‘कॉलेजात अजिबात न फिरकता, अभ्यास न करताही पास व्हायचंय, चांगले मार्क मिळवायचे आहेत तर मग चला अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीला !’ - अशी खुसफूस नेहमीच कानी पडायची़ पाथर्डी तालुक्यातील विविध शाळा-कॉलेजात लांबलांबचे विद्यार्थी अॅडमिशन घेतात आणि येतात थेट परीक्षेलाच अशी चर्चाही सरावाची. त्यात गेल्या चार वर्षात हे प्रमाण प्रचंड वाढलं आणि अनेक शाळांत सर्रास कॉपी होत असल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या.कशी चालते ही कॉपी हे पहायला थेट पाथर्डीलाच गेलो.पाथर्डीत प्रवेश करताच श्री तिलोक जैन विद्यालयाची देखणी इमारत लक्ष वेधून घेते़ चहूबाजूंनी संरक्षक भिंत़ या भिंतीलागून भल्यामोठ्या आलिशान गाड्यांची पार्किंग रांग दिसली. गाड्या कुणाच्या चौकशी केली तर कळलं की मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, बीड, ठाणे व रायगड अशा राज्यातल्या विविध भागातून आलेली ही वाहनं आहेत. पार्किंगची रांग ओलांडून जरा पुढे गेलो तर समोर विद्यालयाचं लोखंडी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून कुणीही सहज आत जात - येत होतं. कसली रोकटोक नव्हती. परीक्षा सुरू असलेल्या इमारतीपर्यंत मीही सहज गेलो़ कुणी मला हटकलं नाही़ विद्यार्थ्यांना रांगेनं परीक्षा केंद्रात सोडलं जात होतं. प्रत्येकाची झडती घेतली जात होती़ एव्हढ्या कडक शिस्तीत कॉपी कशी होणार असं मला वाटतच होतं तोवर तिथंच उभ्या आणि गेटमधून आत आलेल्या एका विद्यार्थ्याला त्याच्यासोबत आलेल्या मित्राने लोखंडी फाटकाच्या फटीतून थेट पुस्तकच देऊन टाकलं. ते पुस्तक हातात राजरोस घेऊन जाणाऱ्या त्या आणि त्याच्यासारख्या मुलांना कुणी जाब विचारला नाही की अडवलं नाही.अकराच्या ठोक्याला परीक्षा सुरू झाली़ तोपर्यंत ‘लोकमत’चे पाथर्डी शहर प्रतिनिधी हरिहर गर्जेही तिथं येऊन पोहोचले आणि मग आम्ही दोघं पुढच्या एम़ एम़ निऱ्हाळी केंद्राकडे निघालो. पोहोचलो तर तिथं गेटच्या बाहेरच तरुण आणि पालकांचा मोठा जथा़ या जथ्याचा पत्रकारांवर मोठा राग़ का तर म्हणे पत्रकारांमुळे त्यांना कॉपी करता येत नाही़ पेपरवाले बातम्या छापतात आणि नस्ता ताप देतात. हे सारं आम्हीही ऐकलं. आणि मग कळलं की निऱ्हाळी विद्यालयाच्या समोरच एक लॉकरूम आहे़ या लॉकरूममध्ये प्रश्नपत्रिका एकत्रित ठेवल्या जातात़ तेथूनच तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रांना त्या वितरित केल्या जातात़ दुचाकीवरून या प्रश्नपत्रिका संबंधित परीक्षा केंद्रांवर पोहोचवल्या जातात. पण ही लॉकरूम ते परीक्षा केंद्र या दरम्यानच्या मार्गावर प्रश्नपत्रिकांना पाय फुटतात, अशी उघड खुसफूस लॉकरूम बाहेरच्या चर्चेतून कानावर आली. लॉकरूमबाहेर एक पोलीस कर्मचारी खुर्ची टाकून बसला होता. त्याच्याभोवती इतरही अनेकजण उभे. आतमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी कराड फोनवरून बोलत होते़ आम्हाला पाहून ते बाहेर आले़ लॉकरूममध्ये नेऊन आतील व्यवस्था त्यांनी दाखवली़ पाथर्डीतील कॉपी प्रकरण माध्यमांनी उजेडात आणल्यानंतर सारा शिक्षण विभागच पाथर्डीत दाखल झालाय आणि आता कॉपी रोखण्यासाठी पाच पथकं तैनात केली गेली असल्याचं कराड यांनी सांगितलं. आता आज कॉपी होणारच नाही, असा विश्वास ते आम्हाला देत होते़कराडसाहेबांचा निरोप घेऊन पुढे वसंतदादा विद्यालयात पोहोचलो़ पंचायत समितीशेजारीच हे विद्यालय आहे़ पंचायत समितीच्या बाजूने काही तरुणांचा जथा उभा होता़ हा जथा खिडकीमधून परीक्षार्थींना कॉप्या पुरवत होता़ आम्ही तिथं गेलो त्याचवेळी एक भरारी पथकही विद्यालयात दाखल झालं. हे पथक आल्याची कुणकुण सगळ्या परीक्षार्थींना एकाचवेळी कशी लागली हे कळलं नाही. पण भरारी पथकानं गेटमधून एण्ट्री घेताच पेपर लिहित्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी भराभर आपल्याकडच्या कॉप्या खिडकीमधून टपाटप खाली टाकल्या़ एक शिक्षक तर स्वत: खिडकीतून कॉप्या फेकण्यात मुलांना मदत करत होते. एवढं सगळं होऊनही भरारी पथकानं पाच विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडलं.या पथकाच्या मागोमागच आम्ही परीक्षा केंद्रात गेलो़ मात्र आम्हाला पाहून एका रूमचा दरवाजा धाडकन बंद झाला़ तिथून आम्हाला पिटाळण्यात आलं. उलट तुम्ही कोण, कुठून आलात, का आलात अशा प्रश्नांची सरबत्ती भरारी पथकातील एका अधिकाऱ्यानं आमच्यावरच सुरू केली़ पत्रकार आहोत, असं सांगितलं तर पत्रकारांना आतमध्ये प्रवेश नाही, तुम्ही परीक्षा केंद्रात आलातच कसे, बाहेर व्हा आधी असं आम्हालाच दरडावण्यात आलं. विद्यालयाच्या प्रशासनाला बोलावून घेत आम्हाला बाहेर काढण्याचं फर्मानही तोवर सुटलं. त्याचवेळी त्या भरारी पथकाच्या गाडीचा ड्रायव्हर आला आणि सांगू लागला, तिथं कॉपीचे १०० संच तयार आहेत़ यादीतीलच विद्यार्थ्यांना द्या, असं ते सर फोनवरून कोणालातरी सांगत आहेत.पुढं त्यानं काही सांगायच्या आत आम्हाला केंद्राबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला़ पण बाहेर पडता पडता काही हॉलमध्ये डोकावून पाहिलं. आतमध्ये दाढीचे खुंट वाढलेलेच नव्हे तर अख्खी दाढी फुटून पार पांढरी झालेलेही काहीजण परीक्षा देत होते़ हे कसे दहावीचे विद्यार्थी? प्रश्न होताच..शोधताना उत्तरं समोर दिसतही होतीच.म्हणून मग श्री तिलोक जैन विद्यालयाच्या पाठीमागच्या बाजूनं आम्ही आमची दुचाकी थेट परीक्षा केंद्राच्या भिंतीपर्यंत नेली़ तिथंही कॉपी पुरविणाऱ्यांची तोबा गर्दी़ एक शिक्षक तर मोबाइलवरून प्रश्न विचारून त्यांची उत्तरं स्वत:च लिहिण्यात गर्क होता. तो कुणासाठी प्रश्नपत्रिका सोडवत असेल?थोड्यावेळानं पाहिलं तर तो शिक्षक आता स्वत:च खिडकीतून आत कॉपी पुरवित होता़ म्हणजे मगाशी तो रेडिमेड उत्तरं लिहून तयार करत होता तर ! वरच्या व्हरांड्यात दोघा शिक्षकांमध्ये कॉपी पुरविण्यावरून चक्क बाचाबाची सुरू होती़ शेवटी एका शिक्षकाने दुसऱ्याच्या हातातून पुस्तक हिसकावून घेत परीक्षा केंद्रातच धाव घेतली़हे सारं पाहत चकित होत आम्ही पुन्हा एम़ एम़ निऱ्हाळी विद्यालयात पोहोचलो़ तिथं विद्यालयाच्या चारही बाजूंनी तरुण मुलं, पालकांची मोठी गर्दी़ आतमध्ये बैठे पथक़ बाहेरची मुलं पळत पळत जातात़ कॉपी देतात आणि त्याच वेगाने पुन्हा कॉलेजच्या भिंतीजवळ येऊन थांबतात़ आम्ही आतमध्ये गेलो़ आतमध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) लक्ष्मण पोले यांचं पथक बसून होतं. काही वेळानं ते तिथून निघाले़ जाता जाता आमच्याशी बोलले़ माध्यमांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत माझ्या हाती हे नाही, ते नाही, असं सांगत गाडीत जाऊन बसले़ हे पथक गाडीत बसताच विद्यालयाच्या पाठीमागून जोरदार दगडांचा मारा सुरू झाला़ खिडकीवर धडाधड दगडं पडू लागली़ काचा निखळून पडू लागल्या़ शिक्षणाधिकारी आरामदायी गाडीत बसून निघाले़ त्यांची गाडी गेटच्या बाहेर पडताच, कॉलेजच्या भिंतीवर बसलेली तरुणांची टोळकी जोरजोरात पळत कॉलेजमध्ये आली.मी फोटो काढण्यासाठी कॅमेरा सरसावला तसे दोघेजण हातात दगड घेऊन माझ्या दिशेने धावले़ फोटो काढले तर कॅमेरा फोडू, हात-पाय तोडू, अशा धमक्या देऊ लागले़ मी कॅमेरा ठेवून दिला़ ते पाहून ते पुन्हा खिडक्यांना लटकले़ हे घे उत्तर, पुढचा प्रश्न सांग, असा आरडाओरडा प्रत्येक खिडकीजवळ होत होता़ शिक्षक पाहत होते़ पोलीस काठी भिरकावीत होता़ पोलिसाची काठी चुकवून पुन्हा हे तरुण खिडकीला चिकटायचे़ तरुणांनी चहूबाजूंनी कॉलेजला वेढलं होतं़ २००- ३०० जणांचं टोळकं असेल हे़ ‘तुम्ही आगाऊपणा केला तर हे चिरडून टाकतील तुम्हाला़ तुम्ही जा’, असा सहानुभूतीचा सल्ला एकानं दिला तो वेगळाच़ थोडा वेळ तो धुमाकूळ पाहत तिथंच थांबलो आणि तिथून निघालो.चौकशी केली, लोकांशी बोललो, मुलांना विचारलं, कॉपी पुरवणाऱ्या मुलांनाही विचारलं की कोण येतात इथं परीक्षा द्यायला या महागड्या गाड्यांतून?तेव्हा कळलं की राज्यातल्या अनेक ‘ढ’ मुलांचे श्रीमंत आईवडील आपली लाडिक बाळं घेऊन इथे पाथर्डीला येतात. दहावी, बारावीची परीक्षा किमान उत्तीर्ण होण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील अनेक संस्थांमध्ये प्रवेश घेतात़ कॉलेजचं तोंड वर्षभर कधी पाहत नाही. पण परीक्षेला येतात. त्यात अभ्यासाचा कंटाळा असणाऱ्या श्रीमंत मुलांचा शोध घेण्याचं काम पाथर्डीतले काही एजण्ट करतात़ त्यात काही शिक्षकही सहभागी आहेत असं कळतं. मुंबई, पुणे, औरंगाबाद, रायगड येथून माणसांकरवी शोध घेऊन असे ‘खास’ विद्यार्थी पाथर्डी तालुक्यातील विशिष्ट शिक्षण संस्थांमध्ये प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेऊन दाखल केले जातात़ या फीच्या बदल्यात या खास विद्यार्थ्यांचे प्रवेश व परीक्षा फॉर्म भरून घेतले जातात. त्यावर या मुलांनी सह्या केल्या की प्रात्यक्षिक परीक्षा, विद्यालयातील हजेरी हे सारं मॅनेज केलं जातं. परीक्षा कालावधीत राहण्याखाण्याची सोयही हे एजण्टच करतात. परीक्षा कालावधीत या खास विद्यार्थ्यांना पाथर्डीत आणून त्यांची राहाण्यापासून ते परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून उत्तरपत्रिका पुरवण्यातही काही एजण्ट पुढाकार घेतात़ त्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात दहशत पसरवून कॉपी पुरविण्याचं काम काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना दिलं जातं. अभ्यास न करता, शाळेत न जाता चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा पाथर्डी पॅटर्न आता राज्यात गाजू लागला आहे़दुर्दैव हेच की, स्थानिक; पण गुणी, अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या मुलांना मात्र या साऱ्यांचा त्रास होतो. त्यांच्या पालकांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ येते़ आणि कॉपीचा बिझनेस करणाऱ्यांमुळे एक अख्खा तालुका बदनाम होतोय..या कॉपीचं करायचं काय?याचं उत्तर द्यायला यंत्रणा मात्र आजतरी तयार नाहीत किंवा माहिती असलेली उत्तरं देणं अनेकांच्या सोयीचं नाही...
ढ गोळ्यांमुळे धंद्याला बरकतदाढी वाढलेले, तिशी ओलांडलेले प्रौढ दहावीची परीक्षा देताना दिसतात ते कसे?शोधत निघालो. मग कळलं की बाहेरच्या जिल्ह्यातली दहावी पास होण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेली मुलं इथं एकदम दहावीत प्रवेश घेतात. वर्षभर फिरकतही नाहीत़ थेट परीक्षेलाच येतात़ या ‘बाहेरून आलेल्या’ मुलांचा शोध घेत आम्ही एका लॉजमध्ये पोहोचलो़ लॉजच्या व्हरांड्यातच एक बारावीचा विद्यार्थी बिअरचा आस्वाद घेत होता़ आम्हाला पाहून त्यानं बिअर लपवली़ लॉजच्या पायऱ्या चढून जाताना एकानं अडवलं. तुम्ही वर जाऊ नका, काय चौकशी करायची ती काउण्टरवर येऊन करा, असं सांगू लागला़ काउण्टरवर गेलो़ तिथला एकजण म्हणाला, मुलं आहेत; पण ती का आली इथं हे माहिती नाही़ दुसऱ्या लॉजमध्ये गेलो तिथंही हीच कहाणी. तिथं दहावी-बारावीची परीक्षा देण्यासाठी बाहेरून आलेले मुलंमुली दिसत होते. लॉजचालकाकडे चौकशी केली. ते म्हणाले, ‘पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, लातूर, औरंगाबाद व बीड अशा विविध जिल्ह्यांतून आलेत पोरं. वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देतात़ परीक्षा झाली की निघून जातात़’इथं परीक्षेच्या काळात हॉटेल, लॉज, मेस, झेरॉक्स सेंटर यांचा धंदा तेजीत असतो़ या दुष्काळी पाथर्डी तालुक्यात मोहटा देवी, मढी देवस्थान, भगवानगड, वृद्धेश्वर ही राज्यभर प्रसिद्ध असलेली देवस्थानं आहेत़ या देवस्थानांच्या यात्रोत्सव काळात मोठ्या प्रमाणात भाविक पाथर्डीत येतात़ तेव्हाच काय ती चलती. बाकी हाताला रोजगार कमी. ही मरगळ दहावी, बारावीच्या परीक्षा काळात पळून जाते़ कॉपी रॅकेटमधून अनेकांच्या खिशामध्ये पैसा खुळखुळू लागतो.दहावीच्या पटाला सूजपाथर्डी तालुक्यातील काही विशिष्ट विद्यालयात नववीच्या विद्यार्थ्यांचा पट एकदम कमी असतो़ हा पट दहावीला एकदम १०० विद्यार्थी संख्येच्या वर जाऊन पोहोचतो, याबाबत आता शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू आहे़ अनेक विद्यालयांकडून माहिती मागविली जात आहे.सध्या मात्र ती माहिती शिक्षण विभागाकडून गोपनीय ठेवण्यात आली आहे़
- साहेबराव नरसाळे(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत)sahebraonarasale@gmail.com(लेखासाठी विशेष सहकार्य : हरिहर गर्जे, उद्धव काळापहाड) (गेल्याच आठवड्यात एका वृत्तवाहिनीनं दाखवलेल्या वृत्तानंतर पाथर्डी कॉपीप्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समितीची नेमणूक करण्याची घोषणा शासनानं केली आहे. त्यानंतर लगोलग गेल्या शुक्रवारी (१७ मार्च २०१७ ) पाथर्डीत गेलेल्या ‘लोकमत’च्या सहकाऱ्यांना राजरोस कॉपीचं जे विषण्ण करणारं चित्र दिसलं, ते हेच!)