डॉ. भूषण केळकरही लेखमाला सुरू करतानाच्या पहिल्या १-२ लेखातच मी असं म्हटलं होतं की, इंडस्ट्री ४.० चा वेग एवढा आहे, की २०१८ संपतानाचा लेख हा मी लिहिलेला असेल की प्रिंटिंग करणारे छपाईयंत्र लिहील कोण जाणे? ते वाक्य मी अतिशयोक्ती म्हणून लिहिले होते, परंतु मला सकारण भीती वाटू लागली आहे! मागील लेखात मी एक कोर्स ‘इंडस्ट्री ४.० हाऊ टू रिव्होल्यूशनराइझ यूवर बिझनेस’ ( edx.org वरचा) असे लिहिलं होत, मात्र ते (नजरचुकीनं) ‘हाऊ टू रिव्होल्यूशनराइझ यूवर ब्रेन’ असा छापलं गेलं! त्यामुळे मला बऱ्याच ई-मेल्स आल्या की ‘ब्रेन’वाला कोर्स काही edx.org वर सापडत नाही!असो. विनोदाचा भाग सोडा; पण बिझनेसवाला कोर्स नक्की करा, उपयोग होईल.मागील आठवड्यात बातमी होती ती सुरेश प्रभूंनी केलेल्या प्रमुख विधानाची. कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री मंत्री या नात्यानं सुरेश प्रभूंनी विशेष उल्लेख केला होता तो ए.आय. रोबोटिक्सचा आणि यापुढील काळातील त्या तंत्रज्ञानाच्या महतीचा. नव्या भारताला या औद्योगिक क्रांतीवर स्वार व्हावेच लागेल असं ते म्हणाले.नुसत एवढंच नाही तर नीती आयोगामध्ये सुद्धा याबद्दल बरीच तपशिलानं चर्चा झाली आहे. खरं तर आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कामकोटी यांच्या नेतृत्वाखाली एका टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्या टास्क फोर्सनी ‘एनएआयएम’ (नॅशनल आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स मिशन) ची घोषणा व सुरुवातपण केली आहे. त्याचा मुख्य उद्देश हा ए.आय.मधील मूलभूत काम आणि त्याचे भारतीय जनमानसावर होणारे परिणाम यावर उपाययोजना हे आहे. गेल्या महिन्यात वाध्वानी बंधूंनी मुंबईमध्ये भारतातील पहिली ए.आय. लॅब ( आर्टिफिशियल इन्टलिजन्स लॅब अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा) उभी केली. ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. २०० कोटी रुपये एवढ्या आर्थिक पाठबळावर रोमेश व सुनील वाध्वानी या अमेरिकास्थित लक्ष्मीपुत्रांनी ही प्रयोगशाळा सुरू केली आहे. वाध्वानी ए.आय. लॅब ही अमेरिकेतल्या एमआयटीतल्या ए.आय. लॅब सारखीच काम करेल अशी कल्पना आहे.या राष्ट्रीय पातळीवरच्या प्रयत्नांचा उद्देश आहे तो बँक, अर्थक्षेत्र, व्यापार-उद्योग, पर्यावरण अशा अनेक भागांमध्ये ए.आय.चा वापर करून ते अधिक सक्षम करणं. भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतीक्षेत्र. आपण ए.आय.चा वापर आणि कृषिक्षेत्र याबद्दल थोडं विस्तारानं पाहू.गुगल या प्रख्यात कंपनीने एक गोपनीय अशी प्रयोगशाळा बनवली आहे. त्याचं नाव ‘लॅब एक्स’ असं आहे. त्याचं मुख्य काम हे ए.आय.चा वापर करून सिंचन आणि पेरणी याबाबत प्रगत तंत्रज्ञान निर्माण करणं असं आहे. अॅस्ट्रो टेलर हा या ‘लॅब एक्स’चा संचालक आहे. आणि तो म्हणतो की जगात शेती खूप महत्त्वाची असून, २० ते ४० टक्के धान्य वाया जातं ते केवळ तंत्रज्ञानाच्या अभावाने! तिथं आता या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू होईल.इंडस्ट्री ४.० मधील अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग. त्याविषयी विस्तारानं आपण पुढील भागात जाणून घेऊ. परंतु, भारतामध्येपण या क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित शेती सुधारण्याचे यशस्वी प्रयोग झालेत. वेळी-अवेळी पडणारा पाऊस, कीड व किटक यांच्यामुळे होणारे नुकसान, लहरी हवामान, अवर्षण-अतिवर्षण या चक्रात अडकलेला, आत्महत्येपर्यंत पोहोचलेला शेतकरी हे सारं दुर्दैवी वास्तव आपण पाहातो.आंध्र प्रदेशातील कउफकरअळ नावाच्या संस्थेने मायक्रोसॉफ्ट बरोबर काम करून क्लाउड टेक्नॉलॉग वर आधारित पे्रडिक्टिव्ह अॅनॅलिसिस वापरलं. १७५ शेतकºयांनी एसएमएस आल्यावरच पेरणी व योग्य सिंचन केलं. या क्लाउड तंत्रज्ञानात जमिनीचा दर्जा, खतांचं नियोजन, कीटकनाशक फवारणी, ७ दिवसांचा पर्जन्यमानाचा अंदाज व अन्य अनेक गोष्टींचा विचार अंतर्भूत होता. या १७५ शेतकºयांचं उत्पादन आणि उत्पन्न २०-४० टक्के वाढलं! आता ७ खेड्यांतील २००० शेतकरी या प्रकल्पात सामील होत आहेत अशी बातमी आहे!काय गंमत आहे ना! ‘क्लाउड’ तंत्रज्ञानाला ते नाव मिळताना कल्पना तरी असेल का, की ‘क्लाउड’चा वापर खरंच ‘ढगासाठी’ होईल म्हणून...( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत. bhooshankelkar@hotmail.com )
ढगासाठी क्लाउड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 10:03 AM