- कॉफीटिव्हिटी
- मयूर देवकर
‘प्रोडक्टिव्हिटी’ या शब्दाची आजकाल फार चर्चा. फार आग्रह.
कार्पोरेट जगात तर या शब्दाचं महत्व प्रचंड वाढलंय.
आता फक्त काम पूर्ण करणं नव्हे तर त्याला काही तरी ‘क्रिएटिव्ह टच-अप’ देण्याची अपेक्षा केली जाते. ‘हार्डवर्क’ऐवजी ‘स्मार्टवर्क’ला प्राधान्य दिलं जातं आणि प्रॉडक्टिव्हिीटी वाढवण्याचं प्रेशरही असतंच.
आता ही प्रोडक्टिव्हिटी वाढवायची कशी?
प्रोडक्टिव्हिटी वाढविणाºया अनेक वेबसाईट, अॅप्स, ब्लॉग्ज तुम्हाला आॅनलाईन मिळतील. पण या सगळ्यांमध्ये मला वेगळी वाटली ती ‘कॉफीटिव्हिटी’ ही वेबसाईट.
एखाद्या कामात अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्यापैकी बºयाच जणांना गाणं ऐकण्याची सवय असते. आवडीचं गाणं हेडफोनमध्ये ऐकत काम करताना इकडेतिकडे लक्ष विचलित होत नाही. पण या वेबसाईटची तºहा जरा वेगळी.
‘कॉफीटिव्हिटी’ (coffitivity) या वेबसाईटवर ‘मूड फ्रेशनर’ गाणी नाहीत, ना शांत करणारी पियानो इन्स्ट्रूमेंटल्स. इथे केवळ कॉफी शॉपमधील गोंगाट-गोंधळ ऐकण्यास मिळतो. आत या गोंधळाचा आणि प्रोडक्टिव्हिटिचा संबंध काय?
माणसाचा मेंदू एवढा जटिल आणि ‘विक्षिप्त’ आहे की, त्याचं ‘मेकॅनिझम’ अर्थातच कार्यपद्धतीचे जेव्हा विविध पैलू समोर येतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आता हेच बघा ना, कॅफेमधील गोंगाटामध्ये आपली क्रिएटिव्हिटी सर्वाधिक सक्रीय होते, असे शिकागो विद्यापीठाने केलेल्या एका रिसर्चचं म्हणणं आहे.
रिसर्चमध्ये तीनशेपेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला. बौद्धिक क्षमतेचा कस लागेल असे काही टास्क त्यांना देण्यात आले. एका गटाला कॉफी शॉपमध्ये बसवले तर दुसºया गटाला एका शांत ठिकाणी. विश्लेषणाअंती असं दिसलं की, कॉफी शॉपमध्ये असणाºया लोकांनी सर्व टास्कमध्ये दुसºया गटातील लोकांपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली.
सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कॉफी शॉपमधील गोंधळात आपल्या डोक्याची चकं्र अधिक गतीने फिरू लागतात. एकदम शांत जागीच कामावर लक्ष लागतं असा समज असणाºयांना हे तर खूपच शॉकिंग वाटेल.
पण एक गोष्ट आहे की, सकाळी आंघोळ करताना, ब्रश करताना आणि एवढंच काय तर गाडी चालवतानासुद्धा एकदम अचानक भन्नाट ‘आयडिया’ सुचतात. म्हणजे काय तर करत असलेल्या कामात अतिजास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करण्याऐवजी जर थोडंसं ‘डिस्ट्रॅक्ट’ असणं सृजनशीलतेला चालना मिळण्यासाठी खूप गरजेचं असतं.
मग याच रिसर्चचा आधार घेऊन अमेरिकेतील रिचमंड, व्हर्जिनिया येथील काही हुरहुन्नरी पोरांनी ‘कॉफीटिव्हिटी’ ही वेबसाईट (आणि अँड्राईड व आय-ओएस अॅप) सुरू केलं. घरी बसल्या बसल्या किंवा कुठेही असताना ‘कॉफीटिव्हिटी’ कॉफी शॉपचं वातावरण निर्माण करते. वेबसाईटवरील कॉफी शॉपचे रेकॉर्डिंग ऐकताना असं वाटतं की, आपण कॅफेमध्येच बसलो आहोत. लोकांचा गोंधळ, कप-ट्रेचा आवाज यासह वातावरण निर्मिती केली जाते.
तुमच्या मुडनुसार तुम्ही कॉफी शॉपचे वातावरण निवडू शकता. म्हणजे सकाळचा बिझी कॅफे, लंच टाईमचा शांत कॅफे किंवा मग कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा किलबिलाट असणारा कॅफे यांसारखे आॅप्शन येथे उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर पॅरीस, ब्राझील आणि टेक्सासमधील कॅफेचा अनुभवदेखील तुम्ही घेऊ शकता. थोडक्यात काय तर कॅफेमधील केवळ कॉफी नाही तर तिथला गोंधळही आपल्या मेंदूला तरतरी आणतो.
याला म्हणतात ‘कॉफी आणि बरंच काही’. किती साध्या गोष्टीवरून अशी ‘कामाची’ वेबसाईट बनवली. आपणही थोडं हटके विचार केला तर अशी एखादी भन्नाट कल्पना आपल्यालाही सुचेल. मुद्दा काय प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे!
आॅडिबल नेचर!
ज्यांना नुसता कॅफेचा गोंगाट ऐकायचा नसेल ते ‘साउंड्रॉऊन’ (soundrown) या बेबसाईटला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला कॅफे बरोबरच पावसासह ढगांचा कडकडाट, समुद्राच्या लाटा, रात्रीची शेकोटी (आग), रात्रीचा किरकिराट, पक्ष्यांची किलबिल, रेल्वेडब्याचा खडखडाट, कारंज्याची खळखळ आणि बागेत लहान मुलांचा कल्ला असे विविध आवाज ऐकायला मिळतात.