प्यार किया कोई चोरी नही की. छुपछुप के आहे भरना क्या. जब प्यार किया तो डरना क्या..
निळ्या-लाल अक्षरात रंगवलेल्या अशा पाट्या घेऊन नारे देणारे आणि एकमेकांच्या ओठांत ओठ गुंतवून त्याचे सेल्फीज काढून फेसबुक आणि व्हॉट्सअँपवर पोस्ट करणारे माझे बरेच मित्न-मैत्रिणी ‘किस ऑफ लव्ह’ नामक नव्या ‘कॅम्पेन’ मध्ये सहभागी झाले आहेत. सकाळी ७ पासून रात्नी दहापर्यंत मोर्चे देत, घोषणाबाजी करत आणि ऑफकोर्स खुलेआम मिठीत घेऊन किस करत हसत हसत पोलिसांच्या व्हॅनमध्ये चढताना त्यांच्या चेहर्यावर एक अभिमानाची झलक दिसतेय. काही ठिकाणी त्यांच्यावर लाठीहल्ला झालाय, काही पालकांनी त्यांना घरात डांबून ठेवलंय, काही जणांनी कॉलेज आणि परीक्षेचा त्याग केलाय तर काही जण तुरु ंगाची हवा खाऊन आणखीनच जोशात आले आहेत. सोशोलॉजी आणि फिलॉसॉफी असे अगम्य विषय शिकणार्या माझ्या मित्नांच्या मते ही चळवळ म्हणजे पोस्ट मॉर्डनिस्ट, पोस्ट कॉलिनिअल, पोस्ट अमुक , पोस्ट-तमुक काळातला मूलभूत मानवी हक्कांसाठी एक ग्लोबलाईज्ड स्वातंत्र्य लढाच आहे. आणि सगळ्यांचं हे असंच मत असावं म्हणून ही मंडळी रात्न आणि दिवस एक करून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअँप, लिंकडीन इथे सर्वत्न या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करताहेत. बेड्या ठोकलेल्या आणि तरीही किस घेणार्या जोडप्यांच्या फोटोंमध्ये पन्नासेक रॅण्डम लोकांना टॅग करून या चळवळीची व्याप्ती वाढवली जातेय.
‘कसं वाटतंय या आंदोलनात सहभागी होऊन’ असा प्रश्न (स्वत:च्या) कपाळावरचे केस (स्वत:) मागे सारत एका रिपोर्टरणीने माझ्या मित्नाला विचारला. तो या चळवळीतला एक खंदा कार्यकर्ता आहे. त्यावर त्याच्या दीड मिनिटांच्या प्रतिक्रि येची क्लीप त्याने गूगल प्लसवरच्या दीड हजार कॉण्टॅक्टना मेल केलीये. (त्यामुळे आधी शिव्या घालणार्या त्याच्या आईने त्याला टीव्हीवर पाहून त्याची दृष्ट काढली आणि दृष्ट काढत असल्याचा सेल्फी फेसबुकवर पोस्ट करून या चळवळीला पाठिंबा दर्शविला अशी खबर आहे !)
अर्थातच ज्या आंदोलनाला विरोध होत नाही ते आंदोलन कसलं !! त्यामुळे शहराच्या दुसर्या भागात अध्र्या खाकी चड्डय़ा घातलेल्या पोरांचा मोर्चा काढवलाय. ‘‘हिंदुस्तान को अमरिका नहीं होने देंगे’’ असं भगव्या अक्षरात लिहून त्याच्या डाव्या बाजूला हनुमान आणि उजव्या बाजूला मोदींना फोटोशॉपने कटपेस्ट करण्यात आलंय आणि प्रत्येक किसवाल्या स्टेट्सला रीप्लाय म्हणून ही पोस्ट शेअर केली जातेय. वर भरजरी साडीतल्या गोर्या फॉरीनर अप्सरा आणि खाली जिन्स मधल्या सावळ्या पोरी किस करताना असे फोटो आणि त्यावर कॅप्शन. ‘अमेरिकन्स लव्ह इंडियन कल्चर बट इंडियन्स लव्ह ओन्ली अमेरिकन कल्चर. शेअर इफ यू अँग्री.’ असल्या फोटोंना हजार बाराशे लाईक्स. दर दोन वाक्यांनंतर अनैतिक, स्वैराचार वगैरे शब्द पेरलेले भगवे स्टेट्स आणि प्राऊड टू बी इंडियन अँण्ड इंडियन कल्चर नामक डायरिया झालेल्या काही स्व-कॉल्ड संस्कृतीरक्षकांचा थयथयाट.
हे एकीकडे तर दुसरीकडे भलतंच. काहीतरी सतत हॅपनिंग घडायला हवं असणार्यांच्या रटाळ आयुष्यांमध्ये ही एक पर्वणी. एक इव्हेण्ट. जसं सार्वजनिकरीत्या खाणं, पिणं, उठणं, बसणं हे आमचे हक्क आहेत तसाच आम्हाला सार्वजनिकरीत्या एकमेकांवर शारीर प्रेम व्यक्त करायची परवानगी द्या अशी साधी मागणी. सीम्स सो सिम्पल अँण्ड स्ट्रेट फॉरवर्ड. पण एकीकडे आपला फोन समोरच्याने हातात जरी घेतला तरी अस्वस्थ व्हायचं, आई नॉक न करता आत आली तर तिच्यावर खेकसायचं, जे बॉयफ्रेण्डस त्यांच्या गर्लफ्रेण्डसच्या एफबी अकाउण्ट वर पाळत ठेवतात आणि ज्या गर्लफ्रेण्डस त्यांच्या बॉयफ्रेण्डसचे इनबॉक्स नित्यनेमाने चेक करतात त्यांना पाहून ‘‘यांना काही प्रायव्हसी नामक चीज आहे की नाही’’ असं ‘‘ वंडर’’ करायचं आणि सारसबाग झेड ब्रिजवर बसलेल्या हातात हात आणि ओठात ओठ कपल्सवर मनसोक्त दात काढायचे. या पार्श्वभूमीवर जेव्हा एक अर्बन, कॉस्मोपॉलिटन आणि स्वत:ची प्रायव्हसी जिवापाड जपणारा यंगिस्तानी जेव्हा पब्लिक डिस्पले ऑफ अफेक्शन’ या प्रकाराला सार्वजनिक मान्यता मिळावी अशी मागणी करतो त्यावेळी फार पॅरॉडॉक्सिकल अर्थात विरोधाभासी वाटतं.
अर्थात ज्या घटनेमुळे या सगळ्याला सुरु वात झाली ती कुठल्याही प्रकारे जस्टीफाईड नाहीये. केरळ आणि देशाच्या इतरही भागात नैतिक पोलिसगिरीमुळे अनेकजण बळी पडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. हे बदलायला हवंय. मान्य. पण रस्त्यांवरून एकमेकांना किस करत सुटल्याने आणि त्याचा सोशल नेटवर्किंगने एक जंगी इव्हेण्ट केल्याने मूळ मुद्दय़ापासून थोडं भरकटायला होत नाहीये ना?
हे जरा पडताळून पहायला हवं. प्रत्येक वेळेला निषेध नोंदवणं हा एक सोहळा, एक इव्हेण्ट होणं गरजेचं आहे का? आणि ज्या घटनेची मला प्रत्यक्ष झळ बसलेलीच नाही त्यावर फक्त एक्साईट होऊन काहीतरी प्रतिक्रिया देत सुटतोय का? मी त्या क्षणापुरता की त्या गोष्टीचं, घटनेचं गांभीर्य समजून घेतलंय? निदान प्रयत्न तरी केलाय का तसा? दोन दिवसांच्या प्रोटेस्ट नंतर तिसर्या दिवशी मला माझी तीच चीड, राग, संताप आणि निषेध करण्याची भासणारी निकड टिकवून ठेवता येतीये की मी पुन्हा माझ्या कोशात, माझ्या कम्फर्ट झोनमध्ये शिरून फक्त फेसबुकवर लाईक ठोकत सुटलोय? मला खरंच त्या घटनेविषयी एवढय़ा तीव्र भावना आहेत का? मी सेन्सेटिव्ह आहे आणि मला माझ्या आसपास घडणार्या घटनांनी फरक पडतो, हे कुठेतरी स्वत:लाच सिद्ध करून देण्यासाठी निव्वळ मी हा फायटिंग फॉर अ कॉज असला खेळ मांडत नाहीये ना?
- सागर पांढरे