल्याला वाटायला लागतं, ते आपल्यापेक्षा भारी आहेत आणि आपण मात्न एकदम कंडम ! आपण ज्यांना अगदी जवळचे समजतो, तेच काहीवेळा आपल्याला अगदी टोकाचे बोलून जातात. तेदेखील दुसर्याचे काहीतरी दाखवत ! दुसरीकडे आपल्या आतसुद्धा कळत-नकळत तुलना करण्याचा मोह, लोचा झालेला असतोच. त्यात सर्वात जास्त त्नासदायक असतं, ते दुसर्याचे चटचट बदलणारे लै भारी डीपी बघत राहणं. त्यांचे रोजरोज पडणारे स्टेट्स शांतपणे पाहत राहणं. त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट्समधला आनंद पचवत राहणं. मनात अनेक शंका येतात. हे काय करत असतील? कुठून त्यांना पैसे मिळत असतील? इतके भारी कसे काय कायमच राहत असतील? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ताबडतोब हवी असतात. कधी कधी तर ती उत्तरं आपल्याला पाहिजे तशीच हवी असतात. तिथेही आपण समोरच्या विषयीचा माझा अंदाज कसा बरोब्बर ठरला, या आपल्याच इगोला कुरवाळायची एक संधी शोधत असतो.
* काय करता येईल?
लोकांचं छान, मस्त मजेत चाललं आहे आणि आपणच कसे एकदम कंडम, आपल्या आयुष्यात काहीच चांगलं, मनासारखं घडत नाही, या भावनांना आपण आधी आपल्या आयुष्यातून बाजूला सारू या. या सर्व भावनांना एकदाच काय ते बजावून टाकू, की तुम्ही निघा आता आमच्या मर्गातून.एक लक्षात ठेवायला हवं. आपले दुसर्या विषयीचे अंदाज, त्यांच्याकडून आपल्या गॅजेट्समध्ये नकळत येऊन पडणारी माहिती, यावर आपलं आयुष्य तरून जाणार नाहीये. इतरांच्या आयुष्यात आपण भिंग लावून बसायची गरज नाही. आपण आपल्याच झोळीत जरा डोकावून बघू. आपलं काय सुरू आहे, त्यावर जास्तीत जास्त फोकस ठेवायचा सराव नव्याने करायला शिकू. काय?
* त्याने काय होईल?1- इतर काय करताहेत, त्यांचं कसं छान चाललंय, यापेक्षा आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायचंय, यावर फोकस करता येईल.2- आपल्या जमेच्या आणि वजाबाकीच्या गोष्टी कळतील आणि त्यावर काम करणं सोपं जाईल.3- नकारात्मक दृष्टिकोन दूर होऊन पॉझिटिव्हली पाहायला शिकता येईल. 4- दुसर्यांकडे पाहून त्यावर आपलं आयुष्य बेतण्याची घातक सवय मोडेल.