शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
3
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
4
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
5
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
6
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
7
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
8
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
9
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
10
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
11
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
12
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
13
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
14
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
15
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
16
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
17
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
18
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
19
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
20
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

काहूर

By admin | Published: January 15, 2015 6:28 PM

‘झटपट’ स्मार्ट व्हायला निघालेल्या तरुण मुलींच्या जगात काय दिसतं?

* तरुण मुलींना जमलंच तर एकाच सेटिंगमध्ये मेक-ओव्हर करून घ्यायचाय.
 
* एक काळा डाग, एक पिंपल हेसुद्धा अनेकींना जीवन-मरणाचा प्रश्न वाटतो.
 
* झटकेपट सुंदर दिसण्याच्या नादात त्वचेचे आजार ओढावून घेण्याची पाळी 
*चुकीची प्रसाधनं वापरून स्वत:वरच घातक प्रयोग
 
 
 सध्या कॉलेजमधे ‘डे’ धुमधडाक्यात सुरू आहेत. त्यात लग्नसराई. अनेकजणी फेशियल, ब्लिचिंग, मॅनिक्यूअर पेडीक्यूअर, हेअर कलर,हेअरस्पा करायला येतात. काहीजणी मेकअप, हेअर सेटिंग, हेअर स्टाइल करायला येतात. बर्‍याच जणींना आपण काय करतो आहोत, का करतो आहोत, याची काहीच माहिती नसते. आपल्या मैत्रिणीनं केलं, ते तिला चांगलं दिसतं, मग मलाही तेच करायचं हाच एकमेव हट्ट असतो. आणि त्यापेक्षाही मोठी असते असुरक्षितता की, आपल्यापेक्षा दुसरी कुणी सुंदर दिसली तर आपल्याला कोणीच भाव देणार नाही, आपण मागे पडू. म्हणून मग अनेक गोष्टी पूर्ण माहिती न घेताच केल्या जातात. अनेक मुली तर गरजेपेक्षा जास्तवेळ ब्लिच करतात. त्यानं त्वचा, चेहरा गोरा दिसेल असं त्यांना वाटतं. चेहर्‍यावरील केस दिसू नयेत म्हणून हे ब्लिच करतात. पण ते करताना जर त्यामध्ये अमोनिया जास्त घातलं गेल्यास त्वचेतील आद्र्रता कमी होते.  ब्लिच केल्याच्या दुसर्‍या दिवशी त्वचेवरील कोरड्या पडलेल्या भागांवर लाली तसेच रॅश येऊन खपल्या धरल्या जातात. आपल्या चेहर्‍यावर मुरमं, पुटकळ्या असतील तर ब्लिच, स्क्रब हे फार जपून करावं लागतं.  अशा प्रकारच्या चेहर्‍यावर स्क्रब केलं तर त्वचा अजून खराब होते.
मात्र, हे सारं मुलींना समजून सांगणं अनेकदा खूप अवघड होतं. खूप कोन्सेलिंग करावं लागतं. कारण त्यांच्या डोक्यातलं काहूर. काहीजणींना सावळा रंग नको झालेला असतो. तर काहींना चेहर्‍यावर पिंपल्स नको. अनेकींना मेकअप करून हवा, तो दिसायलाही हवा, पण लाइट हवा. बर्‍याच जणींना स्किन पॉलिश करून घ्यायची असते, पण म्हणजे नक्की काय करतात हेच माहिती नसतं. आणि हे सारं त्यांना कमीत कमी वेळात, कमीत कमी सेटिंगमध्ये करून हवं असतं. जे शक्य नाही. कारण एकदम, एकावर एक ब्यूटि ट्रिटमेण्ट नेहमी केल्यास त्वचा हायपर सेन्सेटिव्ह होते. आणि त्यातून काही समस्या उद्भवतात, पिगमेंटेशन ते सोरायसिसपर्यंत अनेक त्रास होऊ शकतात. 
पटकन गुण येण्याकरिता वापरल्या जाणार्‍या प्रसाधनांनी त्वचा  काळवंडू शकते. पांढरीही पडू शकते, पॅची होते. खूपदा भरपूर स्टीम घेतली त्यामुळेही त्वचेचा पीच बदलता. स्टीमनंतरची काळजी न घेतल्यास त्वचेतील आद्र्रता कमी होते. हे सारं समजून मग उपाय करण्याइतपत फुरसत अनेक जणी काढतच नाही. एकाच दिवशी पार्लरमध्ये जाऊन अनेक प्रक्रिया करण्यावरच बर्‍याच जणींचा भर असतो. 
जे त्वचेचं तेच केसांचंही. आर्यनिंग करण्याच्या नादात अनेक जणी चुकीचे उपचार करवून घेतात.  त्यानं चांगले असलेले केस आपला पोत हरवून बसतात.
थोडा वेळ ठेवून, समजून उमजून, योग्य ट्रिटमेण्ट केल्या तर फायदा होतो, मात्र सगळीच घाई, त्यामुळे अनेकींच्या वाट्याला मनस्तापही येताना दिसतो.
- लीना खांडेकर ब्यूटि एक्सपर्ट
 
 
 
 
 
चाफेकळी नाक, पाणीदार टपोरे डोळे, काळे आणि लांबसडक केस, उंच, निमुळती मान, कमनीय आणि नाजूक बांधा, शुभ्र दंतपंक्ती, गुलाबी व पातळ ओठ.. भारतीय स्त्रीच्या आदर्श सौंदर्याचे हे मापदंड ठरलेले आहेत; मात्र सगळ्याच मुलींना अशा आदर्श सौंदर्याची देणगी लाभतेच असे नाही. ‘सब को सब कुछ नही मिलता, पर कुछ कुछ सब को मिलता हैं..’ या टीव्ही मालिकेतल्या जस्सीच्या म्हणण्याप्रमाणे कोणाचे केस छान असतात, तर कोणाची स्कीन.. कोणाचे नाक शेपमध्ये असते तर कोणाचे दात.. मग इथूनच सुरू होते एक नवीन चढाओढ.. आरशाची आणि चेहर्‍याची.. 
‘विवाह’ चित्रपटात एका सीनमध्ये शाहीद कपूर त्याच्या हिरोईनला अर्थात पूनमला म्हणतो, ‘शादी के वक्त लडकीयॉँ थोडी बावली हो जाती हैं.. वजन घटाने मे लग जाती हैं.. लेकिन तुम ऐसा बिलकुल मत करना.. दो-चार किलो बढ जाए तो भी फिक्र नहीं..!’ मात्र केवळ लग्न ठरल्यावरच नाही, आता तर वर्षभर मुलींच्या डोक्यात सुंदर दिसण्याचा भुंगा पिंगा घालत असतो.. सकाळी ब्रश करण्याच्या वेळेपासून त्यांचा आरशाशी संवाद सुरू होतो. यादरम्यानच त्यांना जाणवू लागतं की, त्यांच्या स्कीनचा पोत व्यवस्थित नाही.. केस जरा जास्तच पातळ आहेत किंवा जास्तच ‘कर्ली’ आहेत किंवा मग खूपच सिल्की आहेत. कमरेचा घेर वाढतोय. पोतं होतंय आपलं. अमुक ड्रेस घातल्यावर मी वरपासून खालपर्यंत पार सपाट दिसते. सांगाडा म्हणून कोणी चिडवायला नको म्हणून वजन वाढवायला हवं. नाक जरा जास्तच पसरट दिसतेय. दातातली फट वाढतेय.. हे असे साक्षात्कार होत राहतात. मग काय, ही वैश्‍विक समस्या असल्यागत त्यावर गंभीर मंथन सुरू होते. ग्रुप चॅॅटिंग, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर चर्चा झडतात. यातूनच एकमेकींना सल्ले, काही उपाय यांची देवाण-घेवाण होते. यावर एकच पर्याय त्यांना आपलासा वाटतो तो म्हणजे ब्यूटि सर्जरी.. स्पा ट्रिटमेंट..
झटपट सुंदर दिसण्याचा आटापिटा करण्यासाठी आता केवळ लग्न हे एकमेव कारण राहिलेले नाहीये. सध्या कॉलेजांमध्ये ‘डेज्’ची धमाल सुरू आहे. ही ‘डेज्’ची पर्वणी म्हणजे फॅशनचा जलवा सादर करण्याचा जन्मसिद्ध हक्कच. तो कॉलेजच्या मुली कशा सोडतील? लग्नसराईबरोबरच या ‘डेज्’नी झटपट सुंदर बनविणार्‍या मार्केटला जन्म दिलाय. वयाच्या साठीतही प्लेन, चिकनी स्कीन लाभलेली रेखा, हेमा मालिनी यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्री (ज्यांनी संपूर्ण शरीरावरच सर्जरी केल्याचे बोलले जाते) तर श्रीदेवी, जुही, शिल्पा शेट्टी, प्रियंका चोप्रा, करिना यांसारख्या नाकाची आणि कतरिना, अनुष्का यांसारख्या ओठांची सर्जरी करून घेतल्यावर सुंदर दिसू लागलेल्या अभिनेत्री या  कॉलेज गोइंग मुलींच्या आयकॉन बनल्या आहेत. आणि थोडी फूस जाहिरातींनी लावली आहे. अमुक एक क्रीम लावली तर सावळा रंग जाऊन गोरा रंग मिळतो आणि गोरा रंग मिळाल्यामुळे नोकरी मिळते, लग्न ठरते हे तर नेहमीचंच. एकूणच, सुंदर ‘दिसणं’ किती महत्त्वाचं आहे, हे मनावर ठसवलं, बिंबवलं जातंय. हे लोण केवळ उच्चभ्रूंपर्यंतच र्मयादित राहिलेले नाही,  तर ते मध्यमवर्गीयांपर्यंतही पोहोचलं आहे.
आता प्रश्न हा उरतो की, यामुळे खरंच सौंदर्य लाभते का? आणि असे इन्स्टंट सौंदर्य किती काळ टिकते? हाच कळीचा मुद्दा आहे. कारण झटपट सुंदर होण्याचं खूळ डोक्यात शिरलेल्या मुलींसाठी आज गल्लीबोळात कॉस्मेटिक सर्जरी सेंटर्स सुरू झाले आहेत. गल्लीबोळातले काही डॉक्टर्स अशा काही सर्जरी करून देण्याचे वायदे करतात.  ब्यूटि पार्लर्सचे बोर्ड तर सर्रास सर्वत्र पाहायला मिळतात, तसे हे कॉस्मेटिक सर्जरी सेंटर्स दिसू लागले आहेत. मेडिस्पा कल्चर फोफावू लागले आहे. कमी वेळ आणि कमी पैशाचे लालूच या सेंटर्सकडून दाखवले जाऊ लागले आहे.
यापैकी अगदी बोटांवर मोजण्याइतकीच सेंटर्स ‘वेल इक्विप्ड’ म्हणजेच अत्याधुनिक व योग्य साधनसामग्री, प्रोफेशनल सर्जन्सनी युक्त अशी असतात. बाकी अनेक सगळा रामभरोसे कारभार असतो. म्हणजेच सौंदर्य प्रसाधने हलक्या प्रतीची, शिकाऊ डॉक्टर्स. साधनं जुनी असं चित्र असतं. मात्र तरीही अनेक तरुण मुली आणि मुलंही तिथं गर्दी करतात. ‘क्विक फिक्स’ म्हणत स्वत:वर कसकसले प्रयोग करत चटकन सुंदर दिसण्याचं स्वप्न पाहतात. यासंदर्भातील धोक्यांकडे मात्र  त्यामुळे दुर्लक्ष होऊ लागलं आहे. बोटोक्ससारखी शस्त्रक्रिया लंचब्रेकमध्ये करता येऊ शकते असे काहींचे म्हणणे आहे, त्यामुळे केसात कंगवा  फिरवून भांग पाडण्याइतपत ते सोपे आहे, असा समज होऊ लागला आहे. या अशा ठिकाणी जाऊन चेहर्‍यावरच्या सुरकुत्या घालवणार्‍या, ओठांची ठेवण बदलवणार्‍या अनेक युवतींना जन्माची अद्दल घडते, असेही प्रकार आहेत. मेकओव्हर करून दिमाखात वावरण्याऐवजी काहींना चेहरा लपवून वावरावं लागतं. या सर्जरी करताना त्या चुकीच्या पद्धतीने, निष्काळजीपणे केल्या गेल्यामुळे त्वचा जळणं, अवयव बेढब दिसणे अशा साइड इफेक्ट्सना सामोरे जावं लागत असल्याच्याही काही घटना अवती-भोवती घडत आहेत. 
त्यामुळे क्विक फिक्सच्या नादी लागून एका रात्रीत स्वत:चा कायाकल्प करण्यासाठी जिवाचं रान करणार्‍यांनी काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत, सावध व्हायला पाहिजे!
- सारिका पूरकर-गुजराथी
 
कोणत्या ब्यूटि सर्जरींची
तरुणांना क्रेझ वाटतेय?
तरुण मुला-मुलींच्या जगात डोक्याच्या केसांपासून पायाच्या तळवे, नखापर्यंत प्रत्येक अवयव सुंदर करण्यासाठी आज सर्जरी केल्या जाऊ लागल्या आहेत. नाकाचा आकार बदलणे, चरबी कमी करणे यासाठीच्या सर्जरींचे प्रमाण मोठे आहे. 
* लिपोसुक्शन :  ही सर्जरी शरीरावरील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी करून घेतली जाते. हनुवटी, पोट, नितंब, मांडी, खांद्याची मागची बाजू या भागावरील चरबी या सर्जरीने प्रामुख्याने काढली जाते.लठ्ठपणा झटकन घालवण्यासाठीचा पर्याय म्हणून युवती याकडे बघताहेत.
* फेसलिफ्ट : त्वचेवरील सुरकुत्या आणि सैल पडलेली त्वचा तुमचे वय सांगत असते. म्हणूनच टाइट, प्लेन त्वचा मिळवण्यासाठी ही सर्जरी केली जाते. यातही ब्रो लिफ्ट (पापणीजवळची त्वचा) नेक लिफ्ट (मानेजवळची त्वचा), आयलीड रिपेअर (पापणीचा आकार बदलणे) अशा सर्जरीज् केल्या जातात. शास्त्रीय भाषेत या सर्जरीज्ना ‘र्‍िहटिडेक्टॉमी’ म्हटले जाते. 
* र्‍िहनोप्लास्टी : बसके नाक धारदार करणे किंवा पोपटासारखे नाक असेल तर त्याचा अणकुचीदारपणा कमी करणे.. थोडक्यात ‘नोझ शेपिंग’साठी ही सर्जरी केली जाते. सध्याच्या काही बॉलिवूड ‘स्टार’ने ही शस्त्रक्रिया केलेली दिसून येत असल्यामुळे सर्वांत पॉप्युलर सर्जरी म्हणून ती ओळखली जाते. 
* लिप्स सर्जरी :  काहींचे ओठ इतके पातळ असतात की, वरचा किंवा खालचा ओठ दिसतच नाही तर काहींचे ओठ प्रमाणापेक्षा जाड असतात. अशा वेळी प्रमाणबद्ध ओठांसाठी ही सर्जरी केली जाते. याला ‘लिप्स ऑगमेन्टेशन’ असे म्हणतात. इंजेक्शनद्वारे ओठांमध्ये हायलूरॉनिक अँसिडसारखे घटक पदार्थ पोहोचवून ओठांचा आकार बदलला जातो.
* डर्मल ग्राफ्टिंग : चेहर्‍यावर व्रण, डाग असतील तर या सर्जरीद्वारे ते घालवून त्या भागाला उभार दिला जातो. त्यामुळे त्वचा ताजी, तुकतुकीत दिसते.
* डिम्पल क्रिएशन :  हसल्यावर गालावर पडणारी खळी हे केवळ सौंदर्याचेच प्रतीक मानले जात नाही, तर ज्याच्या गालावर खळी पडते ती व्यक्ती नशीबवान समजली जाते. म्हणून डिम्पल क्रिएशन नावाची सर्जरीही उदयास आली आहे. आता अशी खळी पाडून घेऊन नशीब कसे बदलते, देव जाणे! 
* चीक सर्जरी : थोडा नाजूक किंवा त्रिकोणीय चेहरा नेहमीच ‘यंगर लूक’ देतो; मात्र काहींचा चेहरा खूपच गोल, चरबीयुक्त असतो. अशा वेळी हनुवटीजवळची चरबी कमी करणे, गालाच्या हाडांचा आकार कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.
*ओटोप्लास्टी :  बाहेर आलेले कान आत करणे, कानाचा आकार बदलणे किंवा लांबच लांब आणि वजनाला जड कानातले घालून-घालून फाटलेली कानाची पाळी शिवणे, अशा शस्त्रक्रिया या प्रकारात केल्या जातात.  
* स्माइल डिझायनिंग : प्रसन्न हास्य तुमचे व्यक्तिमत्त्वच बदलून टाकते; परंतु दात जर पिवळसर असतील, वेडेवाकडे, पुढे आलेले असतील तर हेच हास्य तुमचा पचका करते. म्हणूनच सध्या स्माइल डिझायनिंगचा ट्रेंड सेट झालाय. अर्थात डेंटिस्टच हे करतो.
* बोटोक्स : बोट्यूलिनपासून एक विशिष्ट औषध तयार करून ते शरीराच्या काही भागांवरील सुरकुत्या घालवण्यासाठी वापरले जाते.
* या सर्व शस्त्रक्रिया अँनेस्थेशिया देऊन, तर काही इंजेक्शन देऊन केल्या जातात. काही शस्त्रक्रिया त्वचेचा छोटासा भाग काढून केल्या जातात. काही शस्त्रक्रियांना २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो, तर काहींसाठी ३ ते ९, ३ ते ५ सेटिंग आवश्यक असतात.
या काही प्रमुख शस्त्रक्रियांव्यतिरिक्त बर्थमार्क्‍स म्हणजे चेहर्‍यावरील मस, काळे व्रण लेसर पद्धतीने घालवणे, पिंपल्स, पिगमेन्टेशन, डोळ्यांखालची काळी वर्तुळे घालवणे, प्रखर उन्हामुळे खराब झालेली त्वचा पूर्ववत करणे, रंग उजळवणे, शरीरावरील अतिरिक्त लव (केस) घालवणे अशा अनेक ब्यूटि सर्जरी करण्यासाठी सध्या युवती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर्सकडे धाव घेताहेत..
 
शरीर जेव्हा ‘नाही’ म्हणतं.
कॉस्मेटिक सर्जरी करताना प्रमुख धोका आहे तो रिजेक्शन ऑफ इम्प्लांटचा. अर्थात ज्या काही नवीन सुधारणा करायच्या आहेत, त्या तुमच्या बॉडीने, स्कीनने न स्वीकारणं. तसंच काही इंद्रियांच्या आतून अथवा बाहेरून असे काही बदल होणे, की ज्यामुळे त्याच्या कार्यप्रणालीत बिघाड होऊ शकतो, त्वचेचा रंग बदलणे, मेदयुक्त पेशीसमूहाचा काही भाग नष्ट  होणे, नवीन डाग, व्रण निर्माण होणे या व्यतिरिक्त अँलर्जी आणि इन्फेक्शन होणे.
यांपैकी काही बाबतीत आणखी एक किंवा दोन शस्त्रक्रिया करून सुधारणा करता येऊ शकते; मात्र अपवादात्मक परिस्थितीत कायमचे विद्रूपीकरण, एखाद्या इंद्रियाचे काम करणे कायमचे बंद होणे किंवा मग अगदी मृत्यू होण्याचे धोकेदेखील संभवतात. प्रकृती मुळातच सर्वसाधारण असणे, वाढते वय, धूम्रपान, ड्रिंकिंग या सवयींमुळे कॉस्मेटिक सर्जरी करताना असणार्‍या धोक्यात वाढ होत जाते. 
 
 
कॉस्मेटिक सर्जन म्हणतात,
सुंदर दिसा,
पण त्यासाठी डोकं ताळ्यावर ठेवा.
मुळात कॉस्मेटिक सर्जरी सुंदर दिसण्यासाठी केली जाते, हा समज डोक्यातून काढून टाकायला हवा. निसर्गाने दिलेल्या रंगरूपात सुधारणा करण्यासाठी अशा सर्जरीज् केल्या जातात, म्हणून अमुक सर्जरी केल्यावर आपण स्वर्गातली अप्सरा वगैरे दिसू अशा भ्रामक कल्पनाविलासातून बाहेर पडायला हवे आणि कॉस्मेटिक सर्जरी ही गोष्ट डोळसपणे समजून घ्यायला हवी. तुम्हाला कराविशी वाटतेय म्हणून सर्जरी करायची, असे नसते. तुमच्या शरीराला, प्रकृतीला ती कितपत ‘सूट’ होईल याचा विचार करणे गरजेचे ठरते. त्यासाठी मुळात चांगला कॉस्मेटिक सर्जन शोधणे हे खूप महत्त्वाचे आहे. आज केवळ ‘दस दिनों मे फर्क देखे’, ‘दोन दिवसात सुंदर बना’ असे सांगणारे अनेक डॉक्टर भेटतात; मात्र त्यांच्याकडे सर्जरी केल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्या, तर त्यावर त्यांच्याकडे इलाज वा पर्याय नसतो. तेवढा त्यांचा अभ्यासच नसतो. नाकाची सर्जरी केल्यानंतर खड्डा राहणे, टोकाचा शेप प्रमाणात न घेणे, त्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होणे, चेहर्‍यावर व्रण कायम राहून विद्रूप दिसणे, भुवया खालीच राहणे असे गंभीर परिणाम भोगावे लागतात. या फसलेल्या सर्जरीज्मुळे असलेले सौंदर्यही गमावून बसण्याची वेळ येते. प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची फसलेली लीप सर्जरी याचे ताजे उदाहरण आहे. सर्जिकल व किंवा नॉन सर्जिकल ट्रिटमेंटमध्ये सूज उतरायला तीन ते सहा दिवस लागतात. जोपर्यंत ही सूज असते, तोपर्यंत सगळे छान वाटते; मात्र ती उतरल्यावर कधी नाक बारीक झाल्यासारखे दिसते (श्रीदेवीसारखे), तर कधी त्या जागेवर काळे-निळे व्रण पडतात. हे असे प्रकार टाळता येऊ शकतात. त्यासाठी प्लास्टिक सर्जन नव्हे, तर स्पेशालिस्ट कॉस्मेटिक सर्जनकडे जायला हवे. नाहीतर नसते प्रश्न आपल्या गळ्यात पडू शकतात.
हा त्रास टाळायचा असल्यास एवढे नक्की करा.. 
* योग्य कॉस्मेटिक सर्जन्सचा शोध घ्या. त्यापैकी सर्व डॉक्टर्सच्या प्रोफाइल्स चेक करा. इंटरनेटवर आज बरीच माहिती उपलब्ध असते. त्याद्वारे हॉस्पिटलमधील मशीनरी, औषधे यांची माहिती घ्या.
* सर्जन्सच्या पदव्या तपासून पहा. एरव्ही आपण स्त्रीरोगतज्ज्ञ वा फॅमिली डॉक्टर हे एमडी, एमबीबीएस आहेत का नाही हे जसे बघतो तसेच..
* यापूर्वी त्या सर्जन्सकडे कोणी शस्त्रक्रिया केली असेल, तर त्यांची माहिती, नंबर मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याकडून सर्जरीचा, डॉक्टरचा अनुभव तपासा.
* तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीशी बोला.
* थेट डॉक्टरशी चर्चा करूनच तुम्हाला हवी असलेली सर्जरी निश्‍चित करा.
- डॉ. आशिष धवलभक्त, 
कॉस्मेटिक सर्जन, पुणे
 
सर्जरीनंतर अशी घ्या काळजी..
कॉस्मेटिक सर्जरी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. अमेरिका, कोरिया, ब्राझीलमध्ये तर हजारो प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे या सर्जरी करूच नयेत, असे मुळीच नाही; मात्र तंत्रज्ञानाचा लाभ घेताना थोडी काळजी घेणं गरजचं असतं. मुख्य म्हणजे कमी दिवसात, कमी खर्चात काम होईल, एकदम झटकेपट सौंदर्य मिळेल, या वायद्यांना भुलू नका.
नो कॉस्मेटिक्स : शरीराच्या ज्या भागावर सर्जरी केली गेली आहे, तेथे कोणत्याही प्रकारची क्रीम, लोशन डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय लावू नका; अन्यथा त्या जागेवर इन्फेक्शन, अँलर्जी येऊ शकते. ही जागा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. त्यासाठी औषधीयुक्त पाण्याचा वापर करायला हवा.
बाहेर जाणं टाळा : सर्जरी केल्यानंतर सूर्यप्रकाशात जाणे टाळा. त्या जागेवर सूर्यकिरणे पडल्यास टाक्यांना इजा पोहोचू शकते. केवळ सनस्क्रीन लोशन लावणे हा त्यावरचा पर्याय नाही. डॉक्टरांनी दिलेले अँण्टिसेप्टिक क्रीम त्यांच्या सूचनेनुसारच लावावे.
सकस आहार घ्या : शस्त्रक्रियेनंतर देण्यात येणार्‍या औषधांमुळे काही वेळेस पचनाचे विकार जसं पोट जड पडणं, गॅसेस होणं असा त्रास होऊ शकतो. तो होऊ नये, म्हणून आहारावर विशेष लक्ष द्या. भरपूर फळे, दूध घ्या. पौष्टिक पण पाचक आहार घ्या. चेहर्‍याच्या काही सर्जरीज्मध्ये नेहमीप्रमाणे जेवण करणे अवघड होते. अशा वेळी विविध सुप्स, फळांचं ज्यूस असा लिक्विड आहार घ्या. मद्यपान आणि धूम्रपान टाळा.
प्रतिकारशक्ती वाढवा : सर्जरी करण्यापूर्वीच आपली प्रतिकारशक्ती तपासा. ती वाढवा. सर्जरीनंतर काही  त्रास उद्भवला तर डॉक्टरांच्या सल्ल्याशियाय सप्लिमेंट्स घेणे धोकादायक ठरू शकते.
कोरफड रस घ्या : कोरफड ही अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती आहे. सर्जरीनंतर कोरफडीचा रस घेतल्यास त्वचेची चकाकी वाढण्यास मदत होते;  मात्र तो घेण्यापूर्वीही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.