- साजीद अत्तरवाला, चॉकलेट बुके मेकर
कुणीतरी एक चॉकलेट गिफ्ट दिलं आपल्याला तर कसलं भारी वाटतं. मोठ्ठं चॉकलेट दिलं तर जास्तच भारी वाटतं.
चॉकलेट्स, एक फुलाचा बुके, एक ग्रिटिंग कार्ड हे तर नॉर्मली प्रेमाबिमात पडलं की देतातच सगळे. पण कल्पना करा, कुणीतरी आपल्याला एक चॉकलेट किंवा काही चॉकलेट पिशवीत घालून न देता थेट चॉकलेटचाच एक बुके बनवून दिला तर.
कल्पना करा, असा अख्खा चॉकलेटचा एक गुलदस्ताच आपल्या हातात आहे. कसं वाटेल. आनंदानं वेड लागेल, तो बुके पाहून. पण असा बुके खरंच करता येतो का.? नक्की येतो.
साजीदला विचारा, तो असे बुके नुस्ते करतच नाही तर ते कसे तयार करायचे याचं ट्रेनिंग देत वर्कशॉपही घेत असतो.
चॉकलेट के गुल और गुलदस्ते.
गिफ्ट तो हरकोई देता है, और चॉकलेट गिफ्ट देने मे कौनसी बडी बात है.? असं मलाही वाटत होतं. लोक तर काय त्याच त्या भेटी देतात एकमेकांना. दुकानात जाऊन वस्तू आणायची द्यायची.
दहा वर्षं झाली आता, आमच्या घरात एका छोट्या बाळाचं आगमन झालं होतं. खूप लोकांनी आनंदानं खूप भेटी दिल्या.पण मला मात्र तो क्षण एकदम यादगार बनवायचा होता.
मग मला एकदम वाटलं की, चॉकलेटची फुलंच का बनवू नयेत? मी काही चॉकलेटस् बाजारातून आणली, काही फुलं घरी बनवली. आणि त्यातून एक छोटासा चॉकलेटचा बुकेच तयार केला.
तो पाहून माझे सगळे नातेवाईक, मित्र म्हणाले की हे काम भारी आहे. तू हे प्रोफेशनली का सुरू करत नाही.
जरा विचार केला आणि जमेल आपल्याला असं ठरवून मी चॉकलेटचे बुके बनवून द्यायला सुरुवात केली. प्रशिक्षण नाही नी ट्रेनिंग नाही, मी जेमतेम अंडरग्रॅज्युएट. पण करायला लागलो आणि माझ्या डोक्यातून एकसे एक आयडिया बाहेर यायला लागल्या.
जसजसे बुके जाऊ लागले तसतशा अनेक ऑडर्स यायला लागल्या आणि आता तर कॉर्पोरेट्समध्ये माझे चॉकलेट बुके जातात. दिवाळी, ख्रिसमस, न्यू इयर आणि व्हॅलेण्टाईन्स डे हे वर्षातले सगळ्यात मोठे सिझन. त्यात आता कुणाकडे डोहाळेजेवण, बारसं, लग्न या सार्या कार्यक्रमातही चॉकलेट थीम वापरून सजावट केली जाते.
मात्र लोकं फार चोखंदळ असतात, त्यांना चॉकलेटचा हाच नाही दुसरा आकार हवा असतो, तेच ते पॅकिंग नाही हटके काहीतरी द्या म्हणतात.
माझ्याकडे स्वत: तयार केलेल्या चॉकलेटच्या २१ व्हरायटी आहेत. त्याही वापरून मी बुके बनवतो. आता तर सोशल मीडियाचा वापर करून आपलं काम, त्या कामाची जाहिरात उत्तम करता येते. त्यातूनच मी आता हे बुके बनवण्याचे वर्कशॉपही घेत असतो.
चॉकलेट बुके ही आयडियाच लोकांना इतकी रोमॅण्टिक वाटते की फार जास्त काही बोलावंच लागत नाही.
.हे एवढं तरी हवंच.!
१) लोक हौस म्हणून, रोमॅण्टिक होत हे सारं करतात, त्यामुळे ती भावना समजून घेत त्यांच्याशी बोलण्याचं स्कील हवं. बाकी चॉकलेट बुके आपण किती क्रिएटिव्हली करतो यावर आपलं नाव होतं.
२) लोकांच्या रुढी-परंपरा, धर्म, आवडीनिवडी, या सार्याची जाण करून घ्यावी लागते.
३) सदा प्रसन्न राहून लोकांशी शांतपणे बोलण्याचं कौशल्य हवंच.