निशांत महाजन
एक फार गमतीशीर गोष्ट अलीकडेच वाचनात आली. आणि वाटलं की आपण एवढे उघडेवाघडे दिसतोय जगाला आणि आपल्याला त्याची कल्पनाही नाही. सकाळी गाडीचे लाइट चालूच असतात आणि लोक आपल्याला हातवारे करकरून ते सांगत असतात की बंद कर.. तसंच हे! पण इथं होतं काय जितके लोक आपल्याकडे पाहून हातवारे करतात तितकं आपल्याला वाटतं की, आपलं भारी चाललं आहे. तसं ते चाललेलं नसतं! आपल्या ‘मला पाहा फुलं वाहा’ वृत्तीचं हसू होत असतं. लोक मनातल्या मनात आणि गॉसिपच्या अड्ड्यावरही तुमच्याविषयी काहीबाही बोलत असतात. आणि मग काहीजण कधीतरी आपल्यावर उघड कमेण्ट्स करतात. तेव्हा आपण हर्टबिर्ट होतो, तोवर मात्र आपण आपल्याच नादात पार उघडेवाघडे होत जातो सोशल मीडियावर. तर अलीकडे वाचलेला अभ्यास. ब्रुनेल विद्यापीठातल्या सोशल मीडिया संशोधकांनी आपल्या अभ्यासाची काही निरीक्षणं अलीकडेच नोंदवली आहेत. सोशल मीडियावर पोस्ट होणारा मजकूर पाहून लोकांची पर्सनॅलिटी सांगता येते असं त्यांचं म्हणणं आहे. सतत डीपी बदलणारे ते रिलेशनशिप स्टेटस टाकणारे ते सतत इमोटिकॉन्स वापरणारे, त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि भावनिक अवस्था काय आहे हे सांगता येऊच शकतं. हा अभ्यास म्हणतो, अलीकडे त्यात एक नवीन कॅटेगरी दाखल झाली आहे. त्या प्रकारातल्या लोकांना ते ‘कॉक’ म्हणतात. म्हणजे असे लोक जे स्वत:च्या इतके प्रेमात असतात की, सतत सोशल मीडियात वारवत असतात. तर हे लोक काय करतात. हे जिम लावतात. मग जिम करतानाचे फोटो टाकतात. त्यावर स्टेटस लिहितात. सतत आपलं रुटीन, आपला व्यायाम, आपलं डाएट, आपली तब्येत याविषयी सोशल मीडियात लिहितात. त्यांना स्वत:विषयी आपण किती जागरुक आहे असं लोकांना दाखवायचं असतं. सुरुवातीला लोक कौतुक करतात. नंतर म्हणतात, काय स्वत:चे दिवे ओवाळतो आहे... या नव्या कॅटेगरीची लागण सध्या सोशल मीडियात जोरात आहे...