कॉन्व्हेंटमधलं शिक्षण एकीकडे, आणि दुसरीकडे परंपरा जोपासण्याची आस, विचारांचा आणि सरावांचा रियाज, सुंद्रीच्या वादनातील कसब, घरातून झालेले सुरेल संस्कार यातूनच ‘ती’ घडली.
आणि आता तरुणींसमोर एक सांगितिक आदर्श ठेवत नव्या वाटेवर आत्मविश्वासानं तिनं एक पुढचं पाऊल टाकलं आहे! स्वभावातील नम्रतेनं तिनं आपलं नाव सार्थ ठरवत ‘सवाई’च्या माध्यमातून रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला.
नम्रता गायकवाड तिचं नाव.
पुण्यात नुकत्याच संपन्न झालेल्या 63व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा श्रीगणोशा नम्रताच्या सनईवादनाच्या सुरेल आणि मंगल सुरावटीने झाला.
ती देशातील सर्वात लहान सनईवादक. आणि सवाई महोत्सवाच्या स्वरमंचावरून सनईवादन करणारी तर पहिलीच महिला! आजच्या कुठल्याही तरुण मुलीसारखी ही मुलगी. तिचं सनईवादन तर वेगळं भासतंच, पण आपल्या कलेविषयी ती बोलते तेव्हा तिच्या नजरेतली चमकही आपल्या लक्षात येते. वयाच्या सहाव्या वर्षापासून नम्रताने सनई शिकायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून ती या कलेची साधना करतेच आहे.
ती सांगते, ‘‘आई हीच माझी पहिली गुरू. तिनेच मला सनईवादनाची बाराखडी शिकवली. त्यातून मी संपन्न आणि समृद्ध होत गेले. शिकण्याची आणि घडण्याची प्रक्रिया लहानपणापासूनच सुरू झाली. दिग्गज गुरूंच्या मार्गदर्शनाने माङया कलेला जणू कोंदणच मिळाले.’’
हे सारं नम्रता अत्यंत आदरानं सांगत होती. आणि बोलता बोलता म्हणाली, ‘‘सुरुवातीला वादनामध्ये अनेक चुका व्हायच्या आणि मी निराश व्हायचे. परंतु प्रत्येक वेळी पालकांनी, गुरूंनी मला नैराश्यातून बाहेर काढले आणि सुधारणा करण्याचे प्रोत्साहन दिले.’’
वयाच्या 12व्या वर्षी नम्रताने पहिला कार्यक्रम केला. तिचे पणजोबा सनईसम्राट शंकरराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नम्रताला वादनाची पहिली संधी मिळाली. खच्चून भरलेला प्रेक्षकवर्ग, कौतुकाने भारावलेले डोळे, अपेक्षांचे दडपण यामुळे ती भांबावली होती. धरणीमातेने पोटात घ्यावं अशी इच्छा होत होती. पण, दीर्घ श्वास घेऊन आत्मविश्वासाने तिनं वादनास प्रारंभ केला आणि पाहता पाहता प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यावेळी खूप कौतुक झाल्याचे आणि शाबासकीची थाप पाठीवर पडल्याचे नम्रताने सांगितले.
पं. विजयकुमार, पं. दयाशंकर तसेच संजीव शंकर, अश्विनी शंकर हे नम्रताचे गुरू. ‘सवाई’च्या तयारीसाठी तिने थेट दिल्ली गाठली आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने कठोर परिश्रम घेतले. रियाज हाच कोणत्याही कलेचा पाया असल्याचे नम्रता सांगते. पाया पक्का असल्याशिवाय कळस गाठता येत नाही, याची जाणीव ठेवत ती दिवसातून जास्तीत जास्त वेळ रियाजसाठी देते. रियाज म्हणजे केवळ वादनाचा सराव नसून ती विचारांची प्रक्रिया असते. त्यामुळे ही प्रक्रिया व्यवस्थित घडवावी लागते. त्यासाठी योगा, प्राणायाम आणि ध्यानधारणोला पर्याय नाही, असंही तिनं आवजरून सांगितलं.
नम्रताने संगीत विषयातून पदवी घेतली असून, आता तिचं पदव्युत्तर शिक्षण सुरू आहे. ‘सनई’ हाच विषय निवडल्याने तिला कलेस न्याय देता येत आहे. पुढील वाटचालीमध्ये नानाविध प्रयोग नम्रताला करून पाहायचे आहेत. त्यासाठी तिने काही ध्येयही ठरवले आहे.
ते ध्येय काय असं विचारलं तर ती हसून सांगते, ‘योग्य वेळ येताच ‘ध्येयाचे गुपित’ उलगडेन’!
जिची सुरुवात इतक्या महान स्वरमंचावरून झाली, तिच्या कष्टांना, रियाजाला आणि वाटचालीला शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात!!
‘‘मला जे राग आवडतात ते मी गाण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करते. नवनवीन शिकण्याची माझी इच्छा आहे. सनईवादन करताना शारीरिक आणि मानसिक ताकद एकवटावी लागते. त्यासाठी श्वासांचे व्यायाम करणं आवश्यक असतं. माङया पिढीच्या मुलींनी अशा प्रकारच्या कलेचा वारसा जोपासण्यासाठी पुढे आले पाहिजे. अर्थात त्यासाठी अविरत परिश्रम करण्याची तयारी हवी. परिश्रमांच्या जोडीला पालकांचा पाठिंबाही अत्यंत महत्त्वाचा असतोच. त्यामुळे पालकांनी तरुण पिढीला असे अनोखे प्रयोग करूद्यावेत, स्वत:ला घडवू द्यावे.’’
‘‘लहानपणापासून सवाई बघत-ऐकत आले आहे. सवाईच्या स्वरमंचावर येता यावं हेलहानपणापासूनचं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण तर झालं आहे; पण भविष्यातही या स्वरमंचावर यायला आवडेल! सवाईत सादरीकरणाविषयी जेव्हा पहिला फोन आला, त्यावेळी पहिल्यांदा स्वत:वर विश्वासच बसला नाही. इतक्या लहान वयात ही संधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं; पण ही संधी मिळणार हे लक्षात येताच त्या संधीचं सोनं करायचा निश्चय केला. आणि नव्या जोमाने तयारीला सुरुवात करत सनईवादन गायकी अंगाने सादर करण्याचा प्रयत्न केला.’’
‘‘हा स्वरमंच कलाकारांचं मंदिरच आहे. शुद्ध अंत:करणाने प्रत्येक कलाकार या स्वरमंचावर सेवा बजावतो. मीही अंत:करणापासून सादरीकरणाचा प्रयत्न केला. स्वरमंचावर आले तेव्हा नव्र्हस होते; पण सादरीकरण झाल्यानंतर ताण कुठल्याकुठे पळून गेला. हा सवाईचा मंच किती मोठा आहे, हे ख:या अर्थाने आज कळाले. ’’
- प्रज्ञा केळकर
( प्रज्ञा ‘लोकमत’च्या पुणो आवृत्तीत उपसंपादक आहे.)