प्राची पाठक
‘सरकारी बाबू’शी आपली ओळख तशी अधूनमधून झालेलीच असते. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ही जणू टॅगलाइन होऊन गेल्यासारखं आपण मानत असतो. एकीकडे आपल्याला सरकारी नोकरी मिळेल का, याची अशा लावून बसलेलो असतो. - का? तर तिथे काही कामच करावं लागत नाही, असा आपला समज असतो. आपण अशी किती सरकारी कार्यालयं जवळून बघितलेली असतात की त्यावरून आपण असा समज करून घेतो, हा प्रश्न आपल्याला पडत नाही. सरकारी नोकरी म्हणजे आरामाची नोकरी, अशीच आपली कल्पना असते. एकदा चिकटलो की चिकटलो. काम करा, नका करू, वेळेत जा, नका जाऊ, आपल्याला कोण तिथून काढू शकणार? नोकरीत आपला परफॉर्मन्स कोण तपासणार? एकदम सुखाची नोकरी. सरकारी नोकरीविषयी अशा कल्पना असूनसुद्धा आपलं तिथे काही काम अडलं, तर ते मात्न चुटकीसरशी तिथल्या लोकांनी करून द्यावं, अशी आपली अपेक्षा असते.
काय करता येईल? कोणकोणत्या कारणांसाठी आपल्याला वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये जावं लागतं, त्याचा विचार करू. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, गाडीचं लायसेन्स, जन्म दाखले, मृत्यू दाखले यासाठी आपण स्वतर् वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन त्यासाठी काय काय कागदपत्नं जोडावी लागतात, कसे अर्ज द्यावे लागतात, ते समजून घेऊ. आपल्या नात्यांमध्ये, आपल्या आजूबाजूला असलेले सरकारी कर्मचारी त्यांच्या कामाविषयी काय बोलतात, याची माहिती करून घेऊ. आपली लहानमोठी कामं एखाद्या एजंटकडून करून घेण्यापेक्षा, आपणच पुढाकार घेऊन सरकारी कार्यालयांमध्ये गेलं पाहिजे. त्या कागदपत्नांची पूर्तता करायला शिकलं पाहिजे. फॉलोअप घेतला पाहिजे. सरकारी कर्मचार्यांचेही काही प्रॉब्लेम असू शकतात, काही प्रोटोकॉल्स त्यांना पाळावे लागतात, ते आपल्याला जाणून घेता येईल. अपुर्या मनुष्य मनुष्यबळात ते काम करत असतात, हे समजून घेता येईल. त्यांच्यावरच्या कामाचा ताण आपल्याला जाणवेल. सरकारी कामांमध्ये चालढकल होते, हे मान्य करूनसुद्धा त्यातले काही मुद्दे आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावतील.
त्याने काय होईल? 1- सरकारी यंत्नणेविषयी आपल्या मनात असलेली चीड आणि आढी थोडीफार कमी होण्यास मदत होईल. 2- सरकारी कर्मचारीसुद्धा माणसंच आहेत आणि वेगवेगळ्या आव्हानांमध्ये ते काम करत आहेत, हे आपल्याला समजेल. 3- लहानमोठय़ा सरकारी कामांसाठी आपण स्वतर् वेळ काढायला लागू. 4- सरकारी व्यवस्थेबद्दलची आपली जाणीव विकसित होईल.