- राहुल बोर्डे
शेगाव
भारतीय चित्रपट सृष्टीला आज 100 वर्ष उलटून गेली आहेत. राजा हरिश्चंद्र या मूकपटाने सुरु वात झालेल्या सिनेसृष्टीत आज घडीला वर्षाला 700 पेक्षाही जास्त चित्रपट दर वर्षी प्रदर्शित होतात. सिनेमा हे इंग्रजांचे मनोरंजनाचे साधन आणि भारतीयांना काय आवडणार या आशंकेने सुरुवात झालेली भारतीय चित्रपट सृष्टी आज जगातील हॉलिवूड नंतरची 2 नंबरची मोठी चित्रपट सृष्टी बनली आहे. आधी मूकपट, नंतर ब्लॅक अँड व्हाईट आणि नंतर रंगीत असा काळानुसार भारतीय सिनेमापण विकसीत होत गेला. काळानुसार जसा सिनेमा विकसीत होत गेला तशी सिनेमाची कथा/पटकथा देखील विकसीत होत गेली. 1913 पासून 2000 पर्यंत चित्रपटचा मुळ विषय हा साधारण पणे धार्मिक किंवा प्रेम पट किंवा मग देश भक्तीवर आधारित असायचा. 2000 सालापर्यंत अगदी बोटावर मोजण्याएवढेच काही चित्नपट आले असतील ज्यांचे विषय हे पठडीबाज प्रेमपटापेक्षा वेगळे राहिले. जसे कि मदर इंडिया, मिस्टर इंडिया, शोले, बर्निग ट्रेन, डॉन.
पण 2000 साली आलेल्या लगान या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीला एक नवे वळण आणि एक नवीन उंची मिळवून दिली. प्रेमाव्यतिरिक इतर विषयावर देखील चित्रपट काढता येतो आणि तो प्रचंड यशस्वी सुद्धा होऊ शकतो हा या चित्नपटाने घालून दिलेला नवा पायंडा. लगान नंतर सत्य घटनेवर आधारित चित्रपटांचा एक नवीन ट्रेंड भारतीय चित्रपट सृष्टीत सुरु झाला.
कुतूहल हा एक असा मानवी स्वभाव आहे जो आपल्यामध्ये माहित नसलेल्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची ओढ निर्माण करतो. लगान नंतर गुरु , बॅण्डीट क्वीन, शूट आऊट अॅट लोखंडवाला, लक्ष, नो वन किल्ल्ड जेसिका, बाजीराव मस्तानी, रुस्तम, नीरजा, तलवार, गाझी अटॅक, रईस, दंगल असे सत्य घटनेवर अनेक चित्रपट येऊन गेले आणि या पैकी बहुतांश सुपरिहट पण झाले. या पुढे देखील सत्य घटनेवर आधारित चित्रपट येतच राहतील.
पण गेल्या काही वर्षांपासून आपण एक नवीन वाद निर्माण झालेला बघितलाय. बर्याच प्रेक्षकांच्या मतानुसार हा वाद दिग्दर्शकाने मूळ घटनेत आपल्या सोयीने केलेल्या बदला मुळे होतो. बरेचदा वेळेस दिग्दर्शक/निर्माते असा वाद निर्माण झाला कि ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ असा गोंडस शब्द वापरून वाद मिटवायचा प्रयत्न करतात. सत्य घटनेवर आधारित चित्रपट काढताना त्याचा फार काटेकोर पणे अभ्यास करावा लागतो. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पण काळजी घ्यावी लागते.
पण जेव्हा दिग्दर्शक/निर्माता सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करायला लागतो तेव्हा प्रश्न हा निर्माण होतो कि हा वापर नेमका चित्रपट प्रभावी करण्यासाठी आहे कि निव्वळ खोडसाळ पणा करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी?
हल्ली प्रदर्शित झालेल्या चित्रपटा तील काही प्रसंग पाहिले तर याचा नेमका अर्थ काय काढायचा हे कळायला भाग नाही. बाजीराव मस्तानी चित्रपटा तील काशी बाई आणि मस्तानी यांनी सोबत नृत्य केलेला दाखवलेला प्रसंग सिनेमॅटिक लिबर्टी म्हणायचं कि खोडसाळपणा?
दंगल चित्रपटा तील महावीर फोगट यांना सामन्याआधी कोंडून ठेवलेल्या प्रसंगावरून देखील बराच वाद निर्माण झाला होता.
एअर लिफ्ट मध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या दाखवलेल्या भूमिकेवरून देखील असाच वाद निर्माण झाला होता.
काही दिवसाखाली पद्मावती या चित्रपटाच्या सेटची एका संघटनेने मोडतोड केल्याची बातमी ऐकली होती. या संघटनेच्या म्हणण्यानुसार राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावर चित्रित करण्यात आलेला कथित प्रसंग.
याला सिनेमॅटिक लिबर्टी मानायचा की खोडसाळपणा?
चित्रपट हे एक मनोरंजनाचं साधन आहे. ती एक कला आहे. कला दाखवताना अर्थार्जनासाठी कला विकावी देखील लागते हे जरी सत्य असले तरी व्यवसाय करताना हेतू शुद्ध ठेवणं हे महत्वाचं आहे. आपण जे दाखवतो त्याचा हेतू जर शुद्ध असेल तर प्रेक्षक देखील त्या कलेला भरभरून दाद देतात. लिबर्टीच्या नावाखाली जर चुकीच्या गोष्टी प्रेक्षकांच्या माथी मारायला लागल्या तर सत्य घटना आणि त्याचा इतिहास या दोन्हीचा पण विपर्यास व्हायला लागतो. एकाद्या खोडसाळ लिबर्टी मुळे कदाचित प्रसिद्धी तर मिळू शकते पण कलेचा दर्जा खालावायला लागतो.
स्वातंत्र्याचीही जबाबदारी घ्यायला हवी!