- अनादि अनंत
चोकोहोलिक्स.हा शब्द १९६८ पूर्वी या जगाच्या पाठीवर अस्तित्वातच नव्हता.पण जग बदलता बदलता या शब्दानं अशी काही भरारी घेतली की त्याचे दिवाने जगभर सापडू लागतात.चॉकलेट अतिशय आवडणारी, सतत खाणारी, त्याविषयी बोलणारी आणि शक्यतो त्यावरच जगणारी जगभरातली माणसं, चोकोहोलिक्स म्हणून गमतीनं ओळखली जाऊ लागली...अर्थातच त्यात लहान मुलांपेक्षा तरुण मुलामुलींचं प्रमाण जास्त होतं.खरं तर युरोपात ४६६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा चॉकलेट आलं तोपर्यंत जगालाही चॉकलेट ही गोष्ट फारशी माहितीच नव्हती...आणि जेमतेम ५०० वर्षांच्या घोडदौडीत चॉकलेटनं जग जिंकलंच. जगातला एक देश आजच्या घडीला असा नाही की, तिथं चॉकलेट मिळत नाही...**हा सगळा इतिहास-भूगोल सांगण्याचं कारण म्हणजे येत्या १३ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन साजरा होतो आहे. तसे वर्षभर जगभर कुठं ना कुठं चॉकलेट डे साजरे होतात. युरोपात ७ जुलैला आणि त्या आठवड्यात चॉकलेटचं सेलिब्रेशन असतं. पण १३ सप्टेंबर महत्त्वाचा कारण हा दिवस संयुक्त राष्ट्र संघानं साजरा करायचं ठरवलं आहे.जगभरातल्या माणसांना जातिपाती-भाषा-धर्म यापलीकडे जाऊन जोडणारे, सेलिब्रेशनचे आणि आनंदाचे दिवस नव्या काळात तयार करणं ही नव्या काळाची गरज आहे, असं राष्ट्रसंघाचं मत आहे !म्हणून येत्या १३ सप्टेंबरनिमित्त ही एक चॉकलेटी सफर.चोकोहोलिक्स.नावाच्या चॉकलेटवेड्यांना भेटण्याची.आणि राग, दु:ख, प्रेम, आदर यासह अनेक भावना जगताना चॉकलेटी मूडमध्ये रंगण्याची..