-अनन्या भारद्वाज
एक कोटी रुपये देतो, वर्षभर स्मार्टफोन वापरायचा नाही, असं कुणी सांगितलं तर तुम्ही कराल का?- कुणीही म्हणेल की एक कोटी रुपये मिळणार असतील तर वर्षभर राहू की सुखानं फोनशिवाय, त्यात काय अवघड आहे.-खरं तर अवघड काही नाही, पण वाटतं तितकं सोपं ते आता उरलेलं नाही. आपण सारेच स्मार्टफोनला इतके सरावलो आहोत की फोन हा फक्त एकेकाळी कॉल करणं, घेणं, बोलणं यासाठीच होता हे आता आपण विसरून गेलेलो आहोत. सतत स्क्रोल करत राहण्याचं हे व्यसन इतकं वाढलं आहे की, एक दिवस मोबाइल बिघडला किंवा हरवला, एवढंच काय पण काही वेळ त्याची बॅटरी संपली तरी जीव कासावीस होतो. फोनशिवाय जगणंच अशक्य व्हावं इतका फोन जवळ बाळगूनच अनेकजण जगतात. झोपताना आणि शौचालयातही फोन जवळच असतो.अशा अवस्थेत फोनशिवाय जगणं कसं शक्य व्हावं?पण एलिना मुगडन या तरुणीनं हे आव्हान स्वीकारलं. न्यू यॉर्कच्या क्वीन्स परिसरात राहणारी ही तरुणी. वय वर्षे 29. गेल्या वर्षी फेब्रुवारीतली ही गोष्ट. व्हिटॅमिन वॉटर या फिटनेस ब्रॅण्ड कंपनीने अमेरिकेत एक स्पर्धा आयोजित केली. ‘स्क्रोल फ्री इयर’ असं त्या स्पर्धेचं नाव. वर्षभर स्मार्टफोन न वापरता राहिलं तर एक लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं. 10 लाखांहून अधिक इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले व्हिडीओ पाठवले होते. त्यातून एलिनाच्या व्हिडीओची निवड झाली आणि वर्षभर तिचा आयफोन एका डब्यात बंद करण्यात आला. पुढचे बारा महिने स्मार्टफोन नाही, त्यावर स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिकटॉक असं काहीही नाही. ओला-उबेर- खाण्याचे पदार्थ ऑनलाइन मागवण्याचे अॅप्स हे काहीही वापरता येणार नाही.कंपनीने एलिनाचा आयफोन काढून घेतला आणि त्याला एक फ्लिपचा साधासा फोन दिला. त्या फोनवरून फक्त कॉल करता येतील आणि आलेले कॉल स्वीकारता येतील. यापेक्षा जास्त त्या फोनवरून काहीही करता येणार नाही. तशी सोयच नाही. एवढंच नाही तर लॅपटॉप, टॅब यांचा वापरही अत्यंत मर्यादित करण्याची परवानगी देण्यात आली.आणि एवढं करूनही ती खरंच स्मार्टफोनपासून वर्षभर लांब राहिली का, हे तपासण्यासाठी तिची येत्या फेब्रुवारीत शिस्तशीर लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे. त्यावरून कळेलच की खरंच तिनं हा सेलफोन उपवास तंतोतंत पाळला की नाही.पैसे मिळतील तेव्हा मिळतील, पण वर्षभर सेलफोनपासून दूर राहण्याचा एलिनाचा अनुभव खूप रंजक आणि डोळ्यात अंजन घालणाराही आहे.एलिना सांगते, ‘खूपदा वाटलं की हा स्मार्टफोन उपवास सोडावा. फोनशिवाय जगणं मला जमतच नव्हतं. सोशल मीडिया नाही, कुणाशी संपर्कच नाही या भावनेनं मग तगमगायला लागले. कुठं जायचं तर गाडी बुक करता येत नाही. मित्र-मैत्रिणींशी चटकन बोलता येत नाही, त्यांचं काय चाललंय हे कळत नाही. जसं काही मी जगापासून लांब फेकले गेले असं मला वाटायला लागलं होतं; पण तरी गेले आठ महिने मी हा उपवास सुरू ठेवला आहे आणि आता यापुढेही स्मार्टफोन फ्री आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे.’- अर्थात हा निर्धार तिचा या स्पर्धेआधीपासून होताच कारण तिनं या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिनं जो व्हिडीओ तयार केला होता तोही मोठा रंजक आहे. त्यात ती असं स्पष्ट म्हणते की, ‘स्मार्टफोन आणि आपण ही एक लव्ह हेट प्रकारचीच रिलेशनशिप आहे. फोन हातात नसेल तर जगणं सुनसुनं वाटतं. मी तर सगळी कामं फोनमध्येच नोंदवते. रात्रंदिवस सोशल मीडियात कनेक्ट असते. मोबाइल गेम खेळण्याचीही चटक लागलेली आहे. घरात कुणी बोलतंय, गप्पा मारतंय, जेवतंय त्यावेळीही हातात फोन घेऊन तो कधी एकदा स्क्रोल करायला लागायचा असं व्हायचं. मी सतत फोनवरच.मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की, मी माझा वेळ वाया घालवते आहे. मी स्क्रोल करण्यापलीकडे काहीही करत नाही. फक्त वेळ वाया घालवते आहे. ‘डूइंग नथिंग’ या स्टेजला मी कधी पोहोचले मला कळलंही नाही. रोज मी झोपतानाही फोन उशाशीच घेऊन झोपायचे. रात्री- बेरात्री जाग आली तरी मी लगेच हातात फोन घेऊन स्क्रोल करायला लागत असे. आणि एवढं करून मला कशासाठीच वेळ नव्हता. वेळच मिळत नाही ही तक्रार मी सतत करत होते. त्यामुळे मला वाटतं की या स्मार्टफोनशिवाय जगून पाहावं. म्हणून मी या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं.’-हा तिचा व्हिडीओ निवडला गेला. तिनं आव्हानही स्वीकारलं; पण पुढे काय? सोपं आहे का सेलफोनशिवाय राहणं? कसं जमलं तिला?एलिना सांगते, ‘मुळात मी सेलफोनशिवाय जगायचं म्हणतेय याचा धक्का माझ्या मित्र-मैत्रिणींनाच जास्त बसला. ते म्हणाले, अशक्य आहे तू जे म्हणतेस ते, शक्यच नाही याकाळात सेलफोनशिवाय जगता येणं. पण मी ठाम होते. मलाही एकदम रिकामपण आलं. खूप वेळ एकदम अंगावर आला. मला साधं कुणाशी फोनवर बोलायला वेळ नव्हता; पण आता हातला फोन नाही, त्यावरचा स्क्रोलिंग नाही म्हटल्यावर मला वेळच वेळ होता. अगदी रिकामा वेळ. आवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्यावाचून काही पर्यायच उरला नाही. फोटो घेण्यापेक्षा मी जिथं आहे ते पाहू, अनुभवू लागले. मुख्य म्हणजे माझी भरपूर झोप व्हायला लागली. या काळात मी 30हून जास्त पुस्तकं वाचली. 125 टक्के जास्त प्रॉडक्टिव्ह झाले. अधिक चांगलं काम करू लागले. मला वेळच नाही, ही तक्रारच माझ्या आयुष्यातून संपली. मुख्य म्हणजे सतत सोशल मीडिया स्क्रोल करकरून मी जास्त उदास आणि डिप्रेस होत असे. ते सारं बंद झालं. माझा टेक्नॉलॉजीला विरोध नाही, ती उत्तमच आहे. मात्र मी तिचा गैरवापर किंवा अतिवापर करत असे. आणि त्याबदल्यात मला काय मिळालं?तर माझं स्वातंत्र्य गेलं. संपलंच. माझा खासगीपणा संपला. मला काही व्यक्तिगत आयुष्यच उरलं नाही. माझी विचार करण्याची क्षमताही बधिर झाली. मी फक्त तासनतास स्क्रोल करत असे. दिवसाला किमान तीन-चार तास मी फोनवर असायची. आणि त्यावेळेत मी केलं काय?तर काही नाही. हे किती धोकादायक आहे.-हे धोके उमगले आणि मी ठरवलं हे सेलफोन फास्टिंग करायचंच. नो मोअर स्क्रोलिंग.आणि म्हणून मी हे आव्हान स्वीकारलं. आता ठरवलंय हे वर्षच नाही तर यापुढेही कायम स्मार्टफोन वापरायचा नाही!’- एलिना हे जे काही सांगते ते काही तिच्यापुरतंच मर्यादित नाही. ते आज जगभरातल्या तारुण्याला लागू आहे. मात्र वर्षभर सेलफोनशिवाय राहण्याचं जे धाडस एलिनाने केलंय ते करण्याची ¨हमत आपल्यात आहे का?विचारावं ज्यानं त्यानं स्वतर्ला!
***************
कोरियातलं बोटावरचं संकट
एखाद्या देशात साथीचे आजार येतात आणि माणसं बळी पडतात हे तर आपण ऐकलं आहे.मात्र सेलफोनचं व्यसन हीच एक लाट येऊन आपल्या देशातल्या तारुण्यासाठी थेट डिजिटल डिटॉक्स सेंटरच उभारावे लागावेत आणि त्यासाठी सरकारनं धोरणात्मक प्रयत्न करावेत असं कुठं आजवर झालं होतं का?पण ते आता झालं आहे.ही परिस्थिती आहे कोरियातली.कोरियात वयाच्या विशीतली अनेक मुलं दिवसाकाठी सोळा-सोळा तास फोनवर असतात आणि फक्त स्क्रोलिंगच करत राहतात, अशी आकडेवारी अलीकडेच दक्षिण कोरियन सरकारच्या माहिती आणि संज्ञापन मंत्रालयाने दिली आहे. कोरियात 98 टक्केतरुण मुलांच्या हातात मोबाइल फोन्स आहेत. त्यातही 10 ते 19 या वयोगटातील किमान 30 टक्के मुलं मोबाइलवर ओव्हर डिपेंडण्ट आहेत, म्हणजे इतके मोबाइलच्या आहारी गेले आहेत की ते मोबाइलशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाहीत. आणि एक तृतीयांश म्हणजे दर तीन मुलांपैकी एक मुलगा-मुलगी असे आहेत ज्यांना चित्त एकवटून कामच करता येत नाहीत. अभ्यास करता येत नाही. कॉन्सण्ट्रेटच न करता येणं हा त्यांच्यामध्ये मोठा आजार आहे.अजून एक मोठा आजार म्हणजे स्लिपलेस आणि स्क्रोलिंग.म्हणजे झोपच लागत नाही म्हणून ही मुलं स्क्रोलिंग करत राहतात, आणि स्क्रोलिंक करत राहतात म्हणून ते झोपूच शकत नाही. या सगळ्याचा त्यांच्या तब्येतीवर आणि मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होतो आहे.परिणाम म्हणून कोरियन सरकारने आता डिजिटल डिटॉक्स सेंटर्स सरकारी खर्चातून सुरू केले आहेत. तिथं फक्त पालकांना मुलांच्या जेवणाचे पैसे भरावे लागतात. सध्या या केंद्रात भरती होण्यासाठी अनेक मुलं आणि त्यांचे पालक रांगा लावून उभे आहेत.
*****************
तुम्ही अॅडिक्ट आहात का?
हे साधे 10 प्रश्न आहेत. एकदम सोपे. या प्रश्नाचं उत्तरं तुम्हाला केवळ हो किंवा नाहीमध्ये द्यायचं आहे. तेही खरंखरं आणि स्वतर्लाच.जर तीनपेक्षा जास्त वेळा तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तुम्ही सेलफोन अॅडिक्ट आहात आणि स्वतर्ला आवर घालायची गरज आहे, डिटॉक्सची गरज आहे, असं खुशाल समजा.
1. फोनचा वापर कमी करायला हवा असं वाटतं का?2) कळतच नाही स्मार्टफोनवर आपला नेमका किती वेळ गेला?3) रात्री झोपेत जाग आली तर बराच वेळ फोन तपासण्यात जातो?4) कशातच लक्ष लागत नाही, सतत फोन हातात घ्यावासा वाटतो?5) मित्र-मैत्रिणींनी काय पोस्ट केलं असेल हे सतत सोशल मीडियात जाऊन पाहावंसं वाटतं?6) फोन दिसलाच नाही, लवकर सापडला नाही तर भयंकर बेचैन होतं, जीव कासावीस होतो?7) आपल्या फोन वापरण्यावरून रोज घरात भांडण-वादावादी होते?8) प्रत्यक्ष कुणाशी बोलण्यापेक्षा व्हॉट्सअॅपवर बोलणंच सोपं वाटतं. प्रत्यक्ष भेटीत बोलता येत नाही?9) अभ्यासाचा, कामाचा वेळ वाया जातोय हे कळतं, तरी आपण फोनवर स्क्रोलिंग करतो?10) फोन वापरून झाल्यावर डोकं जड झाल्यासारखं वाटतं? उदास वाटतं?
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)